computer

IPLचं टायटल स्पॉन्सरशीप मिळवणारी 'ड्रिम११' काय आहे? तिचं चायना कनेक्शन आणि सट्टेबाजी प्रकरण काय आहे?

भारत-चीन वादानंतर आयपीएलच्या 'टायटल स्पॉन्सर'मधून विवोने काढता पाय घेतला आहे. यानंतर टायटल स्पॉन्सरशिप कोणाकडे जाणार यावरून रस्सीखेच सुरु झाली. बायजू, अनअकॅडमी, टाटा उद्योग समूह आणि ड्रीम 11 या स्पर्धकांत मोठी चुरशीची स्पर्धा होती. आता ड्रीम11 ने प्रायोजकत्वासाठी २२२ कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शवून आयपीएलची 'टायटल स्पॉन्सरशीप' मिळवली आहे.

प्रथम आयपीएल म्हणजे इंडियन प्रिमियर लीगचे 'टायटल स्पॉन्सर' असणे म्हणजे काय ते समजून घेऊया. टायटल स्पॉन्सर म्हणजे एखाद्या कंपनीचे नाव संपूर्ण कार्यक्रमाला जोडले जाणे. यासाठी जे पैसे मोजले जातात त्याचा मोबदला म्हणजे त्या कंपनीला मिळणारी प्रसिध्दी. गेल्या वर्षी आयपीएलची ओळख विवो आयपीएल होती, ती यावर्षी ड्रीम11-आयपीएल अशी असेल. गेल्या वर्षी विवोने याच प्रायोजकत्वासाठी ४३९ कोटी मोजले होते. ड्रीम11 ला हा सौदा २२२ कोटींत म्हणजे स्वस्तात पडला आहे असे सध्यातरी दिसते आहे.

यंदाचे आयपीएल सामने १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान UAE मध्ये होणार आहेत. ड्रीम11 ने २२२ कोटी रुपयांची बोली लावून टायटल स्पॉन्सरशीप मिळवली आहे. हा सौदा केवळ यावर्षीच्या आयपीएलपुरता मर्यादित राहणार आहे. विवोच्या एक्झिटमुळे बीसीसीआयला तोटा झाला असला तरी त्यांच्या समोर दुसरा पर्याय शिल्लक नाही.

पण आतापर्यंत ज्या ड्रीम11 चे नाव फारसे कानावर पडले नव्हते ती कंपनी नक्की काय आहे? फँटसी गेमिंग म्हणजे काय? ड्रीम11 वर सट्टा खेळता येतो हे खरे आहे का? आणि चीनी कंपनी टेन्सेंटचे यात काय कनेक्शन आहे ? या सगळ्या गोष्टी आजच्या लेखातून जाणून घेऊया.

ड्रीम 11 ची स्थापना २०१२ साली हर्ष जैन आणि भावित शेठ यांनी केली. हर्ष जैन कोण हे तुम्हाला नक्कीच माहिती नसेल, पण हे हर्ष जैन म्हणजे आनंद जैन यांचा मुलगा. आणि आनंद जैन म्हणजे रिलायन्सचे मुकेश अंबानी यांचा उजवा हात!!

ड्रीम 11 पार्टनर्सच्या यादीत आयपीएल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC), राष्ट्रीय बास्केटबॉल संघटना (NBA) अशा मातब्बर संस्था आहेत. ड्रीम 11च्या युझर्सची वाढणारी संख्या बघितली तर ती प्रत्येक वर्षी दुप्पट होत गेली आहे. २०१४ साली १० लाख तर, २०१६ साली २० लाख आणि २०१८ पर्यंत ४० लाख लोक ड्रीम 11 चे युझर्स होते. २०१९ साली ड्रीम 11 युनिकॉर्न अशी ओळख मिळवणारी पहिली भारतीय गेमिंग कंपनी ठरली.

(हर्ष जैन आणि भावित शेठ)

युनिकॉर्न म्हणजे काय ते थोडक्यात समजून घेऊ. युनिकॉर्न ही एक संज्ञा आहे. १ अब्ज डॉलर्स एवढी उलाढाल असणाऱ्या स्टार्टअप कंपनीला युनिकॉर्न म्हटलं जातं. हे पद मिळवण्यासाठी ड्रीम 11ला स्टिडव्ह्यू कॅपिटल या गुंतवणूक कंपनीकडून तब्बल ६० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक आणावी लागली होती. ड्रीम 11 आणि त्यांच्या गुंतवणूकदार कंपन्यांबद्दल आपण बोलूच, पण आधी ड्रिम११ च्या कामाची ओळख करून घेऊ.

ड्रिम११ कंपनी नक्की काय करते ?

ऑनलाईन गेमिंग तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. मग या फँटसी गेमिंगमध्ये काय वेगळं आहे? फँटसी गेमिंग म्हणजे खऱ्या आयुष्यात होणाऱ्या सामन्यातील खेळाडूंना निवडून तुम्ही तुमची स्वतःची स्पोर्ट्स टीम तयार करू शकता. टीम निवडताना तुम्हाला मिळालेल्या १०० क्रेडीट पॉइंट्सच्या मर्यादेतच तुम्हाला निवड करता येते. खेळाडू फॉर्ममध्ये असेल तर त्याच्यासाठी जास्त पॉइंट्स खर्च होतात तर फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूसाठी कमी! म्हणजे थोडक्यात आयपीएलच्या लिलाव बोलींसारखंच काहीसं!

तुम्ही निवडलेल्या खेळाडूंनी खऱ्या सामन्यात दाखवलेल्या खेळीच्या जोरावर तुमच्या खात्यात पॉइंट्स कमी जास्त होत राहतात. ड्रीम 11 मध्ये तुम्हाला क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, बेसबॉल अशी खेळांची मोठी रेंज मिळते. यात मोफत आणि पैसे देऊन अशा दोन्ही प्रकारे तुम्हाला खेळता येतं. जिंकणाऱ्याला बक्षीस म्हणून रोख रक्कमही मिळते. ड्रीम 11 मध्ये खेळण्यासाठी व्यक्तीचं वय १८ असणं आवश्यक आहे. सदस्य नोंदणी करताना पॅनकार्डद्वारे युझर व्हेरिफिकेशन केलं जातं.

ड्रीम 11ची सगळी भिस्त ही वर्ल्डकप, आयपीएलसारख्या सामन्यांवर असते. या सामन्यांच्या दरम्यान मोठा नफा कमावता येतो. यावर्षी आयपीएल सामने रद्द झाल्यानंतर ड्रीम 11ला आपला गाशा गुंडाळावा लागतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती, पण म्हणतात पंत गेले आणि राव चढले. आयपीएलमधून विवो बाहेर पडली आणि ड्रीम 11ने बाजी मारली. ड्रीम 11 ला येत्या आयपीएल सामन्यातून प्रचंड नफा होणार हे ठरलेलंच आहे.

आता वळूया ड्रीम 11च्या गुंतवणूकदारांकडे!!

६० मिलियन डॉलर्स आणणाऱ्या स्टिडव्ह्यू कॅपिटलशिवाय ड्रीम 11 मध्ये ४ आणखी गुंतवणूक कंपन्यांचे पैसे लागलेले आहेत. कलारी कॅपिटल,टेनसेंट होल्डींग, मल्टीपल ऑल्टरनेटीव्ह अ‍ॅसेट मॅनेजमेंट थिंक इन्व्हेस्टमेंट या त्या चार कंपन्या. यापैकी टेनसेंट होल्डींग या कंपनीमुळे सध्या दबक्या आवाजात का होईना, पण वाद सुरु आहे. टेनसेंट होल्डींग कंपनी चीनी गुंतवणूक कंपनी आहे. पण ड्रीम 11च्या मालकांचं म्हणणं आहे की ड्रीम 11 पूर्णपणे भारतीय कंपनी आहे. आता तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ड्रीम 11 भारतीय कंपनी असल्याचा मुद्दा उचलून धरला आहे.

ड्रीम 11 वर सट्टा खेळता येतो का ?

ड्रीम 11 बद्दल वाद निर्माण करणारी दुसरी गोष्ट म्हणजे तिथे सट्टा खेळता येतो हा आरोप केला जातो. सट्ट्याचा मुद्दा समजून घेण्यासाठी आपल्याला ड्रीम 11 कसं खेळतात ते बारकाईने समजून घ्यावं लागेल.

समजा, भारत आणि इंग्लंडचा सामना सुरु आहे. तुम्ही या दोन्ही टीममधून सगळ्यात चांगले ११ प्लेअर निवडता. मग तुमच्या समोर वेगवेगळ्या Contest ठेवल्या जातात आणि त्यातून जिंकणाऱ्याला मोठी रक्कम मिळते. समजा १०,००,००० बक्षीस असलेली स्पर्धा आहे, तर जिंकणाऱ्या ३५,००० लोकांमध्ये हे बक्षीस वाटून दिलं जातं. पण हे एवढं सोपं नसतं. ज्याने आपल्या प्लेअर्सच्या जोरावर सर्वात जास्त पॉइंट्स मिळवले आहेत त्यांना प्राधान्य दिलं जातं. यासाठी सुरुवातीलाच तुमची टीम चांगली असली पाहिजे.

कर्णधार आणि उपकर्णधार निवडताना खास काळजी घेण्यास सांगितलं जातं, कारण या दोन खेळाडूंमुळे अनुक्रमे २ आणि १.५ पॉइंट्स अधिक मिळतात. यापद्धतीने खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांची भलीमोठी यादीच तयार असते. त्यात भाग घेण्यासाठी तुम्हाला ठराविक पैसे भरावे लागतात. जेवढं मोठं बक्षीस तेवढी मोठी फी. एकदा सामना सुरु झाला की तुम्हाला टीममध्ये बदल करता येत नाही. तसं बघायला गेलं तर तुम्ही तुमच्या ११ खेळाडूंच्या कौशल्यावर भरोसा ठेवून स्पर्धेत उतरता. यात तुमच्या पदरचे थोडे पैसे गेले तरी जिंकलात तर रोख रक्कमही मिळते. २०० च्या वरची रक्कम तुम्हाला काढून घेता येते.

या खेळाच्या सट्ट्याशी साम्य असलेल्या बाबी लक्षात घेऊन २०१७ साली ड्रीम 11 च्या विरोधात हायकोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. कोर्टाने आपला निकाल ड्रीम 11 च्या बाजूने दिला होता. निर्णय देताना कोर्टाने म्हटलं होतं की ड्रीम 11 मध्ये खेळण्यासाठी खेळाचं ज्ञान, निर्णयक्षमता, लक्ष केंद्रित असण्याची गरज असते. तसेच हा खेळ खेळण्यासाठी खास कौशल्य लागतं. या बाबी लक्षात घेता ड्रीम 11 जुगारासंबंधीच्या Public Gambling Act, 1867 (PGA) या भारतीय कायद्याचं उल्लंघन करत नाही.

पण मंडळी, आपल्यासारख्या क्रिकेटप्रेमींना या वादात पडायचं नसतंच! पण कोणत्याही खेळामागे किती अर्थकारण असतं हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल! बीसीसीआय कशी जगात एक नंबरची श्रीमंत संस्था झाली आहे हे ही तुम्हाला या लेखातून कळलंच असेल!

सबस्क्राईब करा

* indicates required