computer

कोल्हापूरचा हा कबड्डीपटू झालाय या हंगामातला पहिला करोडपती !!

मंडळी, काल परवापर्यंत भारतात क्रिकेट हाच एकमेव खेळ प्रसिद्धीच्या शिखरावर होता. आता त्यात कुस्ती आणि कबड्डी सारख्या खेळांची पण भर पडली आहे. याचं कारण म्हणजे IPL सारखे कबड्डी आणि कुस्तीचे सामने भारावले जातायत. जसे की प्रो-रेसलिंग, प्रो-कबड्डी. लोक या दोन्ही खेळाकडे क्रिकेट इतकेच खेचले जात आहेत.

कालचीच बातमी घ्या ना, इतिहासात पहिल्यांदाच कबड्डीच्या एका खेळाडूला तब्बल १ कोटी ४५ लाखांची बोली लागली आहे. आजवर IPL च्या खेळाडूंवर एवढे पैसे लावले जायचे पण आता पहिल्यांदाच कबड्डीच्या खेळाडूला हा मान मिळाला आहे. याहून आनंदाची बातमी म्हणजे हा पठ्ठ्या महाराष्ट्राचा आहे भाऊ. चला तर अधिक माहिती घेऊया.

गेल्यावर्षी प्रो कबड्डीच्या सहाव्या हंगामात सिद्धार्थ देसाईने पदार्पण केलं होतं. त्याच्या जबरदस्त कामगिरीने तो पदार्पण करणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता. यावर्षी तो काय कामगिरी करतो आणि त्याला किती रुपयाची बोली लागते याकडे सगळ्यांचच लक्ष होतं.

गेल्यावर्षी तो यू-मुंबा टीमकडून खेळला होता, पण आश्चर्य म्हणजे चांगली कामगिरी करूनही यावेळी यू-मुंबाने त्याच्यावर बोली लावली नाही. या संधीचा फायदा घेऊन इतर टीम पुढे सरसावल्या. लिलावाच्या पहिल्याच दिवशी त्याच्यावर ३० लाखांची बोली लागली. पुढे तर सगळ्यांनाच झटका बसला. तेलगु टायटन्स टीमने त्याच्यावर तब्बल १ कोटीची बोली लावली. हे इथेच थांबलं नाही. तामिळ थलायवाजने त्याहीपेक्षा मोठी बोली लावली, पण अखेर तेलगु टायटन्सने तब्बल १ कोटी ४५ लाख रुपयांची बोली लावून सिद्धार्थ देसाईला आपल्या टीम मध्ये सामील करून घेतलं.

मंडळी, सिद्धार्थ देसाईसाठी हा मोठा झटका होता. एवढी मोठी बोली लागेल असं त्याला वाटलं नव्हतं, फार फार तर ७०-८० लाखांची बोली लागेल अशा अंदाजात तो होता. या मोठ्या बोलीने तो प्रो-कबड्डी लीग मधला आजवरचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

यानंतरही यू-मुंबाला ‘फायनल बिड टू मॅच’ कार्ड वापरून सिद्धार्थला आपल्या टीम मध्ये कायम राखता आलं असतं, पण इथेही त्यांनी सिद्धार्थला टीम मध्ये घेण्यात स्वारस्य दाखवलं नाही.

मंडळी, कबड्डी खेळात आणि तेही महाराष्ट्राच्या पठ्ठ्याला हा मान मिळतोय ही आनंदाची बाब आहे. १९ जुलै पासून सुरु होणाऱ्या प्रो-कबड्डी लीग मध्ये सिद्धार्थ देसाई काय कामगिरी करून दाखवणार हे आता बघण्यासारखं असेल.

सबस्क्राईब करा

* indicates required