computer

आपल्या फलंदाजांनी द. आफ्रिकेविरुद्ध केलेल्या या दमदार ७ खेळ्या तर आठवून पाहा..

भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी मालिका चालू झाली आहे.  भारताबाहेरील मैदानावर चांगली कामगिरी करणे ही बाब वाटते तितकी सोपी नसते. तिथल्या वातारणाशी जुळवून घेत त्या देशाला गोलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या पिचवर फलंदाजी करणे म्हणजे एक मोठे आव्हानच असते. आज आपण अशा फलंदाजांची यादी पाहणार आहोत, ज्यांनी दक्षिण आफ्रिकेत कठीण प्रसंगी खूप चांगली फलंदाजी केली आहे.

सौरव गांगुली (५१)

२००६ मधली जोहान्सबर्गची सौरव गांगुलीची ५१ धावांची खेळी! तुम्हाला वाटेल ५१ धावा, त्याही दादाने केल्या, त्यात काय एवढं? पण या ५१ धावा इतक्या खूप महत्वाच्या ठरल्या होत्या. आफ्रिकेचे धारदार गोलंदाज मखाया एनटिनी, डेल स्टेन आणि शॉन पोलॉक यांनी भारताचे कंबरडे मोडले होते. भारत पहिल्या डावात २०५/९ वर गडगडला. तिथून गांगुली आणि अकरा नंबरला आलेला व्हीआरव्ही सिंग यांनी मिळून मौल्यवान ४४ धावा जोडल्या. तो धावफलकच भारताला जिंकवून गेला. त्यामुळे भारताने सामना जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

विराट कोहली (119)

विराट कोहली एक दमदार फलंदाज आहे. पण कदाचित त्याच्या महानतेचा प्रवास दक्षिण आफ्रिकेतून सुरू झाला असं म्हणता येईल. २०१३ साली जोहान्सबर्गमध्ये विराटने केलेलं शतक खूप मौल्यवान होते. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज तिखट मारा करत हो,ते पण कोहली त्याचा धीराने सामना करत होता. फक्त २४ धावांवर २ महत्वाच्या विकेट पडल्यावर कोहलीने शतक केले. त्याने मारलेले हुक आणि पुलशॉट्स तर बघण्यासारखे होते. अर्थात तो सामना बरोबरीत सुटला, पण कोहलीचे तर शतक त्याच्या फलंदाजीची चमक दाखवून गेले.

सचिन तेंडुलकर (१४६)

सचिन तेंडुलकरने त्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीत भारतासाठी असंख्य उपयुक्त डाव खेळले आहेत. त्यातली एक महत्वाची खेळी 2011 मध्ये केपटाऊनमध्ये खेळली. डेल स्टेनसारख्या घातक वेगवान गोलंदाजाने ५ विकेट्स घेतल्या होत्या. भारत अवघड परिस्थितीत होता. त्यावेळी सचिनने शानदार खेळी खेळली आणि भारताने ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली.

चेतेश्वर पुजारा (१५६)

चेतेश्वर पुजारा हा शांत संयमी खेळाडू टेस्टसाठी खूप स्पेशल आहे. २०१३ साली पुजाराने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला, पण त्याआधी त्याच्या खेळावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेच्याच दौऱ्यात तो सपशेल अपयशी ठरला होता. पण २०१३ साली त्याने केलेल्या जिगरबाज खेळीने टीकाकारांना चूप केले. पुजाराने केलेल्या १५६ धावांच्या खेळीने दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यापासून रोखले.

व्हीव्हीएस लक्ष्मण (९६)

व्हीव्हीएस म्हणजे very very स्पेशल लक्ष्मण! असे चाहते त्याला का म्हणतात ते या खेळीवरून दिसून येते. २०१०/११ साली सेंच्युरियन येथे झालेल्या लाजिरवाण्या पराभवामुळे एमएस धोनी आणि टीम मालिकेत बरोबरी साधण्यासाठी उत्सुक होते. त्यातच दक्षिण आफ्रिकेने जाणूनबुजून खेळपट्टीवर गवत सोडले होते की ज्यामुळे भारतीय फलंदाज बाद होतील. ५६ धावांत ४ खेळाडू लवकर बाद झाल्यावर लक्ष्मण धीराने फलंदाजी करत होता. पहिल्या डावात त्याने ३८ धावा केल्या आणि नंतर दमदार ९६ धावा केल्या. अवघ्या ४ धावांनी त्याचे शतक हुकले, पण भारताने तोपर्यंत सामन्यात आघाडी घेतली होती आणि टेस्ट जिंकली.

राहुल द्रविड(१४८)

मिस्टर dependable म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने आपल्या कारकीर्दीत अनेक महत्वपूर्ण खेळी केल्या आहेत. १९९७ मध्ये जोहान्सबर्गच्या तिसऱ्या कसोटीत राहुल द्रविडने १४८ धावा करत शानदार शतक झळकावले होते. भारताने आधीच कसोटी मालिका गमावली होती, पण मान राखण्यासाठी तिसरी कसोटी जिंकणे महत्वाचे होते. भारताने सलामीवीरांना ४६ धावांत गमवल्यावर द्रविड एक बाजू धरून ठेवली. अ‍ॅलन डोनाल्ड, शॉन पोलॉक,लान्स क्लुजनर यांसारख्या गोलंदाजांचा त्याने सामना केला. दुसऱ्या डावातही द्रविडने ८१ धावा केल्याने सामना अनिर्णित राहिला.

मोहम्मद अझरुद्दीन(११५)

समोरच्या संघाने कितीही धावा केल्या तरी काउंटर अटॅक करणे म्हणजे काय हे मोहम्मद अझरुद्दीनच्या या खेळीने सिद्ध केले. १९९७ ला केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत ५२९ वर डाव घोषित केला. त्यानंतर भारताची अवस्था ५८/५ अशी झाली. पण मोहम्मद अझरुद्दीनने ११५ धावांची धमाकेदार खेळी केली. तेंडुलकरसोबत त्याने २२२ धावांची भागीदारी केली. टीम इंडियाने कसोटी गमावली असली तरी अझरुद्दीनने ज्याप्रमाणे प्रतिआक्रमण केले ते पाहण्यासारखे होते.

शीतल अजय दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required