computer

पंख लावून आकाशात उडणारा जगातला पहिला माणूस...त्याच्या या धाडसाची रंजक कथा !!

'मला पंख फुटले तर...' या विषयावर आपण शाळेत असताना निबंध लिहिलेला आहे. त्यावेळी आकाशातून खाली कसा देखावा दिसेल किंवा उडायला लागल्यावर काय करू यावर कल्पनेच्या भराऱ्या मारत आपण जे काय सुचेल ते लिहायचो. पण हा निबंध लिहिताना खरंच असे पंख तयार करून उडता येणं प्रत्यक्षात शक्य आहे का, याचा विचार तुमच्यापैकी कुणी कधी केला होता का? साता समुद्रापार मात्र एक व्यक्ती अशी होऊन गेली जिने खरोखर असे पंख तयार करून ते स्वतःला लावून आकाशात उडण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. डिएगो मारीन अगिलेरा हे या माणसाचं नाव. 

स्पेनमधील कोरुन्या विल काँडे हे मारीनचं गाव. हे गाव स्पेनमधील इतर अनेक गावांप्रमाणेच शांत, निसर्गरम्य, टुमदार वगैरे होतं. मारीन शेतकरी कुटुंबातला. ७ भावंडांत सगळ्यात मोठा. त्यामुळे वडील गेल्यावर शेतीची जबाबदारी त्याच्यावरच आली. शेतीच्या कामांबरोबरच शेळ्यामेंढ्या आणि गुरं राखण्याचंही काम होतं. कोणतं पीक कधी घ्यायचं, बदलत्या हवामानाचे जनावरांवर काय परिणाम होतात याचा अभ्यास करता करता एकीकडे त्याचा हवामानाचा अभ्यास पक्का होत गेला. इतका की जणू चालतीबोलती वेधशाळाच. जोडीला शेतीतले श्रम आणि वेळ वाचवण्यासाठी त्याने बसल्याबसल्या काही यंत्रं बनवली होती. त्यात एक पाणचक्की, पिकांना पाणी देणारं यंत्र, मळणीच्या वेळी घोड्यांवर चाबूक चालवणारं स्वयंचलित मशीन यांचा समावेश होता.

(प्रातिनिधिक फोटो)

त्याच्याकडे खरोखर संशोधकाचा मेंदू होता, हे सिद्ध करायला ही उपकरणं पुरेशी होती. हे सगळं करताना दुसरीकडे दुपारी मेंढ्यांना चारताना तो तासंतास आकाशाकडे बघत बसे. तिथे त्याला एका संथ, स्थिर लयीत पंख पसरून आकाशात गोल घिरट्या घालणारे गरुड दिसत. मारीनच्या डोक्यात कधीपासून हा एक किडा वळवळत होता- आपल्यालाही पक्ष्यांसारखं आकाशात उडता यावं. अगदी त्यांच्यासारखे पंख लावून. त्यासाठी पंख तयार करण्याची पण त्याची योजना होती. आता त्या दिशेने त्याने सिरियसली अभ्यास करायला सुरुवात केली.

तब्बल ६ वर्षं खर्च करून त्याने एक फ्लाईंग मशीन तयार केलं. लाकूड, लोखंड, कापड आणि पिसं यांच्या साहाय्याने या मशीनचा सांगाडा तयार करण्यात आला. त्यासाठी त्याने खास जाळं टाकून गरुडाची आणि गिधाडांची पिसं गोळा केली. पक्ष्यांची हाडं पोकळ असतात, ज्यामुळे उडताना हवेचा प्रतिरोध कमी होतो हे लक्षात घेऊन या सांगाड्यातही लोखंडाच्या पोकळ नळ्या बसवल्या गेल्या. याशिवाय पक्ष्यांच्या शरीराचं वजन, आकार, आकारमान, पिसांची रचना व लांबीरुंदी यांचाही अभ्यास केला गेला. पक्षी उडताना त्यांचे पंख आणि शेपूट यांची हालचाल कशी होते हेही त्याने बारकाईने अभ्यासलं.

हे सर्व झाल्यावर बार्बेरो नावाच्या लोहार मित्राच्या मदतीने त्याने पंख्यासारखे दिसणारे दोन लोखंडी सांधे तयार केले. पायांना बांधायला रिकिबीची सोय केली. शिवाय उड्डाणादरम्यान या फ्लाईंग मशीनची दिशा नियंत्रित करण्यासाठी आणि गरजेनुसार जास्तीची पॉवर जनरेट करण्यासाठी हॅन्ड क्रॅन्क या उपकरणाचा वापर करायचं ठरलं. हा सगळा सेट अप असा होता की मारीन आरामात बसून स्वतःची शक्ती फार खर्च न करता उडू शकणार होता. 

 

सगळी तयारी झाल्यावर अखेरीस १५ मे १७९३ रोजी पौर्णिमेच्या रात्री मारीनने गावातल्या कॅसलमधील सर्वात उंच जागी आपलं मशीन ठेवलं. दोन दिवसात परत येईन असं सहकाऱ्यांना सांगून पंख फडफडवले आणि तो ऐतिहासिक क्षण आला. त्या फ्लाईंग मशीन सकट मारीनची आकृती आकाशात गेली. कालांतराने त्याने ५ ते ६ मीटर उंची गाठली. या स्थितीत त्याने जवळपास ३०० ते ४०० मीटर अंतर कापलं. वाटेतली आरंडीया नदीही ओलांडली. मात्र नदी ओलांडल्यावर मशीनचा एक धातूचा जॉईंट तुटला आणि त्याला क्रॅश लँडिंग करावं लागलं. सुदैवाने त्याला फार काही लागलं नाही, फक्त थोडं खरचटलं. पण वेल्डिंग नीट न केल्याबद्दल लोहाराला चांगलीच बोलणी खावी लागली. उड्डाणाचा त्याचा प्रयोग मात्र बऱ्यापैकी यशस्वी ठरला. 

पण इथेच कुठेतरी त्याच्या आयुष्याच्या प्रवासाला गालबोट लागलं. गावातल्या लोकांनी त्याला वेडं ठरवलं. त्याचं फ्लाईंग मशीनपण जाळून टाकलं. यातून त्याला प्रचंड नैराश्य आलं, ज्यातून तो कधीच बाहेर येऊ शकला नाही. आपल्या ऐतिहासिक उड्डाणानंतर अवघ्या ६ वर्षांनी त्याचा मृत्यू झाला. 

तुमच्याही आजूबाजूला तुम्ही कदाचित असे कुणी जीनियस बघितले असतील, त्यांची स्वप्नं म्हणजे इतरांना वेडेपणा वाटतो. अनेकदा समाज त्यांना, त्यांच्या प्रतिभेला समजून घेण्यात कमी पडतो. पण अशा लोकांना प्रोत्साहन द्या. ते शक्य नसेल तर निदान त्यांना नाउमेद तरी करू नका. कुणास ठाऊक, भविष्यात यातलाच एखादा 'वेडा' तुमचं आयुष्य बदलून टाकण्यासाठी कारण ठरू शकतो.

 

लेखिका: स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required