टेनिसमधला नंबर एकचा खेळाडू 'नोव्हाक जोकोविच' चक्क या कारणाने बाहेर फेकला गेला?

टेनिसप्रेमींसाठी आज घडलेली घटना धक्कादायक आणि सोबतच दुःखदसुद्धा असणार आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोविच अमेरिकन ओपनमधून बाहेर फेकला गेला आहे. बाहेर फेकले जाण्याचे कारण थोडे विचित्र आहे.
तर घडलं असं की अमेरिकन ओपनची क्वार्टर फायनल मॅच होती. जोकोविच स्पेनच्या पाब्लो बुस्टासोबत भिडणार होता. पहिल्याच सेटमध्ये ५-६ असा हरल्याने जोकोविचराव असेही वैतागलेले दिसत होते. तेवढ्यात त्याने मारलेला एक शॉट थेट जाऊन एका महिला अधिकाऱ्याच्या गळ्याला लागला.
सुरुवातीची काही मिनिटे या बाईंना श्वास घ्यायला त्रास होत होता इतका तो बॉल जोरदार लागला होता. जोकोविचने जरी ही गोष्ट जाणूनबुजून केली नसली तरी त्याच्या सारख्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या खेळाडूकडून असे अपेक्षित नाही म्हणून त्याला थेट स्पर्धेबाहेर काढण्यात आले.
काही वेळ चर्चा करून त्याने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण ग्रँडस्लॅमचा स्पष्ट नियम आहे की कुठलाही खेळाडू कुठल्याही पद्धतीने एखादा अधिकारी, विरोधी खेळाडू, दर्शक किंवा इतर कुणाला इजा होऊ देणार नाही, तसे झाले तर तो शिक्षेस पात्र असेल. यामुळे शेवटी त्याला स्पर्धा सोडावी लागली. एका गलतीसे झालेल्या मिस्टेकमुळे या महान खेळाडूवर कायमचा शिक्का लागला आहे.
एखाद्या खेळाडूला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले असण्याच्या यापूर्वी फक्त दोन घटना घडल्या आहेत. पहिल्यांदा १९९० साली ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जॉन मॅकनरो आणि नंतर २००० साली फ्रेंच ओपनमध्ये स्टीफन कोबेक याला बाहेर काढण्यात आले होते.
हे सगळे घडून केल्यावर जोकोविचने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की, "घडलेल्या घटनेने मला प्रचंड दुःख झाले असून, त्या अधिकारी महिलेला जास्त दुखापत झाली नाही या गोष्टीचा मला आनंद आहे. ही घटना माझ्याकडून चुकून झाली आहे. स्पर्धेतून काढून टाकल्याने निराश झालो असलो तरी पुन्हा सुरुवात करून चांगले पुनरागमन करून दाखवेल."
