मुंबईच्या एजाजने न्यूझीलंडकडून खेळून दहाच्या दहा विकेट घ्यायचा पराक्रम केलाय!!

क्रिकेटचा एक मोठा गड म्हणजे मुंबई! मुंबईने या देशाला अनेक महान खेळाडू दिले आहेत. सचिन तेंडुलकर, सुनिल गावस्कर, रोहित शर्मा असे अनेक नाव यात सांगता येतील. पण याच मुंबईत जन्माला आलेला एक खेळाडू मात्र भारताला जबरदस्त झटका देणारा ठरला आहे.

भारतात खेळण्यासाठी आलेला न्यूझीलंड संघ सध्या भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. एजाज पटेल हा मुंबईत जन्माला आलेला खेळाडू न्यूझीलंडकडून बॉलिंग करण्यासाठी मैदानात उतरला आणि त्याच्या फिरकीच्या तालावर संपुर्ण भारतीय संघ ढेर झाला. या पठ्ठ्याने भारताच्या दहाच्या दहा विकेट पॅवेलीयनमध्ये पाठवत विश्वविक्रम केला आहे.

आजवर एका इनिंगमध्ये १० विकेट घेण्याचा मान फक्त तीन खेळाडूंना मिळाला आहे. याआधी हा विक्रम भारताच्या अनिल कुंबळेने केला होता. एजाज पटेलने हा विक्रम करत कुंबळे आणि ची बरोबरी केली आहे. पटेलच्या बॉलिंगवर फक्त मयंक अग्रवाल थोडा वेळ तग धरू शकला. बाकी संघ मात्र पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.

एजाज पटेल मुंबईत जोगेश्वरीमध्ये जन्माला आला. इथेच तो ८ वर्षांचा होईपर्यंत राहिला.  क्रिकेटचे वेड त्याला याच भूमीवर लागले असे म्हणता येईल. पुढे तो आपल्या आई वडिलांसोबतन्यूझीलंडला शिफ्ट झाला. अजूनही जोगेश्वरीमध्ये त्याचे घर आहे. सुट्टीत आपल्या या घरी तो नियमित येत असतो.  तिथेच त्याचे क्रिकेट बहरले आणि तो न्यूझीलंडच्या संघात भरती झाला.

सुरुवातीला त्याने प्रथम श्रेणी क्रीकेटमध्ये चांगलाच धुमाकुळ घातला. यामुळे त्याला २०१८ साली प्रथम श्रेणी क्रिकेटर ऑफ दि इयर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले होते. याचवर्षी पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेत त्याने पदार्पण केले आणि तेव्हापासून गडी सुसाट जात आहे.

न्यूझीलँड आणि भारताचा मागील सामना ड्रॉ करण्यात सुद्धा निर्णायक भूमिका एजाजची होती. पण यावेळी मैदानावर त्याने टिच्चून केलेली बॅटिंग कारणीभूत होती. या सामन्यात रचिन रवींद्र आणि एजाज पटेल या दोन भारतीय वंशाच्या खेळाडूंनी भारताचा विजय शक्य होऊ दिला नाही.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required