computer

ऑस्ट्रियन सैनिकांच्या कष्टामुळे १९६४ सालचे ऑलंपिक सामने सुरळीत कसे पार पडले?

जगभरातील खेळाडूंच्या कर्तृत्वाला वाव देणारा हा ऑलंपिक सामना प्रतिष्ठेचा सामना म्हणून गणला जातो. चार वर्षातून एकदा होणारे हे सामने भरवण्याची संधी मिळणे ही कोणत्याही देशासाठी अभिमानाची बाब असते. हे सामने भरवताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर केलेली मात याच्या कितीतरी सुरस कथा तुम्ही ऐकल्या असतील. १९६४च्या हिवाळी ऑलंपिकच्या वेळीही ऑस्ट्रियासमोर असाच एक बाका प्रसंग उभा राहिला. त्या प्रसंगातून ऑस्ट्रियाने कशी वाट काढली आणि ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली यामागेही खूप रोचक इतिहास आहे. टोकियो ऑलंपिकच्या पार्श्वभूमीवर हा इतिहास जाणून घेणेही तितकेच रोचक ठरेल. 

१९६४ साली ऑस्ट्रियाच्या वाट्याला ऑलंपिक आयोजित करण्याची सुवर्णसंधी आली होती. ही संधी मिळवण्यासाठी ऑस्ट्रियाने त्याकाळी बराच आटापिटा केला होता. ऑस्ट्रियातील इन्सब्रक शहर हे हिवाळी खेळांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. परंतु त्यावर्षीच नेमके इन्सब्रकमध्ये बर्फ पडण्याचे प्रमाण कमी झाले होते. बर्फ नसेल तर स्कीईंग, बँडी, आईस हॉकी, स्काय जंपिंग, बॉबस्ले, असे खेळ खेळणे निव्वळ अशक्य होईल. 

हिवाळी खेळांसाठी बर्फ ही एक अत्यावश्यक गोष्ट असते. नेमके त्याच वर्षी बर्फाची कमतरता भासू लागल्याने एवढ्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन कसे करणार हा प्रश्न होता. कुठल्याही बिकट प्रसंगात देशाच्या कामाला येते ते म्हणजे देशाचे लष्कर. जगातील सर्व देशांसाठी ही बाब सारखीच लागू होते. बर्फाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी ऑस्ट्रियाने सुद्धा आपल्या लष्कराची मदत घ्यायचे ठरवले. 

वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांसाठी वेगवेगळे ट्रॅक बनवण्यात आले आणि यातील प्रत्येक ट्रॅकवर ऑस्ट्रियन सैनिकांनी पुरेसा बर्फ राहील याची तजवीज केली. यासाठी त्यांनी अल्पस डोंगर रांगातील बर्फाचे २०,००० ब्लॉक्स आणून त्या ट्रॅकवर पसरवला. स्कीईंगसाठी या सैनिकांना पर्वताच्या शिखरावरून ४०,००० क्युबिक मीटर इतका बर्फ आणला होता. लष्कराने ट्रक, ट्रॉली अशा वाहनांच्या सहाय्याने हा बर्फ पर्वतावरून खाली आणला होता. ऐन स्पर्धेच्या वेळी काही गोंधळ झालाच तर शिल्लक असावा म्हणून आणखी २०,००० क्युबिक मीटर इतका बर्फ त्यांनी आधीच आणून ठेवला. 

काही वाईट घडलेच तर म्हणून सैनिकांनी घेतलेली ही खबरदारी काही वाया गेली नाही कारण, स्पर्धा होण्याला दहा दिवसांचा अवकाश असतानाच तिथे पाऊस सुरु झाला. आता पाऊस आणि बर्फ यांचे किती जमते हे तर तुम्हाला माहिती आहेच. सैनिकांनी ट्रॅकवर पसरलेला सगळा बर्फ वितळून वाहून गेला. पुन्हा एकदा ऑस्ट्रियन सैनिकांनी आपल्या पाठीवरून बर्फ वाहून आणला आणि आपल्या हाताने पुन्हा एकदा तो त्या-त्या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवर पसरला. 

१९६४सालचे हिवाळी ऑलंपिक सामने अगदी सुरळीतपणे पार पडले. नंतर त्यात कसलाही व्यत्यय आला नाही. सुदैवाने आजच्या काळात असा काही प्रसंग उद्भवलाच तर कितीतरी सुविधा उपलब्ध आहेत. कृत्रिम बर्फ बनवण्याच्या मशीन्स, त्या योग्य रीतीने योग्य प्रमाणात पसरवण्याची यंत्रे आणि त्यासाठी वापरायच्या ट्रिक्स, अशा कितीतरी गोष्टींची आजच्या काळात मदत होते. 

१९६४साली मात्र तंत्रज्ञान इतके प्रगत नव्हते त्यामुळे लष्कराने जर मदत केली नसती तर नक्कीच ऑस्ट्रियाला सामने रद्द करण्याशिवाय पर्याय राहिला नसता. ज्यासाठी ऑस्ट्रियाने १९६० सालापासून प्रयत्न केले होते ती संधी एका क्षणात हुकली असती. म्हणूनच हे सामने यशस्वी करून दाखवणे हा ऑस्ट्रियासाठी प्रतिष्ठेचा विषय होता.  १९६० सालीही ऑस्ट्रियाने  हिवाळी खेळ आयोजित करण्याची तयारी दाखवली होती मात्र त्यावेळी त्यांचा प्रस्ताव नाकारण्यात आला होता. त्यामुळे १९६४ साली मिळालेली ही संधी दवडून चाललेच नसते. शेवटी स्पर्धा यशस्वी करून दाखवल्या. 

कोणत्याही कामात अडथळे हे येतच असतात, पण ते काम यशस्वी करून दाखवण्याची जिद्द असेल तर कितीही मोठ्या अडथळ्यांवर तितक्याच जोशाने मात करता येते. ऑस्ट्रियाने प्रतिकूल परिस्थितीही हे करून दाखवले. ऑस्ट्रियन सैनिकांच्या मदतीशिवाय कदाचित हे शक्य झालेच नसते. 

म्हणूनच सामान्य नागरिकांच्या दृष्टीने त्या-त्या देशाची आण-बाण-शान वाचवणारे सैनिक नेहमीच सर्वोच्च आदरास आणि प्रेमास पात्र असतात. 

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required