या फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये झळकावली आहेत सर्वाधिक द्विशतके! यादीत केवळ एक भारतीय...

कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा सर्वात जुना फॉरमॅट आहे. असं म्हणतात की, फलंदाज आणि गोलंदाजांची खरी परीक्षा ही कसोटी क्रिकेटमध्येच होत असते. त्यामुळे कसोटी क्रिकेट खेळणं हे प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्नं असतं. आजवर कसोटी क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज फलंदाज होऊन गेले. तसेच अनेक मोठ मोठे विक्रम बनवले आणि मोडले देखील गेले. मात्र तुम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस द्विशतकी खेळी करणारा फलंदाज कोण आहे? माहीत आहे का? बोभाटाच्या आजच्या लेखात आम्ही तुम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस द्विशतकी खेळी करणाऱ्या टॉप ५ फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत.

) डॉन ब्रॅडमन:

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस द्विशतकी खेळी करण्याचा विक्रम हा, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमनच्या नावे आहे. सर डॉन ब्रॅडमन यांनी १९२८ पासून ते १९४८ पर्यंत ऑस्ट्रेलिया संघासाठी एकूण ५२ कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्यांनी ९९.२४ च्या सरासरीने ६९९६ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमन यांनी २९ शतके, १३ अर्धशतके आणि १२ द्विशतके झळकावली आहेत.

) कुमार संगकारा:

श्रीलंका संघातील अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगकारा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. कुमार संगकाराने २००० पासून ते २०१५ पर्यंत श्रीलंका संघाचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान त्याने १५४ कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये त्याने ५७.४० च्या सरासरीने १२४०० धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये कुमार संगकाराच्या नावे ३८ शतके, ५२ अर्धशतके आणि ११ द्विशतकांची नोंद आहे.

) ब्रायन लारा:

वेस्ट इंडिज संघाचा दिग्गज कर्णधार ब्रायन लारा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. ब्रायन लाराने वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्याने वेस्ट इंडिज संघासाठी १३१ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ५२.८८ च्या सरासरीने ११९५३ धावा केल्या. तसेच त्याने आपल्या कारकीर्दीत एकूण ३४ शतके, ४८ अर्धशतके आणि ९ द्विशतके झळकावली.

) वॅली हॅमंड:

इंग्लंडचा माजी फलंदाज वॅली हॅमंड या यादीत चौथ्या स्थानावर आहे. हॅमंडने १९२७ ते १९४७ दरम्यान इंग्लंड संघाकडून ८५ कसोटी सामन्यांमध्ये सहभाग घेतला. दरम्यान, त्याने ५८.४५ च्या सरासरीने ७२४९ धावा केल्या. त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये २२ शतके, २४ अर्धशतके आणि ७ द्विशतकांची नोंद आहे.

) विराट कोहली:

या यादीत स्थान मिळवणारा विराट कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. विराट कोहली २०११ पासून कसोटी क्रिकेट खेळतोय. त्याने आतापर्यंत १०४ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ८११९ धावा केल्या आहेत. तसेच त्याने २७ शतके, २८ अर्धशतके आणि ७ द्विशतके झळकावली आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required