computer

काय सांगता, जग लवकरच कॅन्सरमुक्त होणार? या नव्या संशोधनाबद्दल वाचलंत का?

कॅन्सर म्हटलं की कोणत्याची माणसाच्या पायाखालची जमीन सरकल्याचा अनुभव येणं अगदी सामान्य आहे. जीवन बकाल बनवणारा हा रोग इतका घातक आहे की २०२० मध्ये दर सहा व्यक्तीमागे एका व्यक्तीच्या मृत्यूचे कारण हे कॅन्सर होते. यावरून या आजाराची तीव्रता आणि भयावहता स्पष्ट होईल. कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, एक ऑन्कॉलॉजी डिपार्टमेंट असतं. इथले रुग्ण बहुधा हरवलेले, जगण्याची आशा सोडलेले, पुढचा काळ बघायला मिळतो की नाही अशा अनिश्चिततेच्या गर्तेत हेलकावे खाणारे असे असतात. फार क्वचित प्रसन्नता असते. अगदीच एखादा निधड्या छातीचा, सकारात्मक दृष्टीचा असेल तर... एरवी कॅन्सर या रोगाची दहशतच इतकी आहे, की भले भले त्यापुढे कापतात. या रोगाचा संबंध थेट मृत्यूशी जोडला जातो.
पण एक खुशखबर आहे.

जग लवकरच कॅन्सरच्या जीवघेण्या विळख्यातून मुक्त होण्याची चिन्हं आहेत. इतिहासात पहिल्यांदाच एका औषधामुळे रुग्णांमधील कॅन्सर समूळ नष्ट झाल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेतल्या मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर येथे या औषधाच्या चाचण्या घेतल्या गेल्या. सध्या या चाचण्या कमी प्रमाणावर घेतल्या गेल्या आहेत. मात्र त्यांचे निष्कर्ष आशादायी आहेत. विशेष म्हणजे या औषधामुळे केमोथेरपीची गरज भासत नाही.

या औषधाचं नाव डॉस्टरलिमॅब असं आहे. गुदद्वाराचा कर्करोग असलेल्या बारा रुग्णांना या औषधाचा डोस देण्यात आला होता. त्यानंतर ते पूर्णतः कॅन्सरमुक्त झाल्याचं आढळून आलं. त्यांच्या शरीरात कॅन्सरच्या पेशी शिल्लक आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी प्रत्यक्ष शारीरिक तपासणी (फिजिकल एक्झाम), एंडॊस्कोपी, पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी म्हणजेच पेट स्कॅन, तसेच एमआरआय यांसारख्या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांदरम्यान त्यांच्या शरीरातून कर्करोगाचा संसर्ग पूर्णतः नष्ट झाल्याचं आढळून आलं. या निष्कर्षांमुळे जगभरात कर्करोगाशी लढा देणाऱ्या लाखो रुग्णांना आशेचा किरण गवसला आहे.

या रुग्णांमध्ये एका भारतीय वंशाच्या रुग्णाचाही समावेश आहे. ज्या रुग्णांनी अनेकदा केमोथेरपी आणि रेडिएशन हे उपचार घेतल्यानंतर जिवंत राहण्याची आशा जवळपास सोडून दिली होती, अशा रुग्णांवर या औषधाचा प्रयोग यशस्वी झाला. काहीजणांना आयुष्यावर दूरगामी परिणाम करतील अशा शस्त्रक्रियांना सामोरं जावं लागलं. त्यामुळे त्यांच्या पचनसंस्था, विसर्जन संस्था यांच्या कार्यात बिघाड झाल्याचं आढळून आलं. काहीजणांना तर कोलोस्टोमी बॅगचा आधार घ्यावा लागला. अनेक तर्‍हेचे उपचार करून देखील कॅन्सरच्या ट्युमरमध्ये काहीही फरक न पडल्याने निराश झालेल्या रुग्णांनी शेवटचा उपाय म्हणून डॉस्टरलिमॅब या औषधाचा प्रयोग त्यांच्यावर करण्यासाठी मान्यता दिली. आणि अहो आश्चर्यम! जे कधी स्वप्नातही अपेक्षित नव्हतं ते प्रत्यक्षात घडून आलं! शस्त्रक्रिया तर टळलीच, पण त्यानंतर येणारे केमोथेरपी, रेडिएशन यांच्यासारखे किचकट उपचार देखील करायची गरज राहिली नाही.
याहून आनंदाची गोष्ट म्हणजे या रुग्णांमध्ये कोणत्याही स्वरूपाची उपचारपश्चात गुंतागुंत आढळली नाही. या ट्रीटमेंटनंतर पंचवीस महिन्यांनी देखील कॅन्सरचा नव्याने प्रादुर्भाव झालेला नाही.

आता हे औषध कसं काम करतं ते पाहू.

डॉस्टरलिमॅब हे ड्रग रुग्णांना दर तीन आठवड्यांनी एकदा असं सहा महिने देण्यात आलं. या औषधाचा मुख्य उद्देश हा शरीरातील कॅन्सर पेशी शोधून शरीराच्या प्रतिकार यंत्रणेला त्यांच्यावर हल्ला करण्यास भाग पाडणं हा होता. वास्तविक प्रत्येकाच्याच शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशी असतात. त्या अर्थाने बघायला गेलं तर रोजच प्रत्येकाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. परंतु तसं होत नाही. याचं कारण आपल्या शरीरातील प्रतिकार यंत्रणा आणि मुख्यतः टी सेल्स नावाच्या पेशी. यामुळे कॅन्सर पेशी वेळच्या वेळी नष्ट होतात. या कार्यक्रमामध्ये जेव्हा बिघाड होतो तेव्हा कॅन्सर पेशी पुढे जाऊन ट्युमर निर्माण करतात. मात्र डॉस्टरलिमॅबमुळे कोणत्याही छुप्या कॅन्सर पेशी शरीरात राहात नाहीत आणि शरीरातील प्रतिकार यंत्रणेच्या मदतीने त्या वेळीच नष्ट केल्या जातात. अशा प्रकारच्या औषधांना चेकपॉईंट इन्हिबिटर्स म्हणतात. म्हणजे कॅन्सरच्या पेशींना दारापाशीच रोखणारी औषधं. आपण नाटक सिनेमाला जातो तेव्हा तिकीट असल्याशिवाय आपल्याला आत प्रवेश मिळत नाही, तसंच काहीसं आहे हे. या उपद्रवी पेशींना ओळखायचं आणि नष्ट करायचं हे काम या औषधांमुळे प्रभावीरीत्या होत आहे.

या औषधाचे काही प्रमाणात दुष्परिणाम आहेत. विशेष करून, मसल वीकनेस किंवा स्नायूंमध्ये आढळणारे दौर्बल्य हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा दुष्परिणाम. पण त्याच्या परिणामांचा विचार करता हे दुष्परिणाम अगदीच सौम्य म्हणावे लागतील. आज तरी या औषधाची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची म्हणजेच प्रत्येक डोस मागे ८,५५,००० रुपये एवढी आहे. पण भविष्यात ती नक्कीच सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी अपेक्षा आहे. शिवाय दीर्घकाळासाठी हे औषध कितपत यशस्वी ठरतं हेही बघावं लागणार आहे. अर्थात आज तरी हा सोनियाचा दिनू साजरा करायला काहीच हरकत नाही.

स्मिता जोगळेकर