प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४००० हून अधिक बळी;इंग्लिश गोलंदाजाच्या नावे आहे विक्रम! पाहा टॉप-५ ची यादी..

एक काळ असा होता जेव्हा केवळ कसोटी क्रिकेट खेळले जायचे. तसेच काही मोजकेच देश हा फॉरमॅट खेळणं पसंत करायचे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये सामने रंगायचे. त्यामुळे खेळाडूंना जास्त सामने खेळण्याची संधी मिळत नव्हती. हेच कारण होतं की, देशांतर्गत क्रिकेटला जास्त प्राधान्य दिलं जायचं. मुख्यतः क्रिकेटचा जन्मदाता असलेल्या इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेटमधील जास्त सामने खेळले जायचे. त्यामुळे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम, सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम, सर्वाधिक सामने आणि सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम हा इंग्लिश खेळाडूंच्या नावे आहे. विल्फ्रेड रोड्स देखील याच खेळाडूंपैकी एक आहे. 

विल्फ्रेड रोड्सने १८९८ रोजी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १९३० पर्यंत म्हणजेच तब्बल ३२ वर्षे ते क्रिकेट खेळत राहिले. यादरम्यान त्यांनी १११० प्रथम श्रेणी सामने खेळले. ज्यामध्ये त्यांनी एकूण ४२०४ गडी बाद केले. विल्फ्रेड रोड्स एकमेव गोलंदाज आहेत, ज्यांनी ४००० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना ५८ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये त्यांनी १२७ गडी बाद केले.

हे आहेत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील टॉप - गोलंदाज..

विल्फ्रेड रोड्स नंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत टीम फिमेन यांचे नाव येते. त्यांनी १९१४ पासून ते १९३६ पर्यंत ५९२ सामने खेळले. यादरम्यान त्यांनी ३७७६ गडी बाद केले होते. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी १२ सामन्यांमध्ये ६६ गडी बाद केले होते.

तसेच या यादीत तिसऱ्या स्थानी चार्ली पार्कर या गोलंदाजाचे नाव येते. चार्लीने १९०३ पासून १९३५ पर्यंत फिरकी गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ६३५ प्रथम श्रेणी सामने खेळले. ज्यामध्ये त्याने ३२७८ गडी बाद केले होते. यादरम्यान त्याच्या गोलंदाजीची सरासरी १९.४६ इतकी होती.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॅक हर्न या यादीत चौथ्या स्थानी आहे. तसं पाहायला गेलं तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३००० गडी बाद करण्याचा पल्ला गाठणारा जॅक हर्न हा पहिलाच गोलंदाज होता. १८८८ ते १९२३ पर्यंत त्याने ६३० प्रथम श्रेणी सामने खेळले. यादरम्यान त्यांनी १७.७५ च्या सरासरीने ३०६१ गडी बाद केले होते. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी १२ कसोटी सामन्यांमध्ये ४९ गडी बाद केले होते. 

टॉप -५ गोलंदाजांच्या यादीत टॉम गॉडर्ड हा पाचव्या स्थानी आहे. टॉमने १९२२ पासून ते १९५२ पर्यंत ५९३ सामने खेळले. ज्यामध्ये त्यांनी १९.८४ च्या सरासरीने २९७९ गडी बाद केले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ ८ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यांनी केवळ २२ गडी बाद केले होते.

सबस्क्राईब करा

* indicates required