तिन्ही प्रकारात खेळणाऱ्या सर्वाधिक तरुण क्रिकेटपटूचा मान या महिला क्रिकेटपटूने पटकावलाय....

भारतात क्रिकेट प्रेम ही सर्वमान्य गोष्ट झालेली आहे. इतर कुठल्याही खेळापेक्षा क्रिकेटची क्रेझ भारतात प्रचंड आहे. पुरुषांबरोबर महिला क्रिकेट पण तेवढ्याच जोरदारपणे वाटचाल करत आहे. मिताली राज, झुलन गोस्वामी यांना क्रिकेटपटू म्हणून संपूर्ण देश ओळखतो. आता अशाच महान महिला क्रिकेटपटूंच्या यादीत नवे नाव जोडले जात आहे.

हरियाणाची शेफाली वर्मा ही गेल्या काही काळात भारतीय महिला क्रिकेटमध्ये तडाखेबंद बॅटिंग करणारी बॅट्समन म्हणून समोर आली आहे. तिच्या नावे अनेक विक्रम अतिशय कमी काळात नोंदवले गेले आहेत. तिचं वय अवघे १७ वर्ष आहे आणि एवढ्या कमी वयात तिने टेस्ट, वनडे आणि टी ट्वेन्टी क्रिकेटच्या या तिन्ही प्रकारात खेळणाऱ्या सर्वाधिक तरुण क्रिकेटपटूचा विक्रम केला आहे.

शेफालीचा जन्म २८ जानेवारी २००४ रोजी हरियाणातल्या रोहतकचा. तिच्या वडिलांना क्रिकेटर व्हायचे होते पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. आपले अपूर्ण स्वप्न त्यांनी आपल्या मुलीमार्फत पूर्ण केले आहे. दंगल सिनेमासारखीच शेफालीची पण गोष्ट आहे. तिच्या वडिलांनी ती ९ वर्षांची असताना तिचे केस कापले आणि तिला मुलांसारखे क्रिकेट ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली.

 

 

आपल्या जबरदस्त खेळाने शेफालीने हरियाणा राज्य क्रिकेट संघात धुमाकूळ घातला. याच गोष्टीमुळे तिची निवड विमेन्स मिनी आयपीएलमध्ये मिताली राजच्या नेतृत्वाखालील वेलॉसिटी या संघात झाली. या संघाला देखील तिने फायनलपर्यंत नेत, आपल्यात काहीतरी वेगळे आहे याची झलक जगाला दाखवली.

याच सातत्यपूर्ण खेळामुळे तिची निवड आंतरराष्ट्रीय संघात झाली. पण पहिल्याच सामन्यात ती शून्यावर आऊट झाली. पण नंतर मात्र तिने मागे वळून पाहिले नाही. आजवर तिने २२ टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये १४८ च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने ६१७ धावा केल्या आहेत. यापैकी तिच्या नावे तीन अर्धशतकं आहेत. टेस्टमध्येही पहिल्याच सामन्यात ९६ आणि ६३ धावा करत पहिल्याच सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

भारतीय महिला संघाला पुरुष संघाप्रमाणेच महान खेळवडूंचा इतिहास आहे. शेफाली वर्मा हीच परंपरा पुढे घेऊन जाईल, हेच चिन्ह सध्यातरी दिसत आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required