वेगवान गोलंदाजी सोडून बनला फिरकीपटू, आता 'हा' स्पिन गोलंदाजीचा इंजिनियर पडलाय दिग्गजांवर भारी...

जेव्हा आपण भारतीय क्रिकेट बद्दल बोलतो तेव्हा फिरकी गोलंदाजांचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाही. आतापर्यंत अनेक दिग्गज फिरकी गोलंदाज होऊन गेले आहेत. तसेच वर्तमान भारतीय संघात देखील दिग्गज फिरकीपटू आहे. इंजिनियर असून सुद्धा कॅरम बॉल,लेग ब्रेक आणि ऑफ स्पिन गोलंदाजी करण्यात तरबेज असलेला गोलंदाज आर अश्विन (R Ashwin birthday) आज आपला ३६ वा वाढदिवस साजरा करतोय. कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी असो किंवा फलंदाजी, तो नेहमीच भारतीय संघासाठी मोलची भूमिका पार पाडत असतो. 

कसोटी क्रिकेटमध्ये तो भारतीय संघातील दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. हेच कारण आहे की, आगामी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना त्याने ४४२ गडी बाद केले आहेत. या बाबतीत त्याने माजी कर्णधार कपिल देवला मागे टाकले आहे.

वेगवान गोलंदाज म्हणून केली होती सुरुवात... 

फिरकीपटू गोलंदाजांच्या यादीत सर्वोच्च स्थानी असणारा आर अश्विन सुरुवातीला वेगवान गोलंदाजी करायचा, हे खूप कमी लोकांना माहीत आहे. तसेच तो एक सलामीवीर फलंदाज देखील होता, या गोष्टीवर आपण विश्वास ठेवू शकतो. कारण त्याने कसोटी क्रिकेटमध्ये शतके झळकावली आहेत. हा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सुरुवातीचा टप्पा होता. त्यानंतर त्याने वेगवान गोलंदाजी सोडून फिरकी गोलंदाजी टाकायला सुरुवात केली. आता तो फिरकी गोलंदाजीमध्ये भारताचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात ५०, १००, १५० पासून ते ४०० गडी बाद करण्याचा विक्रम हा आर अश्विनच्या नावे आहे. याच कामगिरीच्या जोरावर त्याने २०१६ मध्ये आयसीसी क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्कार पटकावला होता.

हा विक्रम केवळ अश्विननेच केला आहे.. 

आर अश्विनने एकदा दोनदा नव्हे तर ३ वेळेस शतक झळकावल्यानंतर गोलंदाजी करताना ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. तसेच २०१६ मध्ये तो टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० गडी बाद करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला होता. आर अश्विन केवळ कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी बनला नाहीये, हे त्याने अनेकदा सिद्ध केले आहे. आयपीएल स्पर्धेत त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना त्याने चॅम्पियन्स लीग स्पर्धा देखील जिंकली आहे.

आर अश्विनचा जन्म १७ सप्टेंबर, १९८६ रोजी तामिळनाडू येथील मद्रासमध्ये झाला होता. क्रिकेटपटूसह तो बी टेक इंजिनियर देखील आहे. आगामी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. संघातील अनुभवी खेळाडू असल्याने त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required