computer

या आहेत जगातल्या पहिल्या महिला क्रिकेट सामनाधिकारी...क्रिकेट मध्ये सामनाधिकारी का महत्वाचा असतो ??

मंडळी, क्रिकेट सारख्या पुरुषांच्या खेळात आता “नारी शक्ती” वाढताना दिसत आहे. भारताचं म्हणाल तर भारतात सशक्त अशी विमेन्स क्रिकेट टीम आहे, महिलांसाठीचे IPL सामने पण होत आहेत, एवढंच नाही तर गेल्या वर्षी भारताला वृंदा राठी आणि एन. जननी या दोघींच्या रूपाने भारतातल्या पहिल्या महिला अम्पायर्स मिळाल्या आहेत. आता नवीन बातमी ऐका.

नुकतंच माजी क्रिकेटर जी. एस. लक्ष्मी यांचा आयसीसी इंटरनॅशनलच्या सामनाधिकारी (रेफ्री) मंडळात समावेश झाला आहे. आयसीसीच्या सामनाधिकारी मंडळात काम करणाऱ्या त्या जगातल्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

मंडळी, जी. एस. लक्ष्मी या ५१ वर्षांच्या आहेत. त्यांनी महिलांच्या स्थानिक क्रिकेट सामन्यांसाठी २००८-०९ साली सामनाधिकारी म्हणून काम केलं होतं. त्यापूर्वी त्या भारताच्या विमेन्स क्रिकेट टीम मध्ये पण होत्या. एकूण त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे.

आता सामनाधिकारी या पदाबद्दल माहिती घेऊया!!

अम्पायर आणि थर्ड अम्पायर यांची भूमिका सामन्यांच्या निकालांवर परिणाम करणारी असते, पण सामनाधिकारी असं काहीही करत नाही. सामनाधिकारी हा लांबून सामन्यांवर नजर ठेवण्याचं काम करत असतो. सामने आयसीसीच्या नियमांप्रमाणे होत आहेत की नाही हे तपासणे त्याचे काम असते. सामन्यांच्या वेळी जर नियम मोडले जात असतील तर त्या संघाला किंवा खेळाडूवर दंड ठोकण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतो.

 

मंडळी, क्रिकेट मध्ये नारी शक्ती येत आहे त्याची आणखी काही उदाहरणं आहेत. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की ऑस्ट्रेलियाच्या ‘क्लेअर पोलोसेक’ या पुरुषांच्या सामन्यात अम्पायर म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. सोबतच अम्पायर्स मंडळात महिलांची संख्या आता ८ झाली आहे.

तर मंडळी, क्रिकेट मध्ये आता खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता येत आहे असं म्हणायला हरकत नाही !!

 

आणखी वाचा :

भारताला मिळाली पहिली महिला अंपायर....जाणून घ्या तिच्या जिद्दीची गोष्ट !!