computer

आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारे १० खेळाडू !!

आयपीएल प्रचंड यशस्वी असण्याचे महत्वाचे कारण म्हणजे पैसा आहे. आयपीएलशी जोडला गेलेला प्रत्येकजण मालामाल होतो. खेळाडूंना दरवर्षी हक्काची कमाई मिळवून देण्याचे साधन आयपीएल झालेली आहे. आयपीएलमुळे राष्ट्रीय संघात खेळून पूर्ण करियरमध्ये जेवढी कमाई केली नसती तेवढी कमाई अनेक खेळाडूंनी केली आहे. आज आपण आजवर आयपीएलमधून सर्वाधिक कमाई केलेल्या खेळाडूंची माहिती घेणार आहोत.

१. महेंद्र सिंग धोनी

धोनी बॅटिंग आणि विकेटकिपिंगसोबत त्याच्या नेतृत्वगुणांमुळे ओळखला जातो. आजवर त्याने चेन्नईला सातत्याने टॉपवर ठेवले आहे. त्याच्या याच गुणांमुळे त्याच्यावर पैसा ओतायला चेन्नईचे मालक मागेपुढे बघत नाहीत. आजवरची त्याची आयपीएलची कमाई ही तब्बल १,५२८,४००,००० एवढी आहे.

२. रोहित शर्मा

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टन असलेला रोहित शर्मा आपल्या बॅटिंगने देखील धुमाकूळ घालत असतो. सुरुवातीच्या सिझन्समध्ये गटांगळ्या खाणाऱ्या मुंबईला त्याने सातत्याने चॅम्पियन बनवून दाखवले आहे. म्हणूनच अंबानींनी त्याच्यावर आजवर एकूण १,४६६,०००,००० एवढे रुपये खर्च केले आहेत.

३. विराट कोहली

देशात सध्या सर्वात लोकप्रिय खेळाडूंच्या यादीत टॉपवर असलेला विराट एकतर्फी सामना फिरवण्याची ताकत ठेऊन आहे. आजवर एकदाही आरसीबीने आयपीएलची ट्रॉफी जिंकली नसली तरी देखील विराटने कमाई मात्र बक्कळ केली आहे. १,४३२,०००,००० एवढी त्याची आजवरची कमाई आहे.

४. सुरेश रैना

रैनाची ओळख ही मिस्टर आयपीएल हीच असल्याने या यादीत त्याचे नाव असणे काही विशेष नाही. रैनाने आयपीएलमध्ये अनेक विक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत. सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत देखील त्याचे स्थान पुढे आहे. रैनाने आजवर १,१०७,४००,००० एवढे रुपये कमावले आहेत.

५. एबी डिव्हीलीयर्स

साऊथ आफ्रिकेचा हा बॅट्समन आपल्या तुफान बॅटिंगसाठी ओळखला जातो. डिव्हीलीयर्स एकदा मैदानावर स्थिरावला म्हणजे एकही असा कोपरा नसतो जिथे तो शॉट मारत नाही. साहजिक त्याला स्वतःकडे ठेवण्यासाठी आरसीबी मालक पैशांची कमी करणार नाहीत. आजवर त्याने १,०२५,१६५,००० एवढ्या रुपयांची कमाई केली आहे.

६. गौतम गंभीर

सध्या खासदार झालेला गंभीर कॉमेंट्रीकडे वळला आहे. पण त्याने कोलकाता नाईट रायडर्सचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न एकदा नव्हे तर दोनदा प्रत्यक्षात उतरवले होते. सुरुवातीला दिल्ली कडून खेळताना देखील त्याने चांगली कामगिरी केली होती. साहजिक त्याची कमाई देखील चांगली झालेली आहे. ९४६,२००,००० ही त्याची आजवरची कमाई आहे.

७. युवराज सिंग

सर्वात आधी टी-ट्वेन्टीचे मैदान गाजवले ते युवराज सिंगने. एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स मारणारा हा पठ्ठ्या आयपीएलचे पहिले आकर्षण होता. एका सिझनमध्ये तर तब्बल १२ कोटी देऊन त्याला विकत घेण्यात आले होते. आजवर त्याने एकूण ८४६,०५०,००० एवढी कमाई केली आहे. पण गडी पैसे वसूल खेळ दाखवण्यात मात्र सातत्याने अपयशी ठरला आहे, हे देखील तितकेच खरे आहे.

८. रॉबिन उथप्पा

उथप्पा आपल्या मारधाड बॅटींगसाठी ओळखला जातो. आयपीएलसाठी हेच खरे रॉ मटेरियल असते. तरी देखील त्याची आयपीएलमधील कामगिरी यथातथाच राहिली आहे. पण गेल्या काही सिझन्समध्ये खेळल्याने त्याची कमाई मात्र ७८२,७४७,००० एवढी झाली आहे.

९. शेन वॉटसन

या यादीतील फक्त दोन परदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू शेन वॉटसनचा देखील समावेश आहे. शेन वॉटसन देखील एकदा सूर गवसला म्हणजे तडाखेबाज बॅटिंग करतो. बॉलिंग देखील तो चांगली करतो. या दुहेरी भूमिकेमुळे त्याची कमाईही जास्त आहे. आजवर त्याने एकूण ७७१,3३४८,२५० एवढ्या रुपयांची कमाई केली आहे.

१०. रविंद्र जडेजा 

सर जडेजा बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही बाबतीत सरस ठरला आहे. जडेजा संघात असणे म्हणजे तिहेरी फायदेशीर असते. साहजिक त्याची कमाई देखील म्हणूनच चांगली आहे. आजवर त्याने ७७०,१००,००० एवढे रुपये कमावले आहेत.

 

क्रिकेटबद्दल अशी आणखी कोणती माहिती तुम्हांला वाचायला आवडेल हे आम्हांला जरूर कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required