भारतीय संघाविरुद्ध पदार्पण करणारे क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियामध्ये करत आहेत बस चालकाची नोकरी; यापैकी दोघांनी खेळला आहे वर्ल्ड कप!!

श्रीलंका आणि झिम्बाब्वेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक स्टार खेळाडू दिले आहेत. या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र सध्या या दोन्ही देशातील संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पिछाडीवर आहेत. त्यात आर्थिक अडचण असल्यामुळे खेळाडूंचा खर्च देखील भागत नाहीये, हा भाग वेगळा!! आजचा विषय जरा वेगळा आणि मनाला लागणार आहे. आम्ही तुम्हाला या दोन्ही देशातील अशा ३ खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी क्रिकेट सोडून आता उपजिविकेसाठी बस चालकाची नोकरी करायला सुरुवात केली आहे. मुख्य बाब म्हणजे या तीनही खेळाडूंनी भारतीय संघाविरुद्ध पदार्पण केले आहे. कोण आहेत ते खेळाडू? चला पाहूया.

श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू सूरज रणदिव आणि चिंथाका जयसिंघे आता ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये बस चालक म्हणून काम करत आहेत. त्यांच्यासोबत झिम्बाब्वेचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू वॅडिंग्टन मवेंगा देखील बस चालकाची नोकरी करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेही ट्रान्सडेव्ह या कंपनीसाठी काम करतात, या कंपनीत १२०० हून अधिक कर्मचारी काम करतात. तसेच ही कंपनी शहरातील लोकांना वाहतूक सेवा पुरवते. 

) सूरज रणदिव (Suraj randiv) :

श्रीलंका संघाचा माजी फिरकीपटू सूरज रणदिव हा ३६ वर्षांचा झाला आहे. २००९ आणि २०१० मध्ये त्याने भारतीय संघाविरुद्ध झालेल्या वनडे आणि कसोटी मालिकेत पदार्पण केले होते. त्यावेळी तो श्रीलंका संघातील एक उत्तम फिरकीपटू होता. त्याला श्रीलंकेसाठी ५० वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने ८६ गडी बाद केले. तसेच २०११ मध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्याने श्रीलंका संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तो एका घटनेमुळे चर्चेत आला होता. 

तर झाले असे की, भारतीय संघ सामना जिंकण्यापासून केवळ १ धाव दूर होता आणि वीरेंद्र सेहवाग ९९ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी सूरजने नो बॉल टाकला. त्यामुळे भारतीय संघाने सामना तर जिंकला, मात्र सेहवागचे शतक पूर्ण होऊ शकले नाही. या सामन्यानंतर सूरजने सेहवागची माफी मागितली होती. त्याने आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

) चिंथाका जयसिंघे (Chinthaka jayasinghe) ;

श्रीलंकेसाठी टी -२० क्रिकेट खेळलेला चिंथाका जयसिंघे आता ४२ वर्षांचा झाला आहे. तो आता सूरज रणदिव सोबत ऑस्ट्रेलियामध्ये बस चालकाची नोकरी करतोय. त्याला श्रीलंकेसाठी दीर्घ काळ क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. अवघे ५ टी -२० सामने खेळत त्याने ४९ धावा केल्या होत्या. मुख्य बाब म्हणजे चिंथाका जयसिंघेने देखील भारतीय संघाविरुद्ध पदार्पण केले होते. त्याने २००९ मध्ये नागपूरच्या मैदानावर पदार्पण केले होते. त्याला जयसूर्या, संगकारा, मुरलीधरन, जयवर्धने आणि दिलशान सारख्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली होती.

) वाडिंगटन वायेंगा ( Waddington Mwayenga ) :

झिम्बाब्वे संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वाडिंगटन वायेंगाला ५ सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याने २००५ मध्ये भारतीय संघाविरुद्ध खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. हा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिला आणि शेवटचा कसोटी सामना ठरला. या सामन्यात त्याने ७ व्या क्रमंकावर फलंदाजी करताना १४ धावांची खेळी केली होती. त्यावेळी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर होता.

आता तीनही खेळाडू क्रिकेट सोडून उपजिविकेसाठी बस चालकाची नोकरी करत आहे. मात्र अजूनही त्यांची क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. या तीनही खेळाडूंनी क्लब क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required