आजच्याच दिवशी भारताने 'गाबा'चा 'ताबा' मिळवत रचला होता इतिहास! रिषभ, शुभमन सह हे खेळाडू ठरले होते हिरो...

गाबाच्या मैदानावर जोश हेजलवूडने टाकलेला चेंडू अन् त्यावर रिषभ पंतने मारलेला चौकार.. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताच, मैदानात धावत येत असलेले भारतीय खेळाडू.. सर्व कसं जणू आत्ताच घडलंय असं वाटतं. मात्र या ऐतिहासिक घटनेला आज २ वर्ष पूर्ण झाली आहेत. १९ जानेवारी हा तो दिवस आहे ज्यादिवशी युवा भारतीय खेळाडूंनी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया संघाला गाबाच्या मैदानावर पाणी पाजलं होतं.  

भारतीय संघासाठी हा दौरा वाटतो तितका सोपा नव्हता. पहिल्याच सामन्यात ३६ धावांवर ऑल आऊट होणं. विराट कोहली पितृत्व रजा घेत माघारी परतला, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा सारखे खेळाडू दुखापतग्रस्त झाले. मात्र युवा भारतीय खेळाडूंनी खचून न जाता ऑस्ट्रेलिया संघाला चांगलाच धडा शिकवला.

सिडनीच्या मैदानावर जेव्हा मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू होता, त्यावेळी यष्टीमागे असलेल्या कर्णधार टीम पेनने अश्विनला चेतावणी दिली होती. ती चेतावणी अशी की, "गाबाच्या मैदानावर या .." गाबाच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया संघाचा दबदबा होता. कारण या मैदानावर सलग ३२ वर्षे ऑस्ट्रेलिया संघाला कुठलाही संघ पराभूत करू शकला नव्हता. सिडनी कसोटी सामना बरोबरीत सुटल्यानंतर जेव्हा दोन्ही संघ गाबामध्ये पोहचले त्यावेळी मालिकेची स्थिती १-१ अशी होती.

 ऑस्ट्रेलिया संघाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कारण भारतीय संघातील खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. हनुमा विहारी आणि आर अश्विन दुखापतग्रस्त झाल्यानंतर प्लेइंग ११ मध्ये कोणाला संधी द्यायची हा प्रश्न उपस्थित झाला होता. शेवटी कर्णधार अजिंक्य रहाणेने नेट गोलंदाजांना संघात स्थान देण्याचा धाडसी निर्णय घेतला. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने ३६९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना, भारतीय संघाचा डाव ३३६ धावांवर संपुष्टात आला. या डावात भारतीय संघाकडून शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुदंर यांनी मिळून भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. सातव्या विकेटसाठी दोघांनी १२३ धावांची भागीदारी केली. 

ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात ३३ धावांची आघाडी मिळाली होती. तर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारतीय संघासमोर ३२८ धावांचे आव्हान ठेवले. चौथ्या दिवशी पावसामुळे जास्त षटकांचा खेळ होऊ शकला नव्हता. त्यामुळे भारतीय संघाला शेवटच्या दिवशी ३०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करायचा होता. सामना बरोबरीत आणायचा की जिंकायचा? असा प्रश्न भारतीय संघासमोर उपस्थित झाला होता. भारतीय संघाने दुसरा मार्ग निवडला. एकीकडे चेतेश्वर पुजारा अडून उभा राहिला. तर दुसऱ्या बाजूने फलंदाजांना मनसोक्त फटकेबाजी करण्यासाठी हिरवे कंदील मिळाले. 

शुभमन गिल ९१ धावांची खेळी करत माघारी परतला. तर रोहित शर्मा १८ आणि अजिंक्य रहाणे देखील स्वस्तात माघारी परतला. एकीकडे विकेट्स जात होत्या तर एकीकडे मोठे आव्हान समोर होते. चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांनी भागीदारी करत डाव सावरला. इथून सामन्याचा निकाल लागणार होता. कारण हे दोघे मैदानावर टिकून राहिले. तर एकतर सामना बरोबरीत सुटणार किंवा भारताचा विजय होणार. मात्र चेतेश्वर पुजाराने ५६ धावांवर रिषभ पंतची साथ सोडली. 

असे वाटू लागले होते, आता तर सामनाही गेला आणि मालिकाही गेली. मात्र त्यानंतर वॉशिंग्टन देवदूत बनून भारतीय संघासाठी धावून आला. रिषभ पंत सोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. अवघ्या २९ चेंडूंचा सामना करत त्याने २२ धावा केल्या. तर रिषभ पंतने नाबाद ८९ धावांची खेळी केली. ९७ वे षटक सुरू असताना रिषभ पंतने हेजलवूडच्या चेंडूवर चौकार मारला आणि भारताने ऑस्ट्रेलियाचा तोंडचा घास हिसकावत ऐतिहासिक विजय मिळवला.

सबस्क्राईब करा

* indicates required