क्रिकेटच्या इतिहासातील टॉप -५ टक्कर; जेव्हा एकमेकांना धडक दिल्याने खेळाडू झाले रक्तबंबाळ

क्रिकेटमध्ये लीग स्पर्धा सुरू झाल्यापासून क्रिकेटची क्रेझ प्रचंड वाढली आहे. जवळपास सर्वच टॉपचे संघ आपल्या देशात लीग स्पर्धांचे आयोजन करतात. भारत वगळता इतर संघातील खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेत असतात.

आधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळाडू चमकला तर त्याला थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायची संधी मिळायची. मात्र आता टी -२० लीग स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या संघांनाही आंतरराष्ट्रीय संघात स्थान दिले जात आहे. वेगवेगळ्या संघातील खेळाडू जेव्हा एकाच संघात खेळतात तेव्हा काहीवेळा त्यांचं पटत नाही. त्यामुळे वाद होतात. बोभाटाच्या या लेखात आम्ही तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावर घडलेल्या ५ वादांबद्दल माहिती देणार आहोत.

स्टीव्ह स्मिथ आणि बेन स्टोक्स..

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ हे दोघेही एकत्र आयपीएल स्पर्धेत खेळले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत हे दोघेही रायसिंग पुणे सुपर जायंट्स संघासाठी खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. नॅथन कुल्टरनाईलने टाकलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होत, त्यावेळी झेल टिपण्यासाठी स्टीव्ह स्मिथ आणि बेन स्टोक्स यांच्यात जोरदार टक्कर झाली होती.

काईल मिल्स आणि ब्रेंडन मॅक्युलम

न्यूझीलंड संघ भारतीय संघासोबत दोन हात करण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. दोन्ही संघांमध्ये २ टी -२० सामन्यांची मालिका सुरू होती. तर दुसऱ्या टी -२० सामन्यात मिल्स आणि ब्रेंडन मॅक्युलम यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळाली. ज्यावेळी भारतीय संघ धावांचा पाठलाग करत होता, त्यावेळी युवराज सिंगने हवेत शॉट मारला. हा झेल टिपण्यासाठी ब्रेंडन मॅक्युलमने धाव घेतली. मात्र त्याचवेळी मिल्स आणि ब्रेंडन मॅक्युलम यांच्यात जोरदार टक्कर झाली. ही जोरदार धडक झाल्यानंतर दोघांनाही मैदान सोडून बाहेर जावं लागलं होतं.

रोहित शर्मा आणि विराट कोहली...

क्रिकेट चाहत्यांना आठवतही नसेल की, रोहित शर्मा आणि विराट कोहलीची देखील जोरदार धडक झाली होती. २०१२ मध्ये आशिया चषक स्पर्धेत भारत विरुध्द पाकिस्तान सामना सुरू होता. फलंदाजी करत असलेल्या अकमलने फ्लिक शॉट मारला. हा शॉट थांबवण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीने धाव घेतली. मात्र दोघांची जोरदार टक्कर झाली होती.

जेजे स्मट्स आणि किरोन पॉवेल..

कॅरिबियन प्रीमियर लीग स्पर्धेतील २०१६ च्या हंगामात जेजे स्मट्स आणि किरोन पॉवेल यांच्यात जोरदार धडक पाहायला मिळाली होती. फलंदाजी करत असलेल्या एबी डिव्हीलियर्सने गगनचुंबी शॉट मारला होता. त्यावेळी जेजे स्मट्स आणि किरोन पॉवेल दोघेही झेल टिपण्यासाठी धावले. मात्र झेल टिपण्याच्या नादात दोघांनीही एकमेकांना पाहिलं नाही. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार धडक झाली होती.

जेफरी वांडरसे आणि एशेन बंडारा..

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये तिसरा वनडे सामना सुरू होता. या सामन्यात फलंदाजी करत असलेल्या विराटने पुल शॉट मारला आणि चेंडू वेगाने सीमारेषेच्या दिशेने गेला. तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या जेफरी वांडरसे आणि एशेन बंडाराने डाईव्ह मारत चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू पकडण्याच्या नादात दोघांची जोरदार धडक झाली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले होते.

तुम्हालाही असा एखादा किस्सा आठवतो का? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required