computer

स्पेलिंग बी या अमेरिकन स्पर्धेत सलग बारा वर्षे विजेते आहेत फक्त भारतीय विद्यार्थी !!

इंग्लिश भाषेतली स्पेलिंग्ज ही अजब गजब गोष्ट आहे. 'चुपके चुपके' आठवतोय? धर्मेंद्र विचारतो, "To-टू, Do-डू, मग Go-गो असा उच्चार का?" आपल्याकडे मराठीत असं होत नाही. ‘अ’ चा उच्चार शब्द बदलले तरी ‘अ’ च असतो. इंग्लिशमध्ये मात्र ‘a’ हा वेगवेगळ्या शब्दात ‘अ, आ, ॲ, ऑ, ए’ असे बरेच उच्चार बदलतो आणि हे प्रत्येक स्वर आणि व्यंजनाच्या बाबतीत होते. उच्चारातील ही अनियमितता भल्याभल्यांना गोंधळवून टाकते. आपलं स्पेलिंग बरोबर आहे याची खात्री हुशारातील हुशार विद्यार्थी देखील देऊ शकत नाही. म्हणूनच प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या स्पेलिंग बी कॉन्टेस्टमध्ये जेव्हा विजेते म्हणून भारतीय विद्यार्थ्यांची वर्णी लागते, तेही एकदा दोनदा नव्हे तर २००८ ते २०१९ अशी सलग बारा वर्षे, तेव्हा एक भारतीय म्हणून ऊर अभिमानाने भरून येतो.

अमेरिकेत ही स्पर्धा दर वर्षी भरवली जाते. याही वर्षी ही स्पर्धा भारतीय मुलांनी गाजवली आहे. या वर्षी १४ वर्षीय हरिणी लोगन ही विजेती ठरली आहे. दुसऱ्या क्रमांकावर देखील विक्रम राजू हा भारतीय मुलगाच आहे. २०२० मध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेली नाही. २०२१ मध्ये प्रथमच भारतीयांची घोडदौड एका कृष्णवर्णीय अमेरिकी मुलीने थांबवली. जाइला अवागार्ड हे तिचे नाव. हे यश मिळवणारी ती पहिली कृष्णवर्णीय होती. नवीन स्वरुपाची अंतिम फेरी हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य! या फेरीत पोह्चलेल्या शेवटच्या दोन मुलांना केवळ ९० सेकंदात जास्तीत जास्त स्पेलिंग्ज सांगायची होती. त्यात हरिणीने बाजी मारली. चला बघू या, या स्पर्धेत भारतीयांना सन्मान मिळवून देणारा पहिला भारतीय कोण होता.

१९८५ साली सुरु झालेल्या या स्पर्धेत १३७ मुलांनी भाग घेतला होता. यात ६ जण भारतीय वंशाचे होते. त्या वेळी ही स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय होता ‘बाबू नटराजन’.
यानंतर या स्पर्धेवर भारतीयांचीच छाप होती. भारतीय मुले एकतर जिंकली किंवा त्यांनी अंतिम फेरीपर्यंत तरी धडक मारली. त्यांच्या यशातील सातत्याने जगाला प्रश्न पडला की भारतीय मुलांच्यात असं काय वेगळेपण आहे की ते स्थानिक मुलांना देखील मागे टाकतात? जाणकारांच्या मते अमेरिकेत स्थिर होऊ पाहणाऱ्या भारतीयांना चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी असते. चांगली नोकरी मिळाली की ते अमेरिकेत स्थायिक होतात. हे लोक सॉफ्टवेअर इंजिनियर, डॉक्टर, शास्त्रज्ञ, विमान सेवा किंवा तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन अशा व्यवसायांत अग्रेसर आहेत. या परिवारांतील लोकांनी लहानांच्या अभ्यासातील प्रगतीकडे लक्ष दिले नाही तरच नवल. आपल्या मुलांच्या प्रतिभेला जगापुढं आणू शकणारी कोणतीच गोष्ट ते डावलत नाहीत. अमेरिकेतील कित्येक भारतीय कुटुंबे मुले लहान असतानाच या परीक्षेची तयारी करायला सुरुवात करतात. ही स्पर्धा अमेरिकेतील प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जात असल्याने पुढील शैक्षणिक वाटचालीत याचा पुष्कळ फायदा होतो. या स्पर्धेत जिंकणाऱ्याला पुढं जाऊन चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याच्या संधी मिळतात. केवळ स्पेलिंग बी च नाही, तर ज्ञानाशी संबंधित असलेल्या ऑलिंपियाडसारख्या अनेक स्पर्धांतून भारतीय आपला ठसा उमटवत आहेत.

स्पेलिंग बी स्पर्धेत जेवढे काही विक्रम झाले आहेत ते बहुतांशी भारतीयांच्या नावे आहेत.
सर्वात कमी वयात ही स्पर्धा जिंकण्याचा विक्रम निहार जंगा या भारतीय मुलाच्या नावावर आहे. त्याने ही स्पर्धा जिंकली तेव्हा तो अवघा ११ वर्षांचा होता. तो आणि त्याच्यासारखे अनेक विजेते मनोगत व्यक्त करताना त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या एकट्याच्या मेहनतीला न देता संपूर्ण कुटुंबाला देतात. कुटुंबातील प्रत्येक सदस्य दिवसरात्र मेहनत घेऊन मुलांकडून स्पेलिंग्जचा सराव करुन घेतात. कुटुंबात दोन मुले असतील तर एकाला सराव करताना बघून दुसऱ्याचा देखील आपोआपच सराव होत राहतो. भारतीयांच्या या मेहनतीमागचे कारण शोधले तर असे सांगता येईल की ज्ञान, विज्ञान, शिक्षण यांसारख्या बुद्धिप्रामाण्यवादी गोष्टीत आपल्या अस्तित्वाची दखल घेण्यासारखी कामगिरी केली तर आपले भविष्य सुरक्षित असेल हे भारतीयांना माहीत आहे. शिक्षण हा प्रगतीचा पाया आहे हे ७० च्या दशकात गावातून शहरात नोकरी करायला येऊन स्थायिक झालेल्या लोकांनी जसे ओळखले होते, तसेच अमेरिकेत वास्तव्यास आलेल्या भारतीयांनी देखील ओळखले.
अशा वेळी भाषा हे तुमचे शस्त्र बनते. इथे जन्म घेतलेल्या भारतीय मुलांना इंग्लिश समजणे, बोलता येणे यात नवल नाही. पण ही मुले जेव्हा स्पेलिंगमध्ये स्थानिक मुलांना मागे टाकतात तेव्हा ते निश्चितच कौतुकास्पद आहे. परकीय भाषा असलेली मुले ज्यांची मातृभाषा इंग्लिश आहे अशांना पिछाडीवर टाकतात तेव्हा ते स्टार म्हणून वागवले गेले नाही तरच नवल.

भारतीयांच्या यशाचे अजुन एक कारण हेही सांगितले जाते की भारत हाच मुळातच बहुभाषिक देश आहे. भारतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात आणि पतीपत्नी वेगळ्या प्रांतातील असतील तर मूल स्वाभाविकपणे दोन भाषा विनासायास शिकते. एकापेक्षा अधिक भाषा शिकण्याची मुलाची क्षमता ही अनुवंशिक असते. याच मुद्द्यावर सॅम रेगाने ‘ब्रेकिंग बी’ नावाची फिल्म बनवली होती. या फिल्ममध्ये भारतीय मुलांच्या या स्पर्धेतील वर्चस्वामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ बरोबरच्या मुलाखतीत रेगा म्हणतात की स्पेलिंग्ज भारतीयांसाठी एक मजेचा खेळ आहे. बसल्या बसल्या सहज गप्पा मारताना देखील आईवडिल मुलांना स्पेलिंग्ज विचारतात आणि मुले देखील सांगतात.

ज्ञानलालसा, भविष्याला आकार देण्याची धडपड, मिळालेल्या संधीचा सदुपयोग, अशा संधी प्रतिष्ठा मिळवून देणार आहेत ही दूरदृष्टी आणि मेहनत करण्याची तयारी अशा अनेक कारणांमुळे भारतीयांचा अश्व कोणी रोखू शकले नाही.
परिणाम तर दिसतो आहेच! ३० विजेत्यांपैकी २० जण भारतीय असणे हा योगायोग नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required