computer

या मेक्सिकन धावपटू आजोबांच्या कपड्यांना लावलेल्या टेडी बेअर्सचं काय रहस्य आहे?

मेक्सिकोमध्ये होणाऱ्या जवळजवळ सगळ्याच धावण्याच्या स्पर्धांमध्ये एक माणूस हमखास दिसतो. हा माणूस म्हणजे ६० वर्षांचे अलेआंद्रो अल पेलुचेस रुईझ(Alejandro “El Peluches” Ruiz). आता तुम्हाला वाटेल की ६० वर्षांचा आजोबा चक्क रेसमध्ये धावतोय म्हणून त्यांच्याबद्दल आम्ही सांगत आहोत.  पण त्यांच्या वयापेक्षा त्यांचं व्यक्तिमत्व जास्त प्रसिद्ध आहे राव!!

सुरुवात होते ती त्यांच्या लुकपासून. अलेआंद्रो हे तब्बल २० किलोचा रंगीबेरंगी सूट घालून प्रत्येक रेसमध्ये धावतात. त्यांच्या सूटवर तब्बल २०० टेडी बेअर्स लावलेले आहेत. ते टेडी बेअर्स लावलेली टोपी पण घालतात.

अलेआंद्रो वयाच्या १९ व्या वर्षापासून रेसमध्ये भाग घेत आहेत, पण त्यांना ही टेडी बेअरची हटके आयडिया १० वर्षापूर्वी सुचली. त्यांना रेसिंगमध्ये काहीतरी वेगळं करायचं होतं. मग काय त्यांनी अशी आयडिया शोधली. त्यांच्या सूटला पहिला टेडी चिकटवला तो एका लहान मुलाने. त्यानंतर आजवर त्यांच्याकडे २०० टेडी जमा झाले आहेत. यातले बरेचसे इतरांनी गिफ्ट म्हणून दिले आहेत. 

अलेआंद्रो  त्यांच्या  अशा विचित्र सूटसाठी तर ओळखले जातातच, पण त्याच बरोबर त्यांचा स्पर्धेतला वावरही त्यांना खास असतो. त्यांच्याकडे इतर स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी शिट्ट्या, प्लास्टिकचे ट्रम्पेट असतात. एवढंच नाही, तर जेव्हा रेसच्या एखाद्या अवघड टप्प्यावर इतर स्पर्धक हार मानतात तेव्हा या आजोबांकडे त्यावरही इलाज असतो. ते आपल्या सोबत एनर्जी बार, ॲस्पिरिन सारखी औषधं घेऊन आलेले असतात. अलेआंद्रो यांची एवढीच इच्छा असते की स्पर्धेत कोणी मागे राहू नये.

मंडळी, इतर लोकांसाठी धावणे हा त्यांचा छंद असू शकतो, पण अलेआंद्रो यांच्यासाठी ती एक जीवनशैली आहे.  ते अनाथ आहेत. त्यांना लहानपणापासून स्वतःच स्वतःची काळजी घ्यावी लागली. त्यांना खडतर आयुष्यापासून लांब नेलं ते त्यांच्या धावण्याच्या छंदाने. धावण्यात त्यांना समाधान लाभलं. तेव्हापासून आजवर त्यांनी धावणं सोडलेलं नाही. ते इतरांनाही यासाठी प्रेरित करतात.

हा अवलिया पोटापाण्यासाठी काय करतो ?

अलेआंद्रो घरोघरी टॉर्टिया म्हणजे  एक प्रकारची मेक्सिकन चपाती पोहोचवण्याचं काम करतात. इतर रेसर्सप्रमाणे ते जिममध्ये जात नाहीत किंवा घरच्याघरी व्यायामही करत नाहीत. त्यांचा ठराविक असं ‘डायट’ पण नाहीय. ते उलट भरपूर खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना ओळखणारे लोक त्यांच्या सडपातळ शरीराबद्दल नेहमीच आश्चर्य व्यक्त करत असतात. अलेआंद्रो म्हणतात की “माझं रोजचं काम हेच माझ्यासाठी व्यायाम आहे”

अलेआंद्रो यांचा अवतार बघितला तर त्यांना पूर्वी कोणी फारसं गंभीरपणे घेत नव्हतं. त्यांची थट्टा केली  जायची. या सगळ्यांकडे त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही. आज ते इतर रेसर्ससाठी प्रेरणादायी ठरत आहेत. मेक्सिकोमध्ये आणि विशेषतः लहानमुलांमध्ये ते चांगलेच प्रसिद्ध आहेत. जेव्हाजेव्हा ते स्पर्धेत  दिसतात तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होतो. स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी लोक त्यांना पैसेही पाठवतात. आज लोकांच प्रेम त्यांना भरभरून मिळत आहे.

मंडळी, मेक्सिको हा देशही काहीसा आपल्यासारखाच खेळांच्या बाबतीत काहीसा निरुत्साही देश आहे. अशावेळी अलेआंद्रोंसारखी माणसं लोकांना खेळाकडे वळवण्यासाठी प्रेरणादायी ठरतात.

सबस्क्राईब करा

* indicates required