computer

शून्यावर आउट होण्याचा नवा विक्रम रचणारा बॅट्समन....शून्यावर आऊट होण्याच्या पद्धती समजून घ्या !!

निकोलस पुरन या मूळ कॅरेबियन बॅट्समनची ख्याती जगातला सर्वात जास्त विध्वंसक बॅट्समन अशी आहे. याच कारणामुळे बिचाऱ्या प्रीती झिंटाने त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी मजबूत रक्कम देऊन विकत घेतले. पंजाबच्या भात्यात जबरदस्त अस्त्र सामील झाले आहे, हाच सर्वांचा त्यावेळी दृष्टीकोण होता. निकोलस पुरनच्या मागील ३ खेळयांचा 'पराक्रम' बघता, असा कसा हा विध्वंसक असाच प्रश्न तुमच्या मनांत निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. विकेटकीपर आणि बॅट्समन अशी दुहेरी भूमिका निभावणाऱ्या निकोलस पूरनकडून पंजाबच्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण या सर्व अपेक्षांवर त्याने पाणी ओतले आहे.

पुरन गेल्या तीन सामन्यांमध्ये चक्क खाते देखील उघडू शकलेला नाही. सलग तीन सामने शून्यावर आऊट होण्याचा आगळावेगळा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. भाऊचा स्वॅग देखील एवढा भारी की तिन्ही वेळा वेगवेगळ्या पद्धतीने तो शून्यावर आऊट झाला आहे.

क्रिकेटमध्ये शून्यावर आऊट होण्याच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. क्रिकेटच्या भाषेत यांना गोल्डन डक, सिल्व्हर डक आणि डायमंड डक असे म्हटले जाते. गोल्डन डक म्हणजे पहिल्याच बॉलवर आऊट होणे, सिल्व्हर डक म्हणजे एकापेक्षा जास्त बॉल खेळून शून्यावर आऊट होणे तर डायमंड डक म्हणजे एकही बॉल न खेळता शून्यावर आऊट होणे.

निकोलसरावांचा पराक्रम म्हणजे तीन सामन्यांमध्ये या तिन्ही पद्धतीने त्यांनी आऊट होऊन दाखवले आहे. आधीच्या दोन सामन्यांमध्ये गोल्डन डक आणि सिल्व्हर डक झाल्यावर कालच्या सामन्यात मैदानावर उतरल्या बरोबर तो रनआऊट झाला. ज्यामुळे त्याला एकही बॉल खेळता आला नाही. यामुळे डायमंड डक होण्याची नामुष्की त्याच्यावर आली आहे.

आयपीएलचा सिझन सुरू होण्यापूर्वी निकोलस पुरम जबरदस्त वातावरण तयार केले होते. सर्वांच्या नजरा पठ्ठ्या कोणते विक्रम करतो यावर लागल्या होत्या. पण गडी वेगळेच विक्रम करत सुटला आहे. हे म्हणजे नाव मोठे आणि लक्षण छोटे असे झाले.

सबस्क्राईब करा

* indicates required