computer

गवत कापल्यावर येणाऱ्या सुगंधामागे आहे हे महत्वाचं कारण !!

आज-काल कुठलीही गोष्ट जर आपल्याला पेचात पाडत असेल किंवा कुठल्या गोष्टीबद्दल आपल्याला सल्ला हवा असेल तर आपण पहिल्यांदा गुगललाच विचारतो. गुगल हे फक्त सर्च इंजिन राहिले नाही, तर गूगल आता मानवाचा गुरु झालेला आहे. कुठल्याही साध्यासोप्या प्रश्नापासून ते कठीण पातळीवरच्या प्रश्नांची उत्तरं शोधून देणारा आपला मित्र म्हणजे गुगल! अगदी रेसिपीपासून रिलेशनशिप प्रॉब्लेम्स अशा सगळ्या गोष्टींवर गुगलला प्रश्न विचारले जातात. कधीकधी गुगलवरती सर्वात जास्त काय सर्च होतं वगैरेही माहिती गुगल जाहिर करते.

एकदा तापसी पन्नूने ट्रोलला उत्तर देताना cerebrum शब्द वापरला आणि लोक वेड्यासारखे त्याचा अर्थ गुगलवर शोधायला लागले. पण, गुगलला सतत प्रश्न विचारणाऱ्या लोकांनीही काही प्रश्न विचारण्याचा कंटाळा केलाय. म्हणजे आता सांगा, गवत कापताना तो विशिष्ट वास का येतो हे तुम्ही कधी गुगलला विचारलंय? नक्कीच नाही. म्हणूनच बोभाटाच्या वाचकांसाठी हा प्रश्न आम्ही गुगलला विचारलाय. 

तर आज जाणून घेऊयात गवत कापलं जाताना येणाऱ्या सुगंधाचं रहस्य काय आहे....

या गंधाचं शास्त्रीय कारण असं आहे की जेव्हा आपण गवत कापतो तेव्हा  " ग्रीन लिफा व्होलाटाईल्स " नावाचे एक "ऑरगॅनिक कंपाऊंड " म्हणजेच सेंद्रिय संयुग बाहेर पडते. गवत कापताना हे संयुग नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात बाहेर टाकले जाते. या सेंद्रिय संयुगामुळे गवताला झालेली जखम लवकर भरून येण्यास मदत होते आणि गवताला कसल्याही प्रकारचा संसर्ग होत नाही.

गवतातून बाहेर पडणारे प्रत्येक कंपाऊंड हितकारकच असते असे नाही,  पण या ऑरगॅनिक कंपाऊंड किंवा सेंद्रिय संयुगामुळे गवताची परत वाढ होण्यास सुरुवात होते.  मानवासाठी ह्या संयुगामधून निर्माण होणारा वास सुखकारक असतो. या ऑरगॅनिक कंपाऊंड मध्ये उपलब्ध असणाऱ्या काही घटकांमुळे  हा सुगंध तयार होतो,  तसेच काही निगेटिव्ह ओझोन खर्च झाल्यानंतर अशा प्रकारचा सुगंध तयार होतो असे शास्त्रज्ञांचे मत आहे. दोन्ही गोष्टी मानवाला हितकारक अशाच आहेत.

मग, तुम्ही आजवर कोणता प्रश्न गुगलला विचारायला हवा होता, पण विचारला नाहीय असं झालंय का? आम्हांला तो प्रश्न नक्की सांगा, कदाचित आम्ही त्याचं सविस्तर उत्तर तुमच्यासाठी इथे देऊ...

 

लेखक : रोहित लांडगे