लेफ्टनंट कर्नल श्रीपाद श्रीराम फास्टेस्ट सोलो सायकलिंगमध्ये केला विश्वविक्रम!! सविस्तर बातमी जाणून घ्या!!

भारतीय लष्करी अधिकारी आपल्या सीमेचे रक्षण करून देशासाठी मोठे योगदान देत असतात. पण यासोबतच एका अधिकाऱ्याने देशाला अभिमान वाटण्यासारखे अजून एक कारण दिले आहे. भारतीय लष्करातील अधिकारी लेफ्टनंट कर्नल श्रीपाद श्रीराम यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे.

फास्टेस्ट सोलो सायकलिंग ( पुरुष ) या प्रकारात त्यांनी हा विश्वविक्रम केला आहे. २६ सप्टेंबर रोजी या शूर अधिकाऱ्याने लेह ते मनाली हे हे तब्बल ४७२ किलोमीटरचे अंतर अवघ्या ३४ तास ५४ मिनिटांमध्ये पूर्ण केले आहे. श्रीपाद श्रीराम हे भारतीय लष्कराच्या स्ट्रॅटेजीक स्ट्रायकर्स डिव्हिजनमध्ये कार्यरत आहेत. श्रीराम हे शनिवारी पहाटे चार वाजता लेहहून निघाले आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते मनालीला पोहोचले.

भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडने श्रीराम यांचा हा प्रवास सुरु होण्यापूर्वी घोषणा केली होती की, "आरोग्य हा जीवन जगण्याचा मंत्र आहे. स्ट्राईक वनमधील लेफ्टनंट कर्नल श्रीपाद श्रीराम हे फास्टेस्ट सोलो सायकलिंग ( पुरुष ) या प्रकारात लेह ते मनाली या ४७२ किलोमीटरचा प्रवास करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बनविण्यासाठी आपली सायकल यात्रा सुरू करणार आहेत."

श्रीपाद श्रीराम यांनी निश्चित केलेले ध्येय योग्य वेळेवर पूर्ण करून दाखवले. एका भारतीय अधिकाऱ्याने या पद्धतीने जागतिक विक्रम करणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे. लेफ्टनंट कर्नल यांचे बोभाटाकडून अभिनंदन!!

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required