On this day: आजचा दिवस क्रिकेट रसिकांसाठी वाईट का आहे? काय घडलं? घ्या जाणून

आजचा दिवस हा क्रिकेट चाहत्यांसाठी अत्यंत वाईट दिवसांपैकी एक आहे. कारण आजच्याच दिवशी क्रिकेट विश्वातून एक दिग्गज क्रिकेटपटूने निरोप घेतला होता. हा दिग्गज क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नसून फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा शेन वॉर्न आहे. ५२ वर्षीय शेन वॉर्न थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असताना, त्याला हृदय विकाराचा झटका आला होता.

शेन वॉर्न त्यावेळी एका व्हीलामध्ये होता. तो आपल्या मित्रांसह सुट्ट्यांचा आनंद घेत होता. मात्र अचानक त्याला हृदय विकाराचा झटका आला ही घटना घडल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला वाचवायचा प्रयत्न केला होता. मात्र ते अपयशी ठरले होते.

शेन वॉर्नला संपूर्ण क्रिकेट विश्वासह जगातील असंख्य क्रिकेट चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर ३० मार्च रोजी मेलबर्नच्या मैदानावर एका खास कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला होता. या मैदानावर असलेल्या सादर्न स्टँडचे नाव बदलून शेन वॉर्न स्टँड ठेवण्यात आले होते. यापूर्वी देखील त्याच्या कुटंबीयांनी श्रध्दांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ज्यावेळी ही दुःखद बातमी समोर आली,त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर होता. दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होती. ही बातमी येताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मैदानात उतरले त्यावेळी त्यांनी शेन वॉर्नला श्रद्धांजली देण्यासाठी दंडावर काळी पट्टी बांधली होती. यासह पाकिस्तान संघातील खेळाडूंनी देखील दंडावर काळया रंगाची पट्टी बांधली होती.

भारतीय संघाविरुद्ध केले होते पदार्पण..

शेन वॉर्नने आपले कसोटी पदार्पण १९९२ रोजी भारतीय संघाविरुद्ध खेळताना सिडनीच्या मैदानावर केले होते. असे म्हटले जाते की, त्यावेळी फिरकी गोलंदाज खूप कमी होते. फिरकी गोलंदाजी लुप्त होत असताना, शेन वॉर्नने नवी क्रांती घडवून आणली होती. त्याला पाहून अनेक गोलंदाज फिरकी गोलंदाजी करण्यासाठी प्रेरित झाले होते. केवळ ऑस्ट्रेलियामध्ये नव्हे तर ऑस्ट्रेलियाच्या बाहेर जाऊनही त्याने अप्रतिम कामगिरी केली.

ॲशेस मालिकेत शेन वॉर्नने टाकलेला चेंडू आजही कोणी विसरू शकत नाही. पहिल्याच चेंडूवर त्याने इंग्लडचा फलंदाज माईक गेटिंगची दांडी गुल केली होती. लेग स्टंपला टप्पा पडलेला चेंडू टप्पा पडताच इतका फिरला की तो ऑफ स्टंप उडवून गेला. हा चेंडू 'बॉल ऑफ द सेंच्युरी' ठरला होता.

काय वाटतं, असा कोणता गोलंदाज आहे जो शेन वॉर्नच्या बॉल ऑफ द सेंच्युरी चेंडूची पुनरावृत्ती करू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required