अजित आगरकरचा २१ वर्षांनंतरही न मोडला गेलेला विक्रम!!

अजित आगरकर हा उत्कृष्ट खेळाडू अनेकांना आठवत असेल. भारताला लाभलेल्या क्वालिटीबाज ऑल राऊंडर्समध्ये त्याचे नाव वरच्या स्थानी घ्यावे लागेल. मुंबई आणि रमाकांत आचरेकर हे समीकरण वाचले तर सचिन तेंडुलकर हाच आपल्या डोळ्यांपुढे येतो. पण आगरकर हा देखील आचरेकर गुरुजींचा शिष्य होता.

आगरकरने भारताकडून वनडे, टेस्ट आणि T-20 या तिन्ही प्रकारात खेळाचे प्रदर्शन केले आहे. या काळात त्याने अनेक विक्रम केले, पण त्याचा एक विक्रम असा आहे जो सचिन, सेहवाग सारखे दिग्गज पण करू शकले नाहीत. तो विक्रम आहे वनडे सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा.

वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली आणि सुरेश रैना हे तीन खेळाडू वनडे सामन्यात सर्वाधिक स्ट्राईक रेट राखून आहेत. पण याही खेळाडूंच्या नावे हा सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम नोंदवला जाऊ शकलेला नाही. २००० साली भारत आणि झिम्बाब्वे समोरासमोर उभे ठाकले असताना या मराठमोळ्या खेळाडूने हा विक्रम केला होता.

अवघ्या २१ बॉल्समध्ये अर्धशतक झळकावत वनडेमध्ये सर्वाधिक वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम केला होता. त्याने कपिल देवचा १७ वर्षं जुना विक्रम मोडला होता. कपिल देवने १९८३ साली वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना २२ बॉल्समध्ये अर्धशतक केले होते.

अगरकरचा हा विक्रम आज २१ वर्ष होऊनही तुटू शकलेला नाही. गेल्या २० वर्षात अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले, पण या पठ्ठ्याचा हा विक्रम मात्र अबाधित आहे. आगरकर बॉलिंगमध्ये भारी करायचा. त्याने २३ सामन्यांत ५० विकेट घेत विक्रम केला होता.

तुम्हांला भारतीय खेळाडूंनी केलेले असे कोणते विक्रम आठवतात? कमेंटबॉक्समध्ये शेअर करा, चर्चा तर होईलच!!

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required