रवींद्र जडेजावर चढला 'पुष्पा फिव्हर', व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल
प्रसिध्द दाक्षिणात्य चित्रपट 'पुष्पा द राईज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाचा क्रेझ सामान्य नागरिकांसह बॉलीवूड अभिनेता आणि क्रिकेटपटूंमध्ये देखील पाहायला मिळाला आहे. यापूर्वी देखील गडी बाद केल्यानंतर किंवा अप्रतिम क्षेत्ररक्षण केल्यानंतर काही क्रिकेटपटूंनी अल्लू अर्जुन स्टाईलमध्ये जल्लोष साजरा केल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने देखील असेच काहीतरी हटके स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
गुरुवारी (२४ फेब्रुवारी) भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यातील १० वे षटक टाकण्याची जबाबदारी रवींद्र जडेजाला सोपवण्यात आली होती. या षटकातील त्याने श्रीलंकेच्या फलंदाजाला पॅव्हेलीयनचा रस्ता दाखवला.
तर झाले असे की, १० व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रवींद्र जडेजाने दिनेश चंदिमलला यष्टीचीत करत माघारी धाडले. फलंदाज बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजाने आपल्या दाडीला हात लावत अल्लू अर्जुन स्टाईलमध्ये जल्लोष साजरा केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यापूर्वी देखील रवींद्र जडेजाने अल्लू अर्जुनच्या लुकची हुबेहूब नक्कल केली होती.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर २ बाद १९९ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये ईशान किशनने सर्वाधिक ८९ धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाला १३७ धावा करण्यात यश आले होते. हा सामना भारतीय संघाने ६२ धावांनी आपल्या नावावर केला.




