१५ नोव्हेंबर अन् सचिनचं खास कनेक्शन!! आजच्याच दिवशी सुरुवात आणि केला होता कारकीर्दीचा शेवट...

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने आजच्याच दिवशी १९८९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. वयाच्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सचिन तेंडुलकर पुढे क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याला ही संधी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध खेळताना मिळाली होती.
सचिन तेंडुलकरने कराचीच्या मैदानावर पाकिस्तानविरुध्द पदार्पण केले होते. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. भारतासाठी त्याने २०० कसोटी सामने खेळले. २४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत त्याने ५३.७८ च्या सरासरीने १५९२१ धावा केल्या. यादरम्यान त्याने ५१ शतके आणि ६८ अर्धशतके झळकावली. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने ४९ शतके ८६ अर्धशतके झळकावली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे एकूण १०० शतकांची नोंद आहे.
सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची मिळाली संधी...
जेव्हा सचिन तेंडुलकरने भारतीय संघासाठी पदार्पण केले होते त्यावेळी भारतीय संघाचे कर्णधारपद के श्रीकांतच्या हाती होते. सामन्यातील पहिल्या डावात पाकिस्तान संघाने ४०९ धावा करत भारतीय संघाला बॅकफुटवर टाकले होते. या सामन्यात अशी देखील स्थिती निर्माण झाली होती, जेव्हा भारतीय संघाचे ४१ धावांवर ४ फलंदाज माघारी परतले होते. मनोज प्रभाकर बाद झाल्यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सचिन तेंडुलकर मैदानावर आला होता. त्याने २४ चेंडूंचा सामना करत २ चौकारांच्या साहाय्याने १५ धावा केल्या होत्या. तसेच त्याने मोहम्मद अजहरुद्दिन सोबत मिळून ३२ धावांची भागीदारी देखील केली होती.
सचिन तेंडुलकरला ज्या गोलंदाजाने बाद केले होते, जो गोलंदाज देखील आपला पहिला सामना खेळत होता. तो गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून वकार युनूस होता. वकारने अप्रतिम इन्स्विंग चेंडू टाकून त्याला क्लीन बोल्ड केले होते. भारतीय संघाने या सामन्यातील पहिल्या डावात २६२ धावा केल्या होत्या.
दुसऱ्या डावात नाही मिळाली फलंदाजी करण्याची संधी...
पाकिस्तानने आपला दुसरा डाव ३०५ धावांवर घोषित केला आणि भारताला ४५३ धावांचे लक्ष्य मिळाले. भारताने धावांचा पाठलाग करताना ३०३ धावा केल्या होत्या. हा सामना अनिर्णीत राहिला.मात्र सचिनला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. हा कपिल देव यांचा १०० वा कसोटी सामना होता.
सचिनच्या नाकाला लागला होता चेंडू...
वकार युनूसने या कसोटी मालिकेबाबत बोलताना म्हटले होते की, "पहिला कसोटी सामना कराचीत होता आणि मी त्याला (सचिनला) लवकर बाद केले होते. मला वाटते की त्याने १५ धावा केल्या असतील. त्याने आपल्या छोट्या खेळीत दोन चांगले ऑन आणि स्ट्रेट ड्राईव्ह शॉट मारले. त्या मालिकेत त्याने सियालकोटच्या ग्रीन टॉप विकेटवर अर्धशतक (५७) झळकावले होते. या डावाच्या सुरुवातीलाच त्याच्या नाकावर चेंडू लागला. १६ वर्षांचा मुलगा...दुखापतीनंतर पूर्णपणे फिकट गुलाबी झाला होता, परंतु तो खूप मजबूत होता."
शेवटची खेळी देखील आजच्याच दिवशी...
निव्वळ योगायोग म्हणजे सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधील शेवटची खेळी देखील आजच्याच दिवशी केली होती. वानखेडेच्या मैदानावर १४ नोव्हेंबर २०१३ रोजी कसोटी सामना सुरू झाला होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ डिसेंबर रोजी त्याने ७४ धावांची खेळी केली होती. यासह २४ वर्षानंतर त्याने कसोटी क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला होता.