computer

बॉल स्टम्पला लागून पण बेल्स खाली पडल्या नाहीत ??....'बेलगेट' प्रकरण समजून घ्या !!

क्रिकेटचा रणसंग्राम आता एकदम धुमशानमध्ये आला आहे. हारजीत, किती सिक्स झाले, कोण बाहेर पडलं हा सगळा नेहमीचा सिलसिला सुरू झाला आहे. आणि अर्थातच, नेहमीप्रमाणे वादविवाद पण सुरू झाले आहेत.  ज्या वर्ल्डकपमध्ये वाद झाला नाही, तो वर्ल्डकप फाऊल धरण्यात येईल असे घोषित केले तरी चालेल इतकं वादविवादांचे आणि वर्ल्डकपचे नाते पक्के आहे. नुकताच धोनीच्या ग्लोवजवरून सुरू झालेला वाद शांत होत नाही तेवढ्यात आता नविन वाद सुरू झाला आहे राव!! 

मंडळी, तुम्हाला माहित आहे क्रिकेटमध्ये एका रनने मॅच बदलू शकते. आणि विकेटचा विषय असेल तर क्या कहना? कधी एखादा सेट झालेला बॅट्समन आऊट होऊन जिंकलेली मॅच हरण्याची पाळी येते तर कधी एखादा प्लेयर चांगला टिकला तर हरलेली मॅच जिंकून देतो. अशा परिस्थितीत एकेक विकेट लाखमोलाची असते ना राव!! कोण कशी फिल्डिंग लावून प्लेयरला पॅवेलीयनमध्ये परत पाठवेल सांगता येत नाही. बॉलर्स जंगजंग पछाडून विकेट घेण्यासाठी टपलेले असतात. पण मग अशावेळी स्टम्पला बॉल लागून पण प्लेयर आऊट होत नसेल तर तुम्हाला कसे वाटेल? तुमचे सोडा राव, त्या बिचाऱ्या बॉलरला कसे वाटेल? पण हे झाले आहे मंडळी. एकदा नाही, तर याच वर्ल्डकपमध्ये तब्बल पाच वेळा स्टम्पला बॉल लागूनसुद्धा विकेट पडलेली नाही.

चला तर मग मंडळी जाणून घेऊया काय मॅटर आहे नक्की...

आजवर वर्ल्डकपच्या तेरा मॅचेस झाल्या. त्यापैकी पाच मॅचेसमध्ये स्टंपला बॉल लागून पण प्लेयर आऊट झाला नाही. एकदा ठीक, दोनदा ठीक, पण असे ५ वेळा होत असेल तर बिचाऱ्या बॉलर्सना त्रास होणारच ना राव!! मंडळी, आता आधीच्या स्टंप जाऊन नविन स्टंप आल्या आहेत. त्यात इलेक्ट्रॉनिक बेल्स लावलेले असतात. म्हणजे बॉल स्टंपला लागला रे लागला की त्या बेल्स चमकतात. आता असे होते आहे की आपला बॉलर बिचारा लई जोरात बॉल फेकतो, बॉल बॅट्समनला चुकवून  स्टंपवर पण पडतो. पण और ये विकेट!! असे म्हणण्याऐवजी कमेंटेटर मात्र बॅट्समन को जीवदान म्हणत आहे. कारण क्रिकेटचा नियम असा आहे मंडळी, जोवर स्टंपवर लागलेल्या बेल्स खाली पडत नाहीत, तोवर प्लेयरला आऊट देता येत नाही. आता बेल्स पडत नाहीत हे पुन्हापुन्हा व्हायला लागल्यावर सगळ्यांचे लक्ष तिकडे गेले आहे. परवा या स्टंपला बॉल लागून पण बेल्स पडत नाही योजनेचा ताजा लाभार्थी ठरला ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर!!

सध्या आपल्या बॉलिंगने भल्याभल्यांना दिवसा तारे दाखवत असलेल्या जसप्रीत बुमराहचा बॉल लेग स्टंपला लागला. पण बेल्स मात्र इकडच्या तिकडेसुद्धा हलल्या नाहीत राव!! मंडळी, आता आपला बुमराह कसा बॉल फेकतो हे तुम्हाला माहित आहेच.  बुमराहच्या बॉलवर स्टंप जमिनीतून उखडून फेकला जाईल की काय असे वाटत असताना साध्या बेल्ससुध्दा पडत नाहीत म्हटल्यावर ये बात कुछ हजम नई हो रही.. या प्रकरणाला आता नवीन नाव मिळाले आहे  'बेलगेट'!! 

याच वर्ल्डकपमध्ये याआधी पण हे बेलगेट प्रकरण घडले आहे. 

न्यूझीलँड विरुद्ध श्रीलंकेच्या मॅच दरम्यान न्यूझिलँडच्या ट्रेंट बोल्टचा बॉल श्रीलंकेचा दिमुथ करूकरत्ने बॅट्समन बॅटिंग करत असताना स्टंपवर आदळला, बेल्स बऱ्यापकी हलल्या पण खाली काय पडल्या नाहीत राव!!

इंग्लड विरुद्ध साऊथ आफ्रिका दरम्यान ओव्हल येथे झालेल्या टूर्नामेंटच्या ओपनिंग मॅचमध्ये इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल राशीदने साऊथ आफ्रिकन बॅट्समन  क्विंटन डी कॉकचा ऑफ स्टंपला बॉल लागुन चक्क बाऊंडरीपार गेला. मंडळी, आता हे थोडं जास्तच घडले नाही का? आजवर बॅटचा हलकासा कट लागून बाऊंडरी जाणे नेहमीचे होते.  पण आता स्टंपला बॉल लागल्यावर विकेट न जाता थेट चौकार गेला.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्टइंडिज दरम्यान घडलेला किस्सा असा की ख्रिस गेलच्या बॅटला कट लागून गेलेला बॉल विकेट किपरने पकडला.  पण जेव्हा टीव्ही रिप्ले झाला त्यात समोर आले कि बॉल बॅटला नाही, तर स्टंपला लागला होता.

इंग्लंड विरुद्ध बांगलादेश दरम्यान झालेल्या मॅचमध्ये बांगलादेशी बॉलर मोहम्मद सैफुद्दीनने इंग्लंडचा बेन स्टोक्स खेळत असताना स्टंपचा निशाणा घेतला. बेल्स जागेवरून सरकल्या, पण खाली काय पडल्या नाही राव!! 

मंडळी, ही बॅट्समनसाठी खुशखबर वाटत असली तरी ही काय चांगली गोष्ट नाही हे सर्वांना माहीत आहे. कारण जर अटीतटीच्या मॅचमध्ये बेल्स न पडण्याचा फायदा एखाद्याला मिळाला तर तो समोरच्या टीमवर अन्याय असेल. 

ज्या झिंग बेल्समुळे हे सगळे घडत आहे त्या झिंग बेल्स आहेत तरी काय? याबद्दल तुमची उत्सुकता ताणली गेली असेल. मंडळी, २०१२  सालापासून या झिंगबेल्सचा उपयोग सुरू झालाय. आयसीसीने परवानगी दिल्यावर रीतसर झिंगबेल्सचा उपयोग क्रिकेटमध्ये करण्यात येऊ लागला. २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये सुद्धा या झिंगबेल्सचा वापर करण्यात आला होता. सध्या आयपीएल आणि ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीगमध्येही यांचा वापर करण्यात येतो. 

आता शंका अशी येतेय की एलईडी लाईट्समुळे बेल्सचे वजन तर वाढत नाही ना? किंवा मग स्टंपच्या वर असलेली खाच जास्त खोल असेल. यावर आयसीसीने म्हटले आहे झिंगबेल्सचे वजन जरी नॉर्मल बेल्सपेक्षा जास्त असले तरी खराब हवामानाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या बेल्सपेक्षा कमी आहे. 

एवढे असले तरी आयसीसीने मात्र आमचा झिंगबेल्स बदलण्याचा कुठलाच इरादा नसल्याचे जाहीर केले आहे. पण मात्र असे परत परत व्हायला लागल्यास आयसीसीवर दबाव वाढेल हे मात्र निश्चित...

तुम्हांला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं? तुमची मते आम्हांला नक्की कळवा..

सबस्क्राईब करा

* indicates required