computer

हे तीन खेळाडू चक्क भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडून क्रिकेट खेळले आहेत..

यंदा T-20 वर्ल्डकपची सुरुवात भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याने झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना म्हटलं की वातावरण अगदी गरम असतं. अत्यंत चुरशीच्या सामन्यात सगळ्यांनाच उत्सुकता असते ते कोण जिंकेल याची. भारत आणि पाकिस्तान यांचा प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. पण तुम्हाला माहित आहे का काही क्रिकेटपटू दोन्ही बाजूंनी खेळले आहेत? भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन क्रिकेटपटूंची माहिती आज आपण करून घेऊयात.

अब्दुल हाफिज कारदार (जन्म १९२५- मृत्यू १९९६)

"पाकिस्तान क्रिकेटचे जनक" म्हणून ओळखले जाणारे अब्दुल हफीज कारदार हे पहिले खेळाडू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान आणि भारत या दोन्ही संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. अब्दुल पाकिस्तान संघाचा पहिला कर्णधार होते. दोन्ही देश स्वतंत्र होण्यापूर्वी अब्दुल कारदार अर्थातच भारतीय संघाचा भाग होते. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. त्यांना पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वोत्तम डावखुऱ्या फिरकीपटूंपैकी एक मानले जाते आणि त्यांची फलंदाजीही तितकीच चांगली होती. १९४६ मध्ये इंग्लंडविरुद्ध अब्दुल यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. पाकिस्तानला जाण्यापूर्वी त्यांनी भारतासाठी तीन कसोटी सामने खेळले होते. नंतर ते पाकिस्तान संघात खेळले. १९५८ मध्ये पाकिस्तान सरकारकडून अब्दुल कारदारना ‘प्राइड ऑफ परफॉर्मन्स अवॉर्ड’ मिळाला होता.

अमीर इलाही (जन्म १९०८- मृत्यू १९८०)

१९४७ मध्ये अमीर इलाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये भारताकडून एक कसोटी खेळला होते. १९५२-५३ मध्ये पाकिस्तानकडून पाच कसोटी सामने ते खेळले. कलकत्ता येथे शेवटचा कसोटी सामना खेळला तेव्हा ते 44 वर्षांचे होते. इलाहींनी लेग-ब्रेक आणि गुगलीवर स्विच करण्यापूर्वी मध्यम-गती गोलंदाज म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. एक उत्तम गोलंदाज म्हणून ते प्रसिद्ध होते. इलाहींना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी संधी मिळाली नाही, परंतु त्यांची प्रथम श्रेणीतील कारकीर्द चांगली होती.

गुल मोहम्मद (जन्म १९२१- मृत्यू १९९२)

गुल मोहम्मद हे एक उत्कृष्ट फलंदाज होतेच, सोबतच एक उत्तम क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजही होते. त्याच्या उत्कृष्ट देशांतर्गत कामगिरीमुळे त्यांना १९४६ मध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली. गुल यांनी लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि भारतासाठी सात कसोटी सामने खेळले. १९४६ ते १९५५ पर्यंत ते भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू होता. भारतासाठी आठ कसोटी खेळल्यानंतर ते लाहोरला स्थलांतरित झाले आणि तिथेच राहिले. १९५६ मध्ये कराची येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका कसोटीतही ते पाकिस्तानकडून खेळले होते. या कसोटीत पाकिस्तानकडून खेळल्यामुळे दोन्ही देशांचे प्रतिनिधित्व करणारे ते तिसरे खेळाडू ठरले.

भारत-पाकिस्तानच्या बाबतीत क्रिकेट आणि संगीत हे दोन्ही न संपणारे विषय आहेत. एकाच्या बाबतीत एकमेकांचं काही खपत नाही, तर दुसऱ्याच्या बाबतीत लोक लगेच हळवेही होतात.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required