computer

जाणून घ्या या विश्वाचे रहस्य !जागतिक खगोलशास्त्र दिवसाच्या निमित्ताने !

आज २ मे म्हणजे 'जागतिक खगोलशास्त्र दिवस'.या दिवसाची सुरुवात १९७३ साली डॉ. डूग बर्जर यांनी केली. सर्वसामान्य लोकांच्या मनात अवकाशाबद्दल ,आपल्या अनंत विश्वाबद्दल कुतुहूल निर्माण करून त्यांना जास्तीतजास्त माहीती द्यावी असा या यामागचा उद्देश आहे. फरक इतकाच आहे की जागतिक खगोलशास्त्र दिवस दरवर्षी दोनदा साजरा केला जातो. एकदा एप्रील आणि मेच्या मध्यात तर दुसर्‍यांदा सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या मध्यकाळात .तर या वर्षीचा दुसरा खगोलशास्त्र दिन २६ सप्टेंबर २०२० रोजी असेल.चला तर आज बोभाटाच्या माध्यमातून आपणही साजरा करू जागतिक खगोलशास्त्र दिन !

जेव्हा जगात अज्ञानाचा अंधार पसरला होता तेव्हा भारतीय खगोलशास्त्र बहरले होते. भारतीय खगोलशास्त्रात ग्रहांचे भ्रमण,त्यानुसार तिथी पंचांग ,  पृथ्वी आणि चंद्राचा  भ्रमणकाळ,  सूर्य -चंद्र ग्रहणांच्या तारखांचे अचूक गणित अशी अनेक वैशिष्ट्ये होती. भारतीय खगोलशास्त्र म्हटले की पहीले नाव आठवते ते आर्यभट्टाचे ! वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी 'आर्यभटीय' किंवा आर्यसिध्दांत या ग्रंथाची निर्मिती त्याने केली. या ग्रंथातील खगोलशास्त्रीय गणितावरचा त्याचा अभ्यास अल बेरुनी या अरबी विद्वानाने भाषांतरीत करून जगभर नेला. लक्षात घ्या या सर्व घटना इसवी सनाच्या ४७६ व्या वर्षी घडलेल्या आहेत. आधुनीक खगोलशास्त्रात ज्याला 'पॅरॅलॅक्स' (दृकभेद कोन) म्हणतात तो सिध्दांतही आर्यभट्टाचाच ! आर्यभट्टाची परंपरा पुढे वराहमिहीर- ब्रह्मगुप्त-भास्कराचार्य यांनी पुढे चालवली. 

हा झाला भूतकाळ पण वर्तमानात तीच परंपरा पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर पुढे नेत आहेत. त्यांच्या ' हॉइल-नारळीकर' सिध्दांताला जगभरात मान्यता मिळाली आहे. भारतात पुण्यामधे आयुकाच्या (Inter University Center for Astronomy and Astrophysics) स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग आहे. खगोलशास्त्रावर त्यांनी अनेक इंग्रजी ग्रंथ लिहिले आहेतच पण सामान्य माणसांना विज्ञान विषयक उत्सुकता निर्माण व्हावी यासाठी त्यांनी अनेक मनोरंजक मराठी पुस्तकेही लिहीली आहेत. त्यापैकी काही 
वामन परत न आला , यक्षांची देणगी, व्हायरस, प्रेषित, उजव्या सोंडेचा गणपती नक्की वाचा.

विश्वाच्या निर्मितेचे रहस्य उलगडण्यासाठी नारायणगाव (पुणे) येथे जायंट मिटरवेव्ह रेडीओ टेलीस्कोप ऑब्जर्व्हेटरी (GMRT) येथे उभारण्यात आलेली आहे. ४५ मिटर व्यासाच्या ३० रेडीओ टेलीस्कोप च्या माध्यमातून येथे विश्वातील आकाशगंगा,पल्सार,सौर वादळे सुपरनोव्हा यांचा अभ्यास येथे केला जातो.  २०१८ साली विश्वातील अतिदूर म्हणजे २० बिलीयन लाइट इअर्स दूर असलेल्या आकाशगंगेचा शोध इथेच लावण्यात आला. जर तुम्हाला त्यांच्या कार्याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता असेल  २८ फेब्रुवारी रोजी GMRT ला भेट द्या.

खगोलशास्त्र या अनंत विश्वाचा ज्सा अभ्यास करते त्याच सोबत हे विश्व कसे निर्माण झाले याचा पण अभ्यास करते. विश्वाची उत्पत्ती हे अनाकलनीय कोडे आहे. वेदांच्या काळापासून आता २०२० पर्यंत हा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गृहीतके मांडली गेली.
नासदीय सूक्त (ऋग्वेद, मंडल १०,सुक्त १२९) या  ऋग्वेदातील दहाव्या मंडलातल्या सूक्तात सुध्दा हाच प्रयत्न केला गेला आहे. मूळ नासदीय सूक्त संस्कृतमध्ये असल्याने समजायला फारच कठीण आहे. त्याचा अनुवाद 'भारत-एक खोज या मालीकेच्या वापरला गेला आगे तो कदाचित तुम्ही ऐकला असेल .
सृष्टी से पहले सत्य नहीं था,असत्य भी नहीं
अंतरिक्ष भी नहीं,आकाश भीं नहीं था
छिपा था क्या कहाँ,किसने देखा था
किसी को नहीं पतानहीं पता
नहीं है पता, नहीं है पता.....

१९३५ साली जॉर्ज लेमाइटर नावाच्या  एका खगोल अभ्यासकाने  "कल्पना करा" अशा स्वरुपात 'बिग बँग' म्हणजे वैश्विक महास्फोटाचासिध्दाम्ट माडला. या सिध्दांताप्रमाणे  हे विश्व आधी फक्त एका 'बिंदू'च्या स्वरुपात होते. हा काळ १३ ते २० अब्ज वर्षांपूर्वीचा असावा जेव्हा त्या बिंदूतून एक प्रचंड स्फोट झाला आणि त्यातून बाहेर पडलेल्या उर्जेचे रुपांतर आज आपण बघतो त्या विश्वात झाले. या गृहीतकाला अजूनही पूर्णपणे मान्यता मिळालेली नाही. पण तेसमजायला मदत होईल असे अनेक उपसिध्दांत मान्य झाले आहेत. हे विश्व सतत प्रसरण पावते आहे, सर्व आकाशगंगा एकमेकांपासून दूर जात आहेत हे आता मान्य झाले आहे. हबल या शास्त्रज्ञाने मांडलेली कल्पना अशी आहे आहे - 'जसे एखाद्या फुग्यावरचे रंगीत ठिपके फुगा फुगवल्यावर दूरदूर जातात तसे हे विश्व आहे. याचाच अर्थ असा की एक वेळ अशीही होती की जेव्हा ते एकरुप होते'.वाचकहो , हे समजणे तसे कठीण आहे पण 'बिग बँग ' या मालीकेचे शिर्षक गीत ऐकल्यावर तुम्ही हे समजू शकाल. 

आज जागतिक खोगोल शास्त्राच्या दिवशी लिहू तितके अपुरेच आहे पण हा लेख कंटाळवाणा होऊ नये म्हणून काही मनोरंजक गंमतीजमती पण सांगतो आहे. 

कृष्णविवर (ब्लॅक होल)चे प्रत्यक्ष दर्शन आपल्याला कधीच होणार नाही कारण कृष्णविवराचे गुर्य्त्वाकर्षण इतके जास्त असते की त्यात प्रकाशाच्या लहरीसुध्दा लुप्त होतात. आपल्याला प्रकाशाचा अभाव फक्त नजरेस येईल पण कृष्णविवर कधीच नाही.

इतर तार्‍यांसारखा आपला सूर्यही कधीकाळी विझून जाणार आहे पण आताच चिंता करू नका. सूर्याचे आयुष्मान १०अब्ज वर्षे गृहीत आहे त्यापैकी आताशी ४.५ अब्ज वर्षे पार पडली आहेत.

आपल्या सूर्यमालीकेतील सर्व ग्रह तराजूत एका बाजूला टाकले आणि दुसर्‍या बाजूला एकटा गुरु ग्रह ठेवला तरी तराजू गुरुच्याच बाजूने झुकेल इतके त्याचे वस्तूमान आहे . उगाच नाही त्याला गुरु म्हणत !!

ज्याच्या साडेसातीची प्रत्येकाला दहशत त्या शनी ग्रहाला  तो मावेल असं पाण्यानी भरलेलं एखादं भांडं घेऊन त्यात बुडवलं तरी शनी पाण्यावर तरंगेल इतकी त्याची घनता कमी आहे.

आपण द्रुव तार्‍याचे स्थान अढळ समजतो पण प्रत्य्क्षात ते तो अढळ स्थानावर नाही.

या लेखाच्या मर्यादा लक्षात घेता अनेक उल्लेख राहून गेले आहेत,मानवाच्या अवकाशातल्या भरार्‍यांविषयी , कल्पना चावला आणि राकेश शर्मा यांच्या जीवन गाथा देखील राहून गेल्या आहेत . हे सर्व उल्लेख एकेका लेखाचे विषय आहेत. कधीतरी ते विषय बोभाटा तुमच्या समोर मांडणार आहेच पण खगोल दिनानिमित्त आकाशदर्शन नक्की करा !!

सबस्क्राईब करा

* indicates required