computer

भारतीय संघातले कोणते क्रिकेटर्स इंजिनिअर आहेत हे माहित आहे ?

आपण मोठे होऊन इंजिनिअर व्हावे हे अनेक मुलांचे स्वप्न असते. इंजिनिअरिंग म्हणजे उच्चशिक्षण, अनेक संधी मिळण्याची हमी. तुम्हाला माहिती आहे का? भारतात दरवर्षी सुमारे १० लाख इंजिनिअर पदवी घेऊन बाहेर पडतात. पण अशीही काहीजण आहेत ज्यांची अनेकांची स्वप्नं वेगळी असतात. त्यामुळे काही जण आपल्या स्वप्नांसाठी व्यवसाय बदलतात. काही इंजिनियर्स आपल्या भारतीय क्रिकेट संघात ही आहेत किंवा होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही क्रिकेटर्सबद्दल सांगणार आहोत.

रविचंद्रन अश्विन

भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. आजही तो आपल्या माऱ्याने फलंदाजांना चकवतो. आश्विन भारताकडून कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. रविचंद्रन अश्विन चेन्नईच्या एसएसएन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे. बी.टेक. झाल्यानंतर तो एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी ही करू लागला. पण क्रिकेटची खूप आवड असल्याने तो क्रिकेटकडे वळला. आणि आज तो भारतीय संघात अनेक विक्रम आपल्या नावावर करत आहे. आईवडिलांचा मिळालेला पाठिंबा हा त्याच्यासाठी खूप महत्वाचा ठरला.

.जवागल श्रीनाथ

भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ हा तुम्हाला आठवत असेलच. तो देशातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. १९९१ ते २००३ पर्यंत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. जवागल श्रीनाथने ६३ कसोटी सामन्यांमध्ये २३६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने २२९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३१५ विकेट्स घेतल्या आहेत. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज आहे.

जवागल श्रीनाथ यांनी म्हैसूरच्या श्री जयचामराजेंद्र कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजीमध्ये पदवी घेतली आहे. BE instrumentation केल्यावर क्रिकेटच्या आवडीमुळे तो क्रिकेटकडे वळला आणि भारताला एक गुणवान वेगवान गोलंदाज मिळाला.

श्रीनिवास राघवन वेंकट राघवन

श्रीनिवास राघवन वेंकट राघवन हा माजी भारतीय ऑफस्पिनर गोलंदाज आहे. १९६५ ते १९८३ पर्यंत त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले. वेंकटराघवनने ५७ कसोटींत १५६ विकेट्स घेटल्या आहेत. त्याने भारतासाठी १५ एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. मोक्याच्या क्षणी विकेट घेणे ही त्याची खासियत होती.

भारताचा माजी ऑफस्पिनर श्रीनिवासराघवन वेंकटराघवन यांनी चेन्नईच्या गिंडी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी पंच म्हणून काम केले. तसेच काही काळ ते आयसीसीच्या पंचांच्या मुख्य पॅनेलचे सदस्यही होते.

इरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना

इरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना हा एक माजी भारतीय ऑफ-स्पिनर आहे. १९६२ ते १९७८ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशाची सेवा केली. इरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना यांनी ४९ कसोटींमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले, ज्यात त्याने १८९ विकेट घेतल्या. १९६१-६२ मध्ये काही कसोटी खेळल्यानंतर, या भारतीय क्रिकेटपटूने पदवी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि पाच वर्षे कसोटी खेळू शकला नाही. कारण तो काळ असा होता की क्रिकेटमध्ये फारशी कमाई नव्हती. प्रसन्ना यांनी नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ इंजिनियरिंग, म्हैसूर येथून अभियांत्रिकी पदवी घेतली आहे.

अनिल कुंबळे

केवळ भारतातीलच नाही, तर जगातील महान लेग स्पिनर्सपैकी एक नाव म्हणजे अनिल कुंबळे! हे नाव भारतीय क्रिकेट इतिहासात फार आदराने घेतले जाते. त्याने १९९०-२००८ पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. कुंबळे हा भारताकडून कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने २६९ कसोटींत ६१९ विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये ३३७ विकेट्ससह तो भारतीय क्रिकेट संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. या दिग्गज लेग स्पिनरने बंगळुरूच्या नॅशनल स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बीईची पदवी घेतली आहे.

या यादीत योगायोगाने पाचही गोलंदाज आहेत, त्यांचे म्हणणे आहे की इंजिनिअरिंग आणि क्रिकेट याची सांगड घातली जाऊ शकते. क्रिकेटमध्ये तुम्ही नेहमी यशस्वी नसता, पण घेतलेले शिक्षण तुम्हाला परिस्थितीशी मनाचे संतुलन राखण्यास मदत करते. या क्षेत्रातील चांगल्या वाईट गोष्टींची ओळख करून देते.

या लेखाच्या मुखपृष्ठावर हे पाच गोलंदाज आहेत आणि सहावा फोटो एका फलंदाजाचा आहे , तो कोण सांगा बरं !
 

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required