क्रिकेट की अभ्यास? दररोज ८० किमीचा प्रवास; असा राहिलाय बर्थडे गर्ल चकदा एक्सप्रेसचा क्रिकेट प्रवास...

महिलांचे क्रिकेट सामने किती लोक पाहतात आणि किती लोक त्यांना समर्थन करतात,हा एक वादाचा भाग आहे. मात्र भारतीय संघाचा समर्थक असलेल्या क्रिकेट चाहत्याने एकदा तरी झुलन गोस्वामीची गोलंदाजी नक्कीच पाहिली असेल. ५ फूट ११ इंच उंची असलेल्या झुलन गोस्वामीने आपल्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर अनेकदा भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. चकदा एक्प्रेसस म्हणून ओळखली जाणारी झुलन गोस्वामी आज आपला ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. 

स्लो गोलंदाजी करते म्हणून चिडवायचे लोक... 

 भारतीय संघासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक महिला खेळाडूसाठी झुलन गोस्वामी प्रेरणा आहे. मात्र तिचा इथपर्यंत पोहचण्याचा प्रवास सोपा नव्हता. या प्रवासाची सुरुवात झाली ती कोलकात्यातील छकडा गावातून.झुलन गोस्वामीचा जन्म २५ नोव्हेंबर १९८२ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणी झुलन तिच्या शेजारच्या मैत्रिणी आणि भावंडांसोबत क्रिकेट खेळायची. ज्या गावात जास्तीत जास्त लोकांना फुटबॉल खेळायला आवडायचं. त्याच गावात झुलनने क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

सुरुवातीला झुलन गोस्वामी जेव्हा गोलंदाजी करायची त्यावेळी तिच्या गोलंदाजीमध्ये हवी तितकी गती नव्हती. त्यामुळे कोणी ही येऊन तिच्या गोलंदाजीवर चौकार आणि षटकार मारत असे. इतकेच नव्हे तर स्लो गोलंदाजीमुळे तिला चिडवलं देखील जायचं. मात्र तिने या सर्व गोष्टींना दुर्लक्ष केलं. पुढे जाऊन ती इतकी भेदक गोलंदाज बनली की, फलंदाज तिच्या विरुद्ध खेळताना थरथर कापायचे. 

जेव्हा सराव बंद करण्यासाठी टाकला गेला दबाव... 

जेव्हा झुलन गोस्वामीचा संघर्ष सुरु झाला त्यावेळी ती पहाटे ४:३० वाजता उठून ८० किमीचा प्रवास करून सराव करण्यासाठी जात असे. तिच्या गावातून ट्रेनने प्रवास करत ती कोलकात्याला जायची. त्यानंतर स्टेशनपासून ते सरावाच्या ठिकाणापर्यंत ती पायी चालत जात असे. आपली मुलगी पहाटे उठून इतक्या दूर सराव करण्यासाठी जाते, हे कुटुंबियांना कुठेतरी खटकलं. तसेच सरावाचा परिणाम तिच्या अभ्यासावर देखील दिसू लागला होता. त्यामुळे तिच्या घरच्यांनो तिचा सराव बंद करण्यावर जोर टाकला होता. 

झुलन गोस्वामीने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, "माझा अर्धा दिवस प्रवासात आणि अर्धा दिवस सराव करण्यात जात होता. त्याचा परिणाम माझ्या अभ्यासावर होऊ लागला होता. त्यामुळे मला दोघांपैकी एका गोष्टीची निवड करायची होती. मला मुळीच खेद वाटत नाही की, मी क्रिकेटची निवड केली."

आज झुलन गोस्वामी ही भारतीय संघातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज आहे. १९९७ मध्ये कोलकाताच्या ईडन गार्डनवर पार पडलेला ऑस्ट्रेलिया विरुध्द न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना हा झुलन गोस्वामीच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. या सामन्यादरम्यान तिने बॉल गर्लची भूमिका पार पाडली होती. ५ वर्षांनंतर म्हणजेच २००२ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी तिला भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली.

अनेक विक्रम आहेत झुलन गोस्वामीच्या नावे..

झुलन गोस्वामीने काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले आहे. ती ३०० पेक्षा अधिक गडी बाद करणारी एकमेव महिला गोलंदाज आहे. तसेच २००७ मध्ये तिने आयसीसी वुमेन्स क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार पटकावला होता. तर संघाचे नेतृत्व करताना तिने २००५ आणि २०१७ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहचवले होते. तिच्या गोलंदाजी करण्याची गती ही ताशी १२० पेक्षा अधिक आहे. आयसीसीने देखील यादी नोंद घेत,तिला सर्वात वेगवान महिला गोलंदाजाची उपाधी दिली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required