विराटचे शतक ते नागीण डान्स..हे आहेत आशिया चषक २०२२ स्पर्धेतील अविस्मरणीय क्षण...

नुकताच आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र सुपर -४ फेरीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेतील अंतिम सामना श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. अंतिम सामन्यात श्रीलंका संघाने जोरदार कामगिरी करत २३ धावांनी विजय मिळवला. यासह सहावे जेतेपद आपल्या नावावर केले आहे. मात्र आशिया चषक २०२२ स्पर्धेत असं खूप काही घडलं ज्यामुळे ही स्पर्धा नेहमीच चर्चेत राहील. या लेखातून आम्ही तुम्हाला आशिया चषक २०२२ स्पर्धेतील असे ५ क्षण सांगणार आहोत,जे क्रिकेट चाहते कधीही विसरू शकणार नाहीत.

) अर्शदीप सिंगचा झेल :

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा आमने सामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. त्यामुळे खेळाडूंवर खूप दबाव असतो. असाच एक हाय व्होल्टेज सामना ४ सप्टेंबर रोजी पार पडला होता. हा सामना अशा ठिकाणी येऊन पोहोचला होता. जिथे दोन्ही संघांना विजयाची समान संधी होती. मात्र मोक्याच्या क्षणी अर्शदीप सिंगने आसिफ अलीचा सोपा झेल सोडला. हा झेल सुटला आणि भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. जर अर्शदीप सिंगने हा झेल टिपला असता, तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता.

) करुणारत्नेचा नागीण डान्स:

साखळी फेरीतील पहिला सामना श्रीलंका आणि अफगानिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात श्रीलंका संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यानंतर श्रीलंका संघाने बांगलादेश संघाला पराभूत करत बाहेरचा रस्ता दाखवला. हा सामना अतिशय रोमांचक सामना ठरला. कारण कुठला संघ जिंकेल हे कोणालाच माहित नव्हते. शेवटी श्रीलंका संघाने हा सामना जिंकला आणि संघातील खेळाडू चमिका करुणातत्ने नागीण डान्स करताना दिसून आला होता. हा डान्स करण्यामागचं कारण असं की, ४ वर्षांपूर्वी जेव्हा निदाहास ट्रॉफी स्पर्धा झाली होती. त्यावेळी सेमी फायनलच्या सामन्यात बांगलादेश संघाने श्रीलंका संघाला पराभूत करत बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यावेळी बांगलादेश संघातील खेळाडू नागीण डान्स करताना दिसून आले होते.

) आसिफ अली आणि फरीद अहमद यांच्यातील वाद...

क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा दोन खेळाडूंमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र अफगानिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात जे काही पाहायला मिळाले ते क्रिकेट खेळासाठी खूप वाईट होते. दोन्ही खेळाडूंवर दंड आकारण्यात आला होता. तर झाले असे की, जेव्हा आसिफ अली फलंदाजी करत होता, त्यावेळी पाकिस्तान संघ दबावात होता. तो बाद झाल्यानंतर तर अफगानिस्तान संघाची स्थिती आणखी मजबूत झाली. आसिफला फरीद अहमदने बाद करत माघारी धाडले. फलंदाज बाद झाल्यानंतर फरीदने फलंदाजाच्या जवळ जाऊन जल्लोष साजरा केला. हे पाहून फलंदाज आसिफ अली भलताच चिडला. त्याने फरीदला मारण्यासाठी बॅट हवेत उचलली. तसेच फरीदला धक्काबुक्की सुद्धा केली. या घटनेनंतर त्याच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली होती.

) विराट कोहलीचे ऐतिहासिक शतक...

जेव्हा जेव्हा आशिया चषक २०२२ स्पर्धेचा उल्लेख केला जाईल, त्यावेळी विराट कोहलीच्या शतकी खेळीचा देखील आवर्जून उल्लेख केला जाईल. विराट कोहलीचे हे टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक ठरले. तसेच तब्बल ३ वर्षे उलटून गेल्यानंतर विराट कोहलीला शतक झळकावण्याचा योग आला. त्याने अफगानिस्तान विरुध्द झालेल्या सामन्यात ६१ चेंडूंमध्ये १२२ धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळी सह तो भारतीय संघासाठी सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज देखील ठरला होता.

५) नसिम शहाचे दोन षटकार...

एक क्रिकेटप्रेमी नसिम शहाचे दोन षटकार कधीही विसरू शकणार नाही. नसिम शहाच्या दोन षटकारांमुळे अफगानिस्तान संघ अंतिम फेरीत जाण्याच्या शर्यतीतून बाहेर झाला होता. पाकिस्तान संघाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी १३२ धावांची आवश्यकता होती. शेवटच्या षटकात असे वाटू लागले होते की, अफगानिस्तान संघ या सामन्यात विजय मिळवणार. कारण पाकिस्तानचे ९ फलंदाज माघारी परतले होते आणि ११ धावांची गरज होती. मात्र नसिमने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार मारून पाकिस्तान संघाला विजय मिळवून दिला.

यापैकी आशिया चषक २०२२ स्पर्धेतील तुमचा आवडता क्षण कुठला? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required