वन डे मॅचेस चालू करणाऱ्या, कपड्यांचा-चेंडूचा रंग, ओव्हरमधल्या बॉल्सची संख्या, हेल्मेट, मानधन अणि बरंच काही बदलून टाकणाऱ्या माणसाबद्दल वाचायलाच हवं!!

पूर्वी लोकांना पाच दिवसांची कसोटी म्हणजेच क्रिकेट असं वाटत असे. त्यांना वनडे प्रकार तितकासा आवडायचा नाही. आता परिस्थिती अशी आलीय की कसोटी सामन्यांचा म्हणजे क्लासिकल क्रिकेटचा फॉरमॅट कालबाह्य होतोय की काय अशी भीती आता क्रिकेटच्या चाहत्यांना वाटायला लागली आहे. त्याची कारणं बरीच आहेत. क्रिकेट आता फक्त खेळ नाही तर मनोरंजन झालाय. तो जंटलमन्स गेम तर नक्कीच राहिलेला नाही. चाहत्यांची संख्या वाढत जाते आहे ती मनोरंजन या नव्या गुणामुळे!!

क्रिकेटचे 'खेळ ते मनोरंजन' हे परिवर्तन करण्याचे श्रेय जाते एका ऑस्ट्रेलियन माणसाला.  त्याचं नाव आहे केरी पॅकर! हा केरी पॅकर  मर्यादित षटकांच्या वनडे मॅचेसचा जन्मदाता आहे.  आणि आता तर हे सामने पन्नासवरून वीस ओव्हर्सपर्यत येऊन पोहचलेत. पण त्या काळी असे एक दिवसाचे सामने हा इतका भयानक विषय समजला गेला  होता की केरी पॅकर आणि त्याच्यासोबत अनेक दिग्गज खेळाडूंना चक्क बहिष्कृत करण्यात आलं होतं. 
चला तर आज वाचू या केरी पॅकर आणि वर्ल्ड इलेव्हन सिरीजबद्दल !!

स्रोत

केरी पॅकर हा ऑस्ट्रेलियन मिडीयामधला ‘भाई’ होता असं म्हणायला काही हरकत नाही. गडगंज श्रीमंत पॅकर कुटुंबात त्याचा जन्म झाला होता रिअल इस्टेट, हॉटेल्स, रिसोर्ट, कॅसिनो, सोन्याच्या खाणी आणि ऑस्ट्रेलियातील अनेक टीव्ही चॅनेल्सची मालकी त्याच्या कुटुंबाकडे होती. याखेरीज अनेक लोकप्रिय मासिकं, साप्तहीकांची मालकी पण त्याच्या कुटुंबाकडेच होती. 
पॅकरच्या हातात जेव्हा Channel 9 ची सूत्रे आली तेव्हा Channel 9 ची लोकप्रियता घसरणीला लागली होती. उत्पन्न घटत चालले होते. याकारणांसाठी काहीतरी हटके जगावेगळे करण्याची आवश्यकता होती हे केरी पॅकरच्या लक्षात आले. व्यापाराचा अव्वल वारसा त्याच्याकडे परंपरागत आला असल्यामुळे त्याच्या हेही लक्षात आलं की टीव्ही चॅनेल्सच्या धंद्याला आता एक वेगळे वळण लागले आहे. लाइव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंगचे दिवसेंदिवस वाढत जाणारे महत्व आणि नव्यानेच आलेल्या कलर टेलीव्हिजनमुळे धंद्याची गणितच बदलली होती. पॅकरने सुरुवातीला ऑस्ट्रेलियन गोल्फचे सामने प्रक्षेपित करायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने करोडो डॉलर्स खर्च करून सिडनीमध्ये एक गोल्फ क्लब नव्याने तयार केला. या प्रयोगाला जेव्हा यश आले तेव्हा त्याने आपले लक्ष ऑस्ट्रेलियातल्या क्रिकेट सामन्यांकडे वळवले. 
इथे त्याची गाठ पडली ABC म्हणजे ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनशी. १९७७ च्या सर्व सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क मिळवण्याचे टेंडर पास व्हावे म्हणून  पॅकरने ABC च्या १० पट रकमेची बोली लावली. ABC आणि ACB (ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड) यांचं प्रेम फार जुनं होतं. म्हणजे जवळजवळ २० वर्ष जुनं होतं. साहजिकच ACB ने हे कंत्राट ABCला देऊन टाकले. इथे वादाची पहिली ठिणगी पडली. 
तसं बघितलं तर ऑस्ट्रेलियन लोक त्यांच्या उर्मटपणासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. केरी पॅकर मुळात ऑस्ट्रेलियन आणि त्यातून गडगंज श्रीमंत त्यामुळे ACBने कंत्राट देण्यास नकार दिल्यावर त्याने जे उद्गार काढले त्यामुळे संबंध आणखीनच बिघडले. 
ऑस्ट्रेलियन बोर्डाच्या अधिकाऱ्यांना उद्येशून केरी पॅकर म्हणाला, “प्रत्येक माणसात थोडीफार वेश्यावृत्ती असतेच, तुमच्या वेश्यावृत्तीची किंमत किती इतकंच फक्त मला सांगा”.

स्रोत
याच दरम्यान त्याच्या काही मित्रांनी ऑस्ट्रेलियामधून काही एक्झिबिशन मॅचेस प्रक्षेपित करण्याची विनंती केली. या प्रसंगामुळे एक नवीन स्फूर्ती आणि एक जगावेगळी कल्पना पॅकरच्या डोक्यात आली ती अशी की ऑस्ट्रेलियाचे सर्वोत्कृष्ट ११ खेळाडू एका बाजूला आणि जगातले ११ सर्वोत्कृष्ट खेळाडू दुसऱ्या बाजूला असे संघ निर्माण करून त्याचे प्रक्षेपण केले तर प्रचंड फायदा होण्याची शक्यता आहे.  या आवाहनाची एक बाजू अशी होती की अशा सामन्यांना कदाचित मान्यता मिळणार नाही. दुसरी सकारात्मक बाजू अशी होती की अधिकृत सामन्यात तुटपुंजे मानधन मिळवणाऱ्या खेळाडूंना पैसे कमवायची ही नामी संधी होती. आणि झालेही तसेच!!
१९७७ साली हा निर्णय घेतल्यावर पॅकरने पहिली चाल केली. त्याने इंग्लंडचा कॅप्टन टोनी ग्रेगला करारबद्ध केले. सोबत नवनवीन खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी एकत्र आणण्याची जबाबदारी पण त्यालाच दिली. थोड्याच दिवसात वेस्ट-इंडीजचे जवळजवळ सगळे खेळाडू, ऑस्ट्रेलियातले बरेचसे खेळाडू, इंग्लंडच्या संघातले अधिकांश खेळाडू करारावर सही करून मोकळे झाले. या घटकेस पॅकरच्या हातात स्टेडीयम, ऑफिस, आणि पुरस्कर्ते यांचा एकही करार नव्हता. खेळाडू मात्र जन्मभर पुरेल इतकी रक्कम मिळण्याची शक्यता दिसल्यावर सह्या करून मोकळे झाले. या सर्व प्रकाराची कुणकुणही कुठल्याच देशाच्या क्रिकेट बोर्डाला नव्हती.

स्रोत
९ मे १९७७ ला एका वार्ताहराकडून अनवधानाने वर्ल्ड क्रिकेट सिरीजचा उल्लेख झाला आणि सगळ्या देशातले क्रिकेट बोर्ड या बातमीने हादरून गेले. असे सामने व्हायला लागले तर काहीच दिवसात बोर्ड भिकेला लागेल याची कल्पना करून या सगळ्या बोर्डांनी पॅकरवर आग ओकायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार इंग्लंडमध्ये घडला. संपूर्ण जगात ब्रिटिश लोक जरा जास्तच शिष्टपणा करतात असा सगळ्यांचा समज आहे आणि क्रिकेटचा विषय असला तर थोडे जास्तच. त्यामुळे वर्ल्ड क्रिकेट सिरीजच्या कल्पनेला पॅकर सर्कस असे नाव देऊन नाकं मुरडायला सुरुवात झाली. टोनी ग्रेगचे कॅप्टनपद काढून घेण्यात आले. हळूहळू इतर सर्व देशातील क्रिकेट बोर्डानी असा फतवा काढला की जे खेळाडू पॅकरच्या वर्ल्ड सिरीज मध्ये खेळतील त्यांना राष्ट्रीय संघातून खेळता येणार नाही. 
तोपर्यंत ICCने या सर्व प्रकरणाची काहीच दखल घेतली नव्हती. सर्वच देशातील खेळाडू राष्ट्रीय संघातून बाहेर पडून केरी पॅकर यांच्याकडे जातायत तेव्हा ICCने पण पॅकरच्या विरुद्ध फतवा काढला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम हे आमचे असल्याने त्याचा उपयोग पॅकरला करता येणार नाही. असे जाहीर केले, पण पॅकर या सगळ्यांचा बाप होता. टेस्ट हा शब्द वापरता येत नाही असं म्हटल्यावर त्याने सुपरटेस्ट हा शब्द वापरायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियातले स्टेडीयम मिळणार नाहीत असे लक्षात आल्यावर त्याने फुटबॉल स्टेडीयममध्ये सामने भरवायला सुरुवात केली. रिची बेनॉ या जुन्या खेळाडूला हाताशी धरून त्याने क्रिकेटची नवीन नियमावली बनवली. थोडक्यात ICC सकट सगळ्याच बोर्डांना फाट्यावर मारून वर्ल्ड क्रिकेट सिरीज सुरु झाल्या. 

 

स्रोत
१९८० पर्यंत हे सामने Channel 9 वर लोकप्रिय झाले. या सामन्यांची लोकप्रियता बघून क्रिकेट बोर्डांनी पण त्यांचे मर्यादित षटकांचे एकदिवशीय सामने सुरु केले. काही वर्षातच केरी पॅकरच्या सामन्यांवर असलेली बंदी उठवण्यात आली. असा झाला जन्म मर्यादित षटकांच्या एकदिवशीय सामन्यांचा !!
या सामन्यांनी इंटरनॅशनल क्रिकेट कसं बदललं ते आता आपण पाहूया. 
१. त्या जमान्यात खेळाडूंना मिळणारे उत्पन्न खूपच कमी होते. त्यामुळे काही वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर बहुतेक खेळाडूंना पैशांची वानवाच होती. जाहिरातीचं उत्पन्न नसल्यामुळे क्रिकेट बोर्डदेखील गरीबच होते. स्पाँसर्स ही संकल्पना पण तेव्हा जन्माला आली. 
२. सुरुवातीला या पॅकरच्या सामन्यांकडे एक लुटुपुटूचा प्रयोग म्हणून बघितले जायचे. पण हे क्रिकेट क्लासिकल क्रिकेटसारखेच महत्वाचे आहे हे एका प्रसंगाने दाखवून दिले. तो प्रसंग असा की सिडनीच्या एका सुपरटेस्टमध्ये ‘अँडी रॉबर्ट्स’च्या एका बाउन्सरने ‘डेव्हिड हुक’चा जबडा खिळखिळा करून टाकला. Channel 9 च्या कॅमेऱ्याने हे दृश्य इतक्या बारकाईने टिपले होते की यानंतर हे सामने लुटुपुटूचे नाहीत याची क्रिकेट रसिकांना खात्री पटली. याच प्रसंगाने जन्म दिला हेल्मेटला. क्रिकेटच्या इतिहासात हेल्मेट जन्माला आलं ते केरी पॅकरच्या सामन्यात.
३. फुटबॉल स्टेडीयमचा क्रिकेटसाठी वापर करताना एक मोठी अडचण केरी पॅकरला आली ती म्हणजे या मैदानांवर क्रिकेट पीचच नव्हते. केरी पॅकरने यावर एक क्रांतिकारी उपाय शोधून काढला ज्याला आता ड्रॉप-इन पीच असे म्हणतात. ड्रॉप-इन पीचची गवताची धावपट्टी स्टेडीयमच्या बाहेर बनवली जाते. आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने मैदानावर अंथरली जाते. 

स्रोत
४. ऑस्ट्रेलियात तेव्हा ८ बॉलची ओव्हर असायची. पॅकरने ती ओव्हर ६ बॉलवर आणून एकूण १०० षटकात २०० बॉल्सचा वेळ वाचवला. हा वेळ टीव्ही कमर्शियलसाठी वापरून प्रचंड मोठे उत्पन्न उभे केले. 
५. क्लासिकल टेस्टमॅच प्रमाणे सुरुवातीला खेळाडू पांढरा गणवेशच वापरायचे. केरी पॅकरने ऑस्ट्रेलियन इलेव्हनला आणि वर्ल्ड इलेव्हनला दोन वेगवेगळे रंग देऊन रंगीत गणवेशाची पद्धत सुरु केली. आज आपण वेगवेगळ्या देशांचे रंगीत गणवेश बघतो त्यांचा उगम केरी पॅकरच्या क्रिकेट सामन्यातून झाला. 
६. सामना टीव्ही स्क्रीनवर चांगला दिसावा म्हणून बॉलचा रंग सुरुवातीला पिवळा करण्यात आला. काही दिवसाच्या निरीक्षणानंतर पांढरा बॉल जास्त सुस्पष्ट दिसतो असे लक्षात आल्यावर पांढरा बॉल वापरण्याची सुरुवात झाली. 
७. आज IPL ची तुतारी IPLची ओळख बनली आहे. असे ओळख देणारे अँथम क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा केरी पॅकरने तयार केले. या अँथमचे नाव होते ‘कमॉन ऑसी कमॉन’. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंनी म्हणजे डेनिस लिली, ग्रेग आणि इआन चॅपेल या खेळाडूंनी भाग घेतला होता. 

 

स्रोत
८. मॅकडॉनाल्ड्सने या सर्व सामन्यांसाठी खेळाडूंच्या सह्या असलेली खास पोस्टर्स बनवली होती. क्रिकेटच्या खेळाच्या व्यापारीकरणाची ही पहिली पायरी होती असं समजायला हरकत नाही.
९. मर्यादित षटकांचे सामने कसोटी सामन्यापेक्षा जास्त आणि वारंवार खेळले जायचे. यामुळे खेळाडूना स्वतःला कायम ‘फिट’ ठेवण्याची गरज समजली. साहजिकच प्रशिक्षक आणि डायटॆशीयन यांचा समावेश आग्रहाने क्रिकेट संघात व्हायला लागला.

 

 स्रोत
१०. इंग्रजांनी हा खेळ जंटलमन्स गेम म्हणून जगभर प्रसिद्ध केला. केरी पॅकरच्या सामन्यांनी हा खेळ जंटलमन्स गेम या कल्पनेच्या बाहेर आणला. उदाहरणार्थ, वर्ल्ड सिरीजच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच जिंकावी यासाठी इआन चॅपेलने शेवटचे ४ बॉल मुद्दाम वाईड टाकले होते. 

येत्या काही दिवसातच IPLचा अंतिम सामना खेळला जाईल आणि लवकरच वर्ल्डकपचे सामनेही सुरु होतील. हे सर्व एकदिवशीय सामने सुरु करणाऱ्या केरी पॅकरचे आभार मानण्यासाठी म्हणून हा स्पेशल लेख केरी पॅकरसाठी....

सबस्क्राईब करा

* indicates required