computer

भारताचा क्रिकेटमधला विजय जेव्हा एका ब्रिटिश संपादकाला त्याचा लेख चक्क खायला भाग पाडतो, माहिती आहे का हा भन्नाट किस्सा ??

१९८३ सालच्या भारतीय क्रिकेट टीमकडून कोणालाही फारशा अपेक्षा नव्हत्या. कोणीही सहज म्हटलं असतं की भारतीय टीम कधीच वर्ल्डकप जिंकू शकणार नाही. पण जेव्हा २५ जून १९८३ साली भारताने वर्ल्डकप जिंकला तेव्हा सर्वांनाच समजलं की आपण यांना कमी लेखून फार मोठी चूक केली आहे. हा धडा एका माणसाला आयुष्यभर आठवणीत राहिला.

चला तर आज ८३ सालचा हा किस्सा वाचूया.

भारतीय संघाचा १९८३ पूर्वीचा खेळ फारच सुमार दर्जाचा होता. त्यामुळे क्रिकेटच्या तज्ञांचं भारतीय टीम बद्दलचं मत फारसं चांगलं नव्हतं. अशाच तज्ञ व्यक्तींपैकी एक होते डेव्हिड फ्रीथ. Wisden Cricket Monthly या मासिकाचे ते संपादक होते. मासिकाच्या एका लेखात त्यांनी भारतीय टीमवर वाईट टीका केली होती. “अशा टीमला वर्ल्डकपसाठी खेळूच दिलं नाही पाहिजे. ह्यामुळे खेळाचा दर्जा घसरतो.” एवढंच नाही तर “भारतीय टीम जिंकेल हे शक्यच नाही. जर असं झालं तर मी माझे शब्द खाईन” असंही ते म्हणाले होते. इंग्रजीत eat your words अशी एक म्हण आहे. ज्याचा अर्थ होतो तुम्ही चुकीचं म्हणाला होता हे मान्य करणे. शब्दशः “शब्द खाणे” नव्हे.

तर, सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे कोणालाही भारत जिंकेल अशी अपेक्षा नव्हती, पण भारताने वर्ल्डकप जिंकला. तेव्हा Wisden Cricket Monthly च्या वाचकांपैकी एकाने डेव्हिड फ्रीथ यांना विनंती केली की तुम्ही जे म्हणाला होता ते करण्याची आता वेळ आली आहे. म्हणजे “स्वतःचे शब्द खाण्याची वेळ आली आहे”....

पुढे अमेरिकेत राहणाऱ्या ‘मान सिंग’ या व्यक्तीने पण त्यांना पत्र लिहून आपले शब्द मागे घ्यायची मागणी केली, पण मान सिंगने इथेच न थांबता त्यांना शब्दशः त्यांचं वाक्य खायला सांगितलं.

मान सिंगची मागणी विचित्र होती. डेव्हिड फ्रीथ सारखा बडा संपादक हे मान्य का करेल, पण डेव्हिड फ्रीथ यांनी हे खेळाडू वृत्तीने घेतलं. त्यांनी लवकरच एक मोठा लेख लिहिला आणि आपले शब्द खाल्ले. राव, त्यांनी ज्या मासिकात भारतीय टीमवर टीका केली होती त्या मासिकाचे पान खरोखर खाल्ले होते.

मासिकाचे पान खातानाचा त्यांचा फोटो आणि मान सिंग याने लिहिलेला एक लेख दोन्ही दुसऱ्या दिवशी मासिकात छापून आले. हा पहा तो फोटो.

मंडळी, ८३ च्या वर्ल्डकपने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलाला आणि डेव्हिड फ्रीथ सारख्या तज्ञांच्या ज्ञानात भर घातली. डेव्हिड फ्रीथ सारख्या मोठ्या संपादकाने नमतं घेतलं हा त्यांचाही मोठेपणा होता हे मान्य करायलाच पाहिजे.

सबस्क्राईब करा

* indicates required