computer

६ वर्षांत फक्त एक धाव घेणाऱ्या या श्रीलंकन खेळाडूने ६ डब्बल सेंच्युऱ्या मारल्या!!

कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा सर्व काही सोडून द्यावेसे वाटते. माणूस हार मानून बसतो. असे वाटते की बस आता खूप झाले, माझ्याकडून होणार नाही. पण जर तेवढा वेळ कळ काढली तर भविष्य वेगळे असते याची अनेक उदाहरणं आहेत. धोनी सिनेमात रेल्वे स्टेशनवर धोनीचा सिनियर सांगत नाही का, "बाऊन्सर्सना डक करता यायला हवे". आपल्याही आयुष्यात अनेक बाऊन्सर्स येत असतात. त्यांना डक केले की इतर बॉल्सवर सिक्स मारता येतात. आपल्या देशातील अप्रतिम कमेंटेटर हर्षा भोगले नेहमी एका अवलियाची गोष्ट सांगत असतो. या अवलीयाचा प्रवास आयुष्यात सर्व काही गमावून देखील पुन्हा उभारी घ्यायला प्रवृत्त करत असते.

ही गोष्ट आहे एका श्रीलंकन क्रिकेटपटूची!! त्याचे नाव आहे मार्वन अट्टापट्टू. डाव्या हाताने बॅटिंग करणाऱ्या या गडयाचा संघर्ष जबरदस्त आहे. कठोर परिश्रमानंतर त्याचे श्रीलंकन टीममध्ये सिलेक्शन झाले. पहिल्याच टेस्ट मॅचच्या पहिल्याच इनिंगमध्ये भावाला भोपळा पण फोडता आला नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये पण तेच शून्य!! जे व्हायचे तेच झाले, पुढच्या मॅचमध्ये त्याला टीममध्ये जागा मिळाली नाही. गडी मग कामाला लागला. रात्रंदिवस नेटमध्ये प्रॅक्टिस सुरु केली. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चांगले रन करायला लागला. म्हणून सिलेक्टर्सनी २१ महिन्यांनंतर त्याला पुन्हा टीममध्ये जागा दिली. यावेळी मात्र मागच्या वेळेपेक्षा चांगली कामगिरी त्याने केली. ती काय माहितीये? मागच्या वेळी शून्यावर आऊट झाला आणि यावेळी १ रन काढून आऊट झाला. अर्थातच त्याला पुन्हा टीममधून काढून टाकले. पण हा पठठया हार मानायला तयार नव्हता. मार्वन पुन्हा घाम गाळायला लागला. स्थानिक क्रिकेटमध्ये धावा गोळा करायला लागला.

सिलेक्टर्सना वाटले अजून एक चान्स देऊन बघू, म्हणून १७ महिन्यांनंतर त्याला परत बोलविण्यात आले. स्थानिक क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारा हा भाऊ पुन्हा एकदा शून्यावर आऊट झाला. ६ वर्षांत त्याच्या नावावर धावसंख्या होती फक्त १ रन!!!

ज्यांना थोडेफार पण क्रिकेट कळते त्यांना माहीत असेल एवढ्या वेळा चान्स दिल्यावर पुन्हा सिलेक्टर्सनी त्याला घेतले असते किंवा नसते. मात्र कुणीही हार मानली असती. आपल्याला काय जमत नाही बाबा म्हणत दुसरे काही केले असते.  पण ह्या भावाला माहीत होते, जर आज हार मानली तर एवढी वर्ष रात्रंदिवस गाळलेला घाम वाया जाणार आहे. जर आता मी मागे फिरलो तर इतिहास मला एक हरलेला माणूस म्हणूनच बघेल. मग काय, मार्वनभाऊ पेटून प्रॅक्टिसला लागला. पण वर्ष झाले, दोन वर्षे झाले, हा नुस्ता प्रॅक्टिस करतोय. पण सिलेक्टर्स काय बघायला तयार नाहीत. अनेकांनी त्याला सांगितले तुझ्या आधीच्या कामगिरीमुळे तुला काय परत घेत नाहीत भावा!! पण हे मात्र वेगळेच रसायन होते. जोवर सिलेक्टर्सना पुन्हा टीममध्ये जागा द्यायला भाग पाडत नाही तोवर प्रॅक्टिस सोडणार नाही असा चंगच त्याने बांधला. 

शेवटी तीन वर्षांनी त्याला टीममध्ये जागा मिळाली. गडी मैदानात उतरला. आणि काय कमाल, नुसता धावांचा पाऊस!! इथून पुढे त्याने काय मागे वळून पाहिले नाही. एक दोन नाही, तर तब्बल ६ डबल सेंच्युऱ्या त्याने मारल्या. 

पुढे जाऊन मार्वन श्रीलंकन टीमचा कॅप्टन झाला. एवढेच नाही, तर निवृत्त झाल्यावर श्रीलंकेचा कोच म्हणूनसुद्धा त्याने काम पाहिले. मार्वनची कहाणी वाचल्यावर तुम्हाला एवढे तर कळले असेल की जर स्वतःवर विश्वास असला तर माणूस कशाही परिस्थितीत परत उभा राहू शकतो.

सबस्क्राईब करा

* indicates required