या ३ फलंदाजांनी झळकावली आहेत कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक शतके; पाहा यादी...

क्रिकेट या खेळाची सुरुवात कसोटी क्रिकेटपासून सुरू झाली होती. कसोटी क्रिकेटनंतर वनडे आणि टी -२० क्रिकेट सुद्धा आलं. चौकार - षटकार, ग्लॅमर - पैसा असताना देखील काही असे क्रिकेट चाहते आहेत जे टी -२० पेक्षा कसोटी क्रिकेटकडे जास्त आकर्षित होतात. ५ दिवस चालणारा हा सामना पाहण्याची मज्जा काही वेगळीच असते. क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कसोटी सामना हा १८७७ मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये खेळला गेला होता. तर भारतीय संघाने पहिला कसोटी सामना १९३२ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध खेळला होता. 

तेव्हापासून ते आतापर्यंत भारतीय संघात अनेक दिग्गज फलंदाज आले आणि गेले ज्यांनी भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का? भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारे फलंदाज कोण आहेत? नाही ना? आम्ही या लेखातून तुम्हाला अशा ३ भारतीय फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक शतकं झळकावली आहेत. (most centureis for india in test) 

) सुनील गावस्कर(Sunil gavaskar):

या यादीत तिसऱ्या स्थानी आहे भारतीय संघाचा लिटिल मास्टर म्हणून ओळखला जाणारा फलंदाज सुनील गावस्कर. सुनील गावस्कर यांनी भारतीय संघासाठी अनेकदा महत्वाची खेळी केली आहे. ज्यावेळी संपूर्ण क्रिकेट विश्वातील फलंदाज वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना घाबरायचे. त्यावेळी सुनील गावस्कर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई करायचे. सुनील गावस्कर यांनी भारतीय संघासाठी एकूण ३४ शतके झळकावली आहेत. त्यांनी १९७१ पासून ते १९८७ पर्यंत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. ज्यामध्ये त्यांनी १२५ कसोटी सामन्यांमध्ये ५१.१२ च्या सरासरीने १०१२२ धावा केल्या. यादरम्यान नाबाद २३६ धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती.

२) राहुल द्रविड (Rahul Dravid) :

भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहुल द्रविड दुसऱ्या स्थानी आहे. क्रिकेट विश्वात राहुल द्रविडने 'द वॉल' म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राहुल द्रविडने भारतीय संघासाठी एकूण ३६ शतके झळकावली आहेत. त्याने १९९६ पासून ते २०१२ पर्यंत भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली. यादरम्यान त्याने भारतीय संघासाठी १६३ सामने खेळताना ५२.६३ च्या सरासरीने १३२६५ धावा केल्या.

) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar):

भारतीय संघासाठी सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहुल द्रविड अव्वल स्थानी आहे. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १०० शतके झळकावली आहेत. असा पराक्रम करणारा तो एकमेव फलंदाज आहे. तसेच कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, विक्रमी २०० कसोटी सामन्यांमध्ये त्याने एकूण ५१ शतके झळकावली आहेत. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने २०० कसोटी सामन्यांमध्ये १५५८१ धावा केल्या आहेत.

काय वाटतं? कोण असा फलंदाज आहे जो सचिन तेंडुलकरचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम मोडून काढू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required