computer

आता क्रिकेटमध्ये स्त्री-पुरुष भेदभाव नाहीसा होणार !! जाणून घ्या बॅट्समन,थर्डमॅन यांना काय म्हटले जाईल?

आधी तर एक स्वयंपाकघर सोडले तर सर्वच क्षेत्रे पुरुषप्रधान होती. साहजिकच सर्व पदांना पुरुषप्रधान नावे दिली गेली. राष्ट्रपती, चेअरमन, विणकर ही सहज सुचलेली अशा नावांची काही उदाहरणे. जसजसा या सर्व ठिकाणी महिलांचा टक्का वाढू लागला तसतसा या सर्व पदांसाठी महिलाभिमुख किंवा लिंगनिरपेक्ष नावांची गरज वाटू लागली.

सध्या ही चर्चा क्रिकेटपर्यंत येऊन पोचली आहे. क्रिकेटमध्ये महिला आणि पुरुष असे दोन्ही संघ असतात हे तर सगळ्यांना माहित आहे. महिलांनी तिथे कितीही कौशल्य दाखवले तरी पण बॅटसमन-बोलर ही नावे तर सरळसरळ पुरुषीच!! पण आता यात बदल होण्याची शक्यता आहे. तशी पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे.

महिला क्रिकेटला गेली काही वर्ष चांगले महत्व प्राप्त होत आहे. गेल्यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात झालेल्या वर्ल्डकप फायनलमध्ये जवळपास पाऊणलाख प्रेक्षक उपस्थित होते. हाच अनुभव इतरही सामन्यांमध्ये आलेला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन क्रिकेट नियमांमधील गार्जीयन म्हटला जाणारा मेरिलेबॉन क्रिकेट क्लब यांनी क्रिकेटला जेंडर न्यूट्रल बनविण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

एमसीसीने घेतलेल्या निर्णयानुसार आता बॅट्समन ऐवजी बॅटर हा शब्द वापरला जाणार आहे. एमसीसीचे या विषयी असे मत आहे की असे शब्द वापरल्याने क्रिकेट हा सर्वसमावेशक खेळ आहे ही प्रतिमा मजबूत होईल. सर्वात आधी अशा प्रकारचे उल्लेख इंग्लंडमध्ये झालेल्या 'द हंड्रेड' या मालिकेच्या उद्घाटन सत्रादरम्यान करण्यात आले होते.

पुरुष आणि महिला असे दोन्ही फलंदाजांना बॅटर तर फिल्डिंगमधील थर्डमॅनला थर्ड असे म्हटले गेले. तसेच इंग्लंडमधील एका महिला सामन्यात नाईटवॉचमन ऐवजी नाईटवॉच हा शब्द वापरला होता. बीबीसी तसेच स्कायसारख्या संस्थाही आजकाल असेच शब्द वापरत आहेत.

क्रिकेटमध्ये महिला प्रतिनिधित्व वाढावे यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत. याचाच हा भाग आहे. तसेच २०२२ साली होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदा महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.

यावरून सोशल मीडिया मात्र दोन भागांत विभागला गेला आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की जे सुरू आहे त्यात काही वावगे नाही, तर इतरांचे म्हणणे आहे की हा कौतुकास्पद निर्णय आहे. तुम्हाला काय वाटते हे पण आम्हाला कमेंटबॉक्समध्ये कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required