हरमनप्रीतची अर्धशतकी खेळी व्यर्थ!! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा मोठा पराभव
न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील ८ व्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंड संघाने हा सामना ६२ धावांनी आपल्या नावावर केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने ५० षटक अखेर ९ बाद २६० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना, भारतीय संघाला अवघ्या १९८ धावा करण्यात यश आले.
या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सार्थ ठरवत भारतीय गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. न्यूझीलंड संघाची सलामीवीर फलंदाज बेट्स अवघ्या ५ धावांवर माघारी परतली होती. त्यानंतर न्यूझीलंड संघाकडून एमी सॅटरथवेटने सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान तिने ९ चौकार मारले. तर ॲमेलिया केरने ५० धावांचे बहुमूल्य योगदान दिले. तसेच केटी मार्टीनने देखील ४१ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला ५० षटक अखेर ९ बाद २६० धावा करण्यात यश आले.
या धावांचा पाठलाग करताना, भारतीय महिला संघाकडून हरमनप्रीत सिंगने सर्वाधिक ७१ धावांची खेळी केली. तर मिताली राजने ३१ धावांचे योगदान दिले. या दोन्ही फलंदाजांना वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १९८ धावांवर संपुष्टात आला. हा सामना न्यूझीलंड महिला संघाने ६२ धावांनी आपल्या नावावर केला.




