computer

पिके बॅनर्जी : फुटबॉलचा सुवर्णकाळ जगलेला एक महान फुटबॉलपटू !!

हा फुटबॉलपटू प्रदीप कुमार बॅनर्जी उर्फ पिके बॅनर्जी. १९६० च्या दशकात जेव्हा भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ सुरु होतां तेव्हा प्रदीप कुमार म्हणजे भारतीय फुटबॉलचे हिरो होते. वयाच्या ८३ व्या वर्षी या महान खेळाडूने या जगाचा निरोप घेतला आहे. त्यानिमित्ताने त्यांची ओळख ही करून घ्यायलाच हवी.

प्रदीप कुमार यांचा जन्म जलपैगुडी येथे १९३६ साली झाला. घरातील पहिलं मुल असल्यामुळे या मुलाला ‘प्रदीप हे नाव मिळालं. प्रदीप कुमार यांनी आयुष्यातला पहिला फुटबॉल सामना हा बिहारसाठी खेळला होता. त्यावेळी ते १५ वर्षांचे होते. पुढची ५ दशकं त्यांनी भारतीय फुटबॉलला नवीन उंची दिली. त्यांच्या कारकिर्दीतला लक्षात राहिलेला एक क्षण म्हणजे १९६० सालचं रोम ऑलेम्पिक. रोम ऑलेम्पिकमध्ये प्रदीप कुमार यांनी भारतीय फुटबॉल टीमचं नेतृत्व केलं होतं.

प्रदीप कुमार हे फक्त चांगले खेळाडूच नव्हते तर चांगले कोच देखील होते. त्यांच्या तालमीत शिकलेल्या पश्चिम बंगाल टीमने ३० ट्रॉफीज जिंकल्या तर पश्चिम बंगालच्याच मोहन बागान क्लबने २३ ट्रॉफीज जिंकल्या. त्त्यांच्या प्रेरक शब्दांसाठी ते खास प्रसिद्ध होते. आपल्या बोलण्यातून ते खेळाडूंमध्ये उर्जा भरत. याचं एक उदाहरण पाहूया.

१९८० सालच्या फेडरेशन कपच्या अंतिम सामन्यात पश्चिम बंगालच्या विरुद्ध मोहन बागान असा सामना होता. त्यावेळी प्रदीप कुमार हे पश्चिम बंगालच्या टीमचे कोच होते. समोरची मोहन बागानची टीम ही चांगली कसलेली होती. त्यांच्या समोर पश्चिम बंगालच्या टीमचा निभाव लागणार नाही हे जवळजवळ प्रत्येकाला वाटत होतं, पण प्रदीप कुमार यांनी सगळा खेळच बदलला.

प्रदीप यांनी पश्चिम बंगालच्या टीममध्ये असलेला मजीद बिष्कार या इराणी खेळाडूला प्रोत्साहन देताना त्याची तुलना इराणच्या आयतुल्ला खोमेनी यांच्याशी केली. आयतुल्ला खोमेनी यांनी त्याकाळी नुकतंच इराणचा चेहरा बदलला होता. मुळचा इराणी असल्यामुळे मजीद बिष्कारवर याचा परिणाम दिसून आला. सुरुवातीला जो सामना मोहन बागान एका चुटकीत खिशात घालणार असं दिसत होतं तो शेवटी टाय झाला. दोन्ही टीम्सना एकत्रितपणे विजयी घोषित करण्यात आलं.

यापूर्वी तीन वर्षांपूर्वी असाच एक किस्सा घडला होता. न्यूयॉर्क कॉसमॉस विरुद्ध मोहन बागान असा सामना होता. न्यूयॉर्क कॉसमॉसच्या टीममध्ये चक्क फुटबॉलचा देव समजला गेलेला ‘पेले’ खेळत होता. प्रदीप कुमार यांनी मोहन बागानच्या शिबाजी बॅनर्जी या गोलकीपरच्या आत अशी काही उर्जा जागवली की त्याने पेलेच्या टीमला जबरदस्त टक्कर दिली.

प्रदीप कुमार हे सुरुवातीच्या काही मोजक्या अर्जुन पुरस्कार विजेत्यांपैकी एक आहेत. The International Federation of Football History & Statistics ने प्रदीप कुमार यांना  “Indian footballer of the 20th century” पदासाठी नामांकन दिलं होतं.

आज प्रदीप कुमार यांच्या जाण्याने फुटबॉलचं एक सुवर्णयुग संपलं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या महान खेळाडूला बोभाटाचा सलाम.

सबस्क्राईब करा

* indicates required