computer

फुटबॉलमध्ये फिक्सिंग होतं का? बीबीसीच्या गुप्तवार्ताहराकडे फुटबॉल खेळाडूंनी केलेल्या मागण्या पाहिल्यात का?

मॅच फिक्सिंग म्हणजे संगनमताने सामन्याचा निकाल ठरवणं, तर स्पॉट फिक्सिंग म्हणजे सामन्यांमधील छोट्यामोठ्या घडामोडी आधीच ठरवून घडवून आणणं. ज्या देशांत क्रीडा स्पर्धांमध्ये पैजा लावणं अधिकृतपणे मान्य आहे तिथे सामन्यांवर, सामान्यांमधील छोटया मोठ्या घटनांवर अनेक पैजा लागतात. इंटरनेटवरून किंवा रस्तोरस्ती असलेल्या दुकानांमधून, पब्समधून लोक सामना बघत बघत क्षणाक्षणाला नवीन नवीन पैजा लावू शकतात, लावत असतात. या क्षेत्रातील उलाढाल मोठी आहे. लंडनसारख्या ठिकाणी काही वर्तमानपत्रांत कुठली पैज लावणं अधिक हितकर ठरेल यावर लेख छापून येतात; खेळाचा अभ्यास करून बेटिंगवर पैसे मिळवून काही मोजकी मंडळी आपला चरितार्थ चालवू शकतात; आणि या निमित्ताने संख्याशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना आपल्या विषयांतील गणितांकरता भरपूर आकडेवारी मिळते.

ज्या देशांत बेटिंगला बंदी आहे तिथेही येनकेन प्रकारेण पैजा घेण्याची सोय होतेच. भारतीय क्रिकेटमध्ये यावरून उठलेली वादळं सगळ्यांना ठाऊक आहेतच. मॅच फिक्सिंगमुळे खेळाचं नाव खराब झाल्याने बऱ्याच आयोजकांनी आणि संघटकांनी त्याला आळा घालण्यासाठी पावलं उचलली, फोनच्या वापरावर निर्बंध घातले, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवलं. यामुळे संपूर्ण सामन्याचा निकाल फिक्स करणं कठीण झालं. फिक्सर मंडळी मग स्पॉट फिक्सिंगकडे वळली. क्रिकेटमध्ये स्पॉट फिक्सिंगसाठी कित्येक 'spots' उपलब्ध आहेत. गोलंदाजांचा चेंडू कुठे पडणार, फलंदाज फटका कुठला मारणार, पुढचा चेंडू नो बॉल होणार का, किंवा पुढचा चेंडू वाइड बॉल होणार का, गोलंदाज बदलल्यावर पुढचा गोलंदाज कोण असणार वगैरे वगैरे. असे गैरप्रकार इतर खेळांतही होतात का?

भारतात बेटिंग राजमान्य नसल्यामुळे बऱ्याच लोकांचे याबद्दलचे बरेच गैरसमज आहेत. काहीजण म्हणतात की क्रिकेट म्हणजे फिक्सिंगची बजबजपुरी आहे. फुटबॉलमध्ये असं काही काळंबेरं होत नाही असा काही क्रीडारसिकांचा गोड गैरसमज आहे. एका ताज्या तपासाची बातमी बघून त्या गैरसमजाची आज आपण शहानिशा करू या.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात BBC वर ही बातमी प्रसारित झाली. BBC साठी काम करणाऱ्या एका वार्ताहराने एका फुटबॉलपटूला गाठून त्याच्यासमोर स्पॉट फिक्सिंगचा प्रस्ताव ठेवला. फारसे आढेवढे ना घेता थोड्याच प्रयत्नांत हा खेळाडू यात सहभागी होण्यास तयार झाला. इतरत्र मिळालेला काळा पैसा गुंतवण्याची संधी एक निवेशक (इन्व्हेस्टर) शोधतो आहे, आणि पैसे मिळवण्याची ही एक चांगली संधी आहे असं सांगून त्या वार्ताहराने त्या फुटबॉलपटूला पटवलं. दोघातिघां मित्रांनाही त्यात सामील करून घेण्यासाठी बोलावलं. काय होत्या या खेळाडूंच्या अपेक्षा?

२०-२५ हजार युरो (१६-२० लाख रुपये) इतका वर्षाचा पगार, प्रत्येक फ्री किक, थ्रो इन, पेनल्टी यांकरिता ५०० युरो, येलो कार्डकरता १००० आणि रेड कार्डकरता २००० अशी त्या खेळाडूने मागणी केली. वर असंही म्हणाला की हे काही मॅच फिक्सिंग इतकं मोठं प्रकरण नाही, आपली जराशी छुटपूट, झटकन डोळ्यावर ना येणारी गोष्ट आहे. पैसे कॅश मध्ये मिळतील का असंही विचारायला विसरला नाही.

यानंतर BBC च्या वार्ताहराने त्यांना आपली खरी ओळख सांगितली. खेळाडूंनी लगेच तिथून काढता पाय घेतला. मॅच फिक्सिंगचं समूळ उच्चाटन करण्याची जवाबदारी घेतलेला जागतिक फुटबॉल संघटनेचा एक पदाधिकारी या प्रसंगांवर भाष्य करताना म्हणाला की स्पॉट फिक्सिंगचा छडा लावणं फार कठीण आहे. त्यात पोलिसांचा सहभाग असल्याशिवाय तपास चालू करणं ही दुष्कर आहे. भ्रष्टाचार फुटबॉलच्या पाचवीलाच पूजलेला आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये आणि मोठ्या खेळाडूंच्या बाबतीत त्याला आळा घालण्यात आम्ही कदाचित यशस्वी झालो असूही, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या दर्जाच्या साखळ्यांमध्ये याच्या पाळतीवर रहाणं कठीण आहे, त्यामुळे तिथे अशा गोष्टी होताच राहतात!

अर्थातच मोठ्या स्पर्धांमधून असा भ्रष्टाचार हद्दपार झाला आहे हे म्हणणं आपण कितपत मान्य करावं हा वेगळा प्रश्न आहे. सांगायचा मुद्दा हा की 'असतील शिते तर जमतील भुते' या न्यायाने जिथे बक्कळ पैसे आहेत तिथे काहीतरी घोटाळा आजूबाजूला असणारच असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि हो, फिक्सिंग म्हणजे फिक्सिंग असतं , क्रिकेट, फुटबॉल, आणि इतरही श्रीमंत खेळांमध्ये सेम असतं असंही कवितेतल्या प्रेमासारखं आपल्याला म्हणायला हरकत नाही.

डॉ. प्रकाश परांजपे 

 

सबस्क्राईब करा

* indicates required