'राईट हॅंड' ऑफ सुनील गावस्कर! ज्याने ६७१ मिनिटे फलंदाजी करत काढला पाकिस्तानी गोलंदाजांचा घाम..

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड( Anshuman Gaikwad) आज (२३ सप्टेंबर) आपला ७० वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या ४० कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सुनील गावस्करांच्या राईट हॅंडची भूमिका पार पाडली होती. सुनील गावस्करांसोबत मिळून त्यांनी अनेकदा भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. आपल्या डिफेंसिव फलंदाजीच्या बळावर ते विरोधी संघातील गोलंदाजांना अक्षरशः रडवून सोडायचे. हेच कारण होते की, त्यांना द वॉल देखील म्हटले जायचे. वेस्ट इंडीज संघातील आक्रमक आणि वेगवान गोलंदाजांचा सामना करताना ते तासंतास खेळपट्टीवर टिकून राहायचे.

मॉडर्न डे क्रिकेटमध्ये राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा सारख्या खेळाडूंना द वॉल म्हटले जाते. मात्र अंशुमन गायकवाड यांची बातच काही और होती. १९८३-९४ मध्ये पाकिस्तान विरुध्द झालेल्या सामन्यात त्यांनी २०१ धावांची खेळी केली होती. तसं दुहेरी शतक झळकावणारे अनेक फलंदाज आहेत. मग या खेळीत असं काय खास होतं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर हे दुहेरी शतक त्यांनी ६७१ मिनिटे फलंदाजी करून झळकावले होते. त्यावेळी हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात संथ गतीने केलेले दुहेरी शतक होते.

वेस्ट इंडीज विरुध्द केली होती धाडसी खेळी...

१९७६ मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर भारतीय संघाने इतिहास रचला होता. या सामन्यात भारतीय संघाने ४०३ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. आता तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत झाल्यानंतर चौथ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज संघातील गोलंदाज भडकले होते. त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या रणनितीमध्ये थोडा बदल केला होता. त्यांनी फलंदाजांच्या अंगावर मारा करायला सुरुवात केली. या सामन्यात मायकल होल्डींगचा चेंडू अंशुमन गायकवाड यांच्या कानाला जाऊन लागला होता. मारा इतका भेदक होता की, अंशुमन गायकवाड यांना मैदान सोडावं लागलं होतं. मात्र त्यांनी ८१ धावांची खेळी करत भारताला मजबूत स्थितीत आणले होते. 

अशी राहिली कारकीर्द..

अंशुमन गायकवाड यांनी १७ डिसेंबर १९७४ रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या सामन्यात पदार्पण केले होते. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण ४० कसोटी सामने खेळले होते. यादरम्यान त्यांनी ३०.०७ च्या सरासरीने १९८५ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्यांनी २ शतके आणि १० अर्धशतके झळकावली होती. २०१ धावा ही त्यांची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी आहे. तसेच त्यांनी भारतीय संघासाठी १५ वनडे सामने देखील खेळले होते. यादरम्यान त्यांनी २०.६९ च्या सरासरीने २६९ धावा केल्या होत्या.

सबस्क्राईब करा

* indicates required