हिमाचल प्रदेशच्या टीमने इतिहास घडवला आहे!! VJD पद्धतीने मिळवला विजय! काय आहे VJD पद्धत?

भारतातील एक महत्वाची प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा म्हणजे विजय हजारे ट्रॉफी!! यात स्पर्धेत विजय मिळवणे हे प्रत्येक राज्याच्या संघासाठी अतिशय प्रतिष्ठेचे समजले जाते. आजवर अनेक संघांनी ही ट्रॉफी स्वतःच्या नावे केली आहे. पण हिमाचल प्रदेशच्या संघाला काही ही ट्रॉफी आजवर मिळाली नव्हती. यंदा इतिहास घडवत तब्बल ५ वेळच्या विजेत्या तमिळनाडूला हरवत हिमाचल प्रदेशने ट्रॉफीवर नाव कोरले आहे. 

तमिळनाडू आणि हिमाचलमध्ये या ट्रॉफीचा फायनल सामना खेळला जात असताना कमी प्रकाशामुळे सामन्याचा निकाल VJD पद्धतीने लावला गेला. तमिळनाडूने ३१४ धावांचे लक्ष्य हिमाचलला दिले होते, तर हिमाचलचा स्कोअर २९९ होता. पण VJD पद्धतीने हा स्कोअर जास्त होत असल्याने हिमाचलला विजयी घोषित करण्यात आले आणि त्यांना पहिलीवहिली ट्रॉफी मिळाली. 

VJD पद्धत-

ही पद्धत वातावरणामुळे प्रभावित होणाऱ्या सामन्यांसाठी वापरली जाते. डकवर्थ लुईसला पर्याय म्हणून ही पद्धत वापरली जाते. केरळचे सिव्हिल इंजिनियर व्ही. जयदेवन यांनी तयार केल्याने या पद्धतीला त्यांचे नाव देण्यात आले आहे. 

ऋषी धवन या खेळाडूच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या हिमाचलने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. हिमाचलने सुरुवातीला भेदक मारा करत तमिळनाडूची बाजू हलकी पाडली. पॉवरप्लेमध्ये तमिळनाडू ४ विकेट गमवून २८ धावा तमिळनाडूचा संघ जमा करू शकला. यावेळी संकटमोचक म्हणून धावून आला दिनेश कार्तिक. 

कार्तिकने धडाकेबाज शतक ठोकत ११६ धावा केल्या. दिनेश कार्तिकने बाबा इंद्रजितच्या ८० धावांच्या जीवावर २०२ धावांची पार्टनरशिप केली. शेवटच्या ओव्हर्समध्ये शाहरुख नावाचा स्टार खेळाडू मैदानात उतरला त्याने दणादण २१ बॉल्सवर ४२ धावा कुटत संघाला ३०० पार नेले. 

हिमाचलसमोर मोठे लक्ष्य होते. एकीकडे एकेक विकेट पडत असताना ओपनिंगला आलेला शुभम अरोरा मात्र मैदानात टिच्चून खेळत होता. त्याने आपले शतक पूर्ण करत १३६ धावा केल्या. नंतर आलेल्या कॅप्टन ऋषी धवनने वेगवान बॅटिंग करत २३ बॉल्सवर ४२ रन्स ठोकले. 

हिमाचल एकूण २९९ धावांवर पोहोचला आणि त्यांना VJD पद्धतीने विजयी घोषित करण्यात आले. भारतीय प्रथमश्रेणी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा एखादी ट्रॉफी स्वतःच्या नावे करत हिमाचलने इतिहास घडवला आहे. 

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required