भारतीय खेळाडूने पहिल्याच स्पर्धेत टेनिसच्या देवाला दिली टक्कर !!

पहिल्याच स्पर्धेत रॉजर फेडररसारख्या दिग्गज खेळाडूविरुद्ध खेळायला मिळणं हे नशीब असतं. नुकताच भारताच्या सुमित नागल या टेनिसपटू सोबत हा योगायोग घडला.
ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डन आणि यू.एस. ओपन या चार स्पर्धांना ग्रँड स्लॅम म्हणतात. काल यापैकी यू.एस. ओपन स्पर्धा होती. या स्पर्धेतून भारताच्या सुमित नागलने पदार्पण केलं आहे.
मंडळी, पहिलीच ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि समोर रॉजर फेडरर असूनही या पठ्ठ्याने दमदार खेळाने सुरुवात केली. या सामन्याचा स्कोरबोर्ड पाहा. पहिल्या सेटमध्ये सुमितने ४-६ या स्कोरने फेडररवर मात केली. सामना एकूण 4-6, 6-1,6-2, 6-4 या स्कोरने संपला. स्कोर बघितला तर तुम्हाला समजेल सुमितने २० वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या फेडररला तगडी झुंज दिली होती.
सुमित नागलचं वय अवघं २२ वर्ष आहे. ग्रँड स्लॅम सिंगल स्पर्धेत खेळणारा तो पाचवा भारतीय आहे. जागतिक दर्जावर तो १९० व्या क्रमांकावर येतो. रॉजर फेडररविरुद्ध खेळणं हे त्याचं स्वप्न होतं. त्याच्याच शब्दात सांगायचं झालं तर “रॉजर फेडरर हा टेनिसचा देव आहे”.
मंडळी, सुमितकडून भविष्यात अशाच तगड्या झुंजीची अपेक्षा केली जात आहे. त्याला बोभाटातर्फे खूप खूप शुभेच्छा.