आजच्याच दिवशी वेस्ट इंडिजने जिंकला होता पहिला वर्ल्डकप,क्लाईव्ह लॉयडने उंचावली होती ट्रॉफी...

सहा फूट आठ इंच हाईट, चेंडू टाकताना हात दोन फूट उंच जातो, उडी मारल्यानंतर बारा फूट उंचीवरून चेंडू येतो. हा डायलॉग कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय ना? नक्कीच, कपिल देव यांच्या जीवनावर आधारित ८३ चित्रपटात ऐकला असेल. त्या वेळचा वेस्ट इंडिज संघ कसा होता, हे सांगणारा प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. उंच काठीचे गोलंदाज, विस्फोटक फलंदाज असा हा वेस्ट इंडीज संघ आजच्याच दिवशी १९७५ मध्ये (1975 world cup) (२१ जून ) विश्वचषक स्पर्धेचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या ऐतिहासिक विजयाला ४७ वर्ष पूर्ण झाली आहेत. (West Indies) 

२१ जून १९७५ हा तोच दिवस आहे जो कुठलाही क्रिकेट चाहता विसरू शकणार नाही. याच दिवशी विश्व क्रिकेटला पहिला विश्वविजेता संघ मिळाला होता. अंतिम सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडिज संघाने ऑस्ट्रेलिया संघाला १७ धावांनी पराभूत करत इतिहास रचला होता. त्यावेळी क्लाईव्ह लॉयडने पहिल्यांदा विश्वचषकाची ट्रॉफी उंचावली होती.

या विश्वचषक स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज संघाला कोणत्याही संघाने पराभूत केले नव्हते. सेमी फायनलच्या सामन्यात बलाढ्य न्यूझीलंड संघाला पराभूत करत वेस्ट इंडिज संघाने अंतिम फेरी गाठली होती. टॉस उडवला गेला, तो पडला ऑस्ट्रेलिया संघाच्या दिशेने. मात्र क्लाईव्ह लॉयडने आपल्या नेतृत्वाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने घेतलेला निर्णय चुकीचा ठरवला होता.

नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघाला चांगली सुरुवात करता आली नव्हती. धावसंख्या ५० असताना संघातील ३ फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर क्लाईव्ह लॉयडने रोहन कन्हाई सोबत मिळून १४९ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघ केवळ अडचणीतून बाहेर नाही आला तर एक मोठी धावसंख्या देखील उभारली गेली. क्लाईव्ह लॉयडने ८५ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि २ षटकारांचा साहाय्याने १०२ धावांची तुफानी खेळी केली होती. तर कन्हाईने साथ देत ५५ धावा केल्या होत्या. या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाने २९१ धावा केल्या होत्या. 

वेस्ट इंडिज संघाने दिलेल्या २९२ धावांचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलिया संघातील ५ फलंदाज तंबूत परतले होते.ज्यात कर्णधार इयान चॅपलने ६२ तर एलन टर्नरने ४० धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी गमावले होते. मात्र ऑस्ट्रेलिया संघाला हे आव्हान पूर्ण करता आले नाही. वेस्ट इंडीज संघाने हा सामना १७ धावांनी आपल्या नावावर केला होता. 

वेस्ट इंडीज संघाने १९७५ मध्ये विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर १९७९ विश्वचषक स्पर्धेत देखील विजय मिळवला होता. त्यानंतर १९८३ विश्वचषक स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक करण्याची संधी असताना भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाचे स्वप्नं मोडले होते.

सबस्क्राईब करा

* indicates required