computer

क्रिकेटच्या 'कुकाबुरा' चेंडूवर एवढे वाद का होत आहेत ? हा कुकाबुरा चेंडू असतो तरी कसा ??

मंडळी, सध्या जगभर विश्वचषकाचीच हवा आहे. घराघरातून सीरीयल्सच्या डायलॉग्सऐवजी मॅचची कॉमेंट्री ऐकू येतेय. सगळं वातावरण क्रिकेटमय झालंय. पण दरवेळी कोणत्या ना कोणत्या बाबतीत प्रॉब्लेम असतोच. आत्ता एलईडी बेल्स चर्चेत आहेतच, पण आणखीन एक मुद्द्यावर वाद चालू आहेत. आणि तो म्हणजे विश्वचषकात वापरला जाणारा चेंडू. ह्या चेंडूवर आत्तापर्यंत अनेकजणांनी आक्षेप घेतलेले आहेत. काय आहेत हे आक्षेप? जाणून घेऊया आजच्या लेखात...

विश्वचषकात वापरला जाणारा चेंडू कुकाबुरा ह्या नावाने ओळखला जातो. हे चेंडू ऑस्ट्रेलियातल्या कुकाबुरा कंपनीतर्फे उत्पादित केले जातात. हे चेंडू इंग्लंड, भारत आणि वेस्ट इंडीज हे देश वगळता सर्वत्र वापरले जातात. इंग्लंड आणि वेस्ट इंडीजमधे ड्यूक कंपनीचे चेंडू वापरले जातात, तर भारतात एसजी कंपनीचे चेंडू वापरण्यावर भर असतो. आज आपण कुकाबुरा चेंडूवरचे आक्षेप बघताना या तिन्ही चेंडूंची थोड्याफार प्रमाणात तुलनासुद्धा करणार आहोत.
 

आक्षेप क्र.१: चेंडूची शिवण लवकर खराब होते.

एसजी आणि ड्यूक कंपनीच्या चेंडूची शिवण संपूर्णत हाताने शिवलेली असते, तर कुकाबुरा चेंडूची शिवण ही संपूर्णत हाताने शिवलेली नसते. त्यातील फक्त दोनच टाके हाताने घातलेले असतात. ह्याचाच परिणाम म्हणून शिवण लवकर खराब होते. ह्याचा सगळ्यात जास्त परिणाम मुख्यत: बोटांनी चेंडू वळवणार्या फिरकी गोलंदाजांवर (Finger Spinners) होतो. ह्या फिरकीपटूंना ग्रिप मिळणं अत्यंत मुष्किल होतं. तसंच त्यांना चेंडू स्पिन करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यांच्या तुलनेत मनगटाने चेंडू वळवणारे फिरकीपटू (Wrist Spinners) कुकाबुरा चेंडूबरोबर जास्त चांगली कामगिरी करू शकतात.

आक्षेप क्र.२: चेंडू लवकर फाटतो.

ह्याचं उत्तर चेंडू तयार करण्यासाठी कोणतं मटेरियल वापरतात ह्यात दडलंय. ड्यूक कंपनीचे चेंडू हे घोड्याच्या कातडीपासून बनवले जातात आणि कुकाबुरा चेंडू गायीच्या कातडीपासून तयार केले जातात. परिणामी कुकाबुरा चेंडू फार काळ टिकू शकत नाहीत.

आक्षेप क्र.३: चेंडू स्विंग होत नाही.

ह्या बाबतीत अनेक क्रिकेटपटूंचं एकमत आहे. साऊथ आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ त्याच्या एका मुलाखतीत म्हणाला होता, की ‘कुकाबुरा चेंडू फार लवकर सॉफ्ट होतो आणि २०-३० ओव्हर्सनंतर स्विंग होत नाही’. भारतीय जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेसुद्धा मागच्या वर्षी झालेल्या साऊथ आफ्रिकेच्या दौर्यावर असताना कुकाबुरा चेंडूबद्दल नाराजी व्यक्त केली होती. “आम्हाला, विशेषत जलदगती गोलंदाजांना साऊथ आफ्रिकेच्या खेळपट्टीवर जास्त विकेट्स मिळतील अशी अपेक्षा आहे. पण कोणतीही खात्री देता येत नाही, कारण कुकाबुरा चेंडू गोलंदाजांची अजिबात मदत करत नाही. २५-३० ओव्हर्सनंतर ह्या चेंडूने गोलंदाजी करणं कठीण असतं”, ह्या शब्दात त्याने नाराजी व्यक्त केली. कुकाबुरा चेंडू स्विंग करण्यासाठी पिचवर जोरात आपटावा लागतो. त्यामुळे गोलंदाजांना चेंडू स्विंग करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. ह्याकारणास्तव फलंदाजांना कुकाबुरा चेंडूने खेळणं जास्त फायदेशीर ठरतं.

आत्तापर्यंत ह्या चेंडूवर असे अनेक आक्षेप घेतले गेलेले आहेत. आता काय खरं आणि काय खोटं ते देवालाच ठाऊक, पण ह्या बॉलपासून जरा बचके रहना रे बाबा!

आमचा हा लेख कसा वाचला ते आम्हाला जरूर कळवा!

 

लेखक : प्रथमेश बिवलकर

सबस्क्राईब करा

* indicates required