computer

आता मेस्सी चक्क राजस्थान रॉयल्सकडून खेळणार? हा ट्विट पाहा!!

जागतिक स्तरावरील लोकप्रिय खेळाडूंची यादी काढायची म्हटली तर लियोनेल मेस्सी या अर्जेंटिनाच्या खेळाडूचे नाव टॉपवर असेल यात शंका नाही. फक्त फुटबॉल नाहीतर एकंदरीत सर्वच ठिकाणी त्याचे चाहते आहेत. मेस्सी हा फुटबॉल क्लब बार्सिलोना कडून खेळत असतो. बार्सिलोनाकडून खेळताना त्याच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. बार्सिलोना कडून सर्वाधिक सामने, सर्वाधिक गोल्स, सर्वाधिक टायटल्स, सर्वाधिक विजय अशी अनेक विक्रमांची यादीच सांगता येईल.

मेस्सीचा बार्सिलोनासोबत असलेला अनेक वर्षांचा प्रवास संपुष्टात आला आहे. त्याने बार्सिलोना सोबत केलेला करार संपला असून आता तो दुसऱ्या कुणाही सोबत जाण्यासाठी मोकळा आहे. बार्सिलोना कोरोना आणि इतर कारणांनी आर्थिक संकटात आहे, त्यामुळे त्यांची इच्छा असूनही मेस्सीसोबत नव्याने करार करणे तसे कठीणच आहे.

जगातला एवढा दिग्गज खेळाडू आता कुठल्याही क्लबसोबत जाऊ शकत असल्याने त्याला आपल्या क्लबमध्ये खेचण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. अजूनतरी अधिकृतपणे इतर कुठल्या क्लबसोबत मेस्सीचे बोलणे सुरू असल्याची बातमी आली नसली तरी यात भारतातील राजस्थान रॉयल्सने मात्र आघाडी घेतली आहे.

मेस्सीचा करार संपला असल्याने एका ट्विटर युजरने राजस्थान रॉयल्सचा टॅग करून मेस्सील संघात घेणार का म्हणून विचारणा केली असता, राजस्थान रॉयल्सकडून मेस्सीला इन्स्टाग्रामवर पाठवलेल्या मॅसेजचा स्क्रीनशॉट अपलोड करण्यात आला, ज्यात पारंपरिक राजस्थानी स्टाईलने 'मेस्सी सा पधारो म्हारो देश' म्हणत आमंत्रण दिले आहे.

यावरून मात्र नेटकऱ्यांना भन्नाट क्रिएटिव्हिटी दाखवायची पुन्हा संधी मिळाली आहे. एक फुटबॉलर क्रिकेट कसा खेळेल असा प्रश्न असला तरी मध्यंतरी राजस्थानचा प्रशिक्षक कुमार संगकाराने मेस्सी आमच्या संघाकडून खेळल्यास आनंद होईल असे म्हटले होते. यावरून खरोखर राजस्थान रॉयल्स मेस्सीला क्रिकेटच्या मैदानावर उतरवणार तर नाही, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. 

विनोदाचा भाग वेगळा पण मेस्सीला क्रिकेटच्या मैदानावर बघायला आवडेल का? तुम्हीच सांगा!!

सबस्क्राईब करा

* indicates required