computer

क्रिकेट सोडा, सरत्या वर्षात इतर खेळांत या ९ खेळाडूंनी केलेल्या बहारदार कामगिरींचा आढावा तर घ्या!!

२०२१ हे तसे भारतीय क्रीडा जगतासाठी तसे कभी खुशी कभी गम असेच गेले आहे. एकीकडे ऑलिम्पिकमध्ये भरारी घेतली, तर दुसरीकडे T-20 वर्ल्डकपमध्ये भारताला पहिली फेरीदेखील पार करता आली नाही. क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांना यावर्षी प्रेक्षक अधिक मिळत गेले हे मात्र सुखावह निरीक्षण आहे. क्रिकेट तर नेहमीचेच आहे. तर आज असेच त्या व्यतिरिक्त इतर खेळांत अभिमानास्पद कामगिरी केलेल्या काही खेळाडूंची माहिती घेऊया...

१) नीरज चोप्रा

या पठ्ठ्याचे नाव घेतल्याशिवाय २०२१ चा क्रीडा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. एका दणक्यात जागतिक स्तरावर नीरज चोप्रा स्टार झाला. पण यामागे त्याने केलेली वर्षानुवर्षांची मेहनत तितकीच कारणीभूत आहे. ऑलिम्पिकमधील भालाफेक खेळात त्याने ८७.५८ मीटर दूर भाला फेकत सुवर्णपदका आपल्या नावावर केले. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला ॲथलिट ठरला आहे.

२) मीराबाई चानू

मणिपूर राज्यातील एका छोट्या खेड्यातून येऊनही स्वतःच्या ईच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जीवावर तिने भारताचे नाव जगात गाजवले आहे. त्यांनी ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग खेळात महिलांच्या ४९ किलोगटात रौप्यपदक जिंकत भारताचे यावर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे खाते उघडले होते.

३) रवी कुमार दहीया

रवीकुमार दहीया हा एक नाही, तर दोन वेळचा कुस्ती चॅम्पियन आहे. भारताला कुस्तीत पदक मिळण्याचा चांगला इतिहास असल्याने त्याच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. ५७ किलो वजनी गटात जबरदस्त खेळ दाखवत रौप्यपदक जिंकले होते.

४) बजरंग पुनीया

आणखी एक कुस्तीगीर बजरंग पुनिया! याने देखील यंदा अफलातून कामगिरी केली. पुरुषांच्या फ्री स्टाईल ६५ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकत त्याने भारताच्या पदकतालिकेत महत्वाची भर घातली होती. बजरंग पुनियाच्या कामगिरीने अनेक नवीन कुस्तीगीरांना मोठी प्रेरणा मिळाली आहे.

५) लवलीना बोर्गेहेन

आसामच्या लवलीना बोर्गेहेन या मुलीने बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक जिंकत जगाचे लक्ष वेधून घेतले. बॉक्सिंगसारखा पुरुषी समजला जाणारा खेळ आपण किती पद्धतशीरपणे करू शकतो हे लवलीनाने दाखवून दिले आहे.

६) अवनी लेखरा

ऑलिम्पिकबरोबरच दिव्यांगांसाठी भरवल्या जाणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीयांनी पदकांची लयलूट केली आहे. अवनी लेखरा हिने १० मीटर एयर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. इथेही ती थांबली नाही, तर ५० मीटर रायफल प्रकारात कांस्यपदक जिंकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एका पॅरालिंपिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी अवनी पहिली महिला ठरली आहे.

७) दीपिका कुमारी

प्रामाणिक मेहनत आणि इच्छाशक्ती असेल तर परिस्थितीला झुकावे लागते हे दीपिका कुमारीने सिद्ध केले आहे. एका रिक्षाचालकाची मुलगी दीपिका कुमारी हिने इतिहास रचत २०२१ वर्ल्डकपमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. इतकेच नाही,तर जागतिक क्रमवारीत तिने पहिला क्रमांक पटकावला आहे.

८) पी. व्ही. सिंधू

२०१६ साली रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. यावेळी तिच्या कामगिरीकडे देशवासीयांचे लक्ष लागले होते. यावेळीही कांस्यपदक जिंकत ती सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.

९) भारतीय हॉकी संघ

हॉकी संघाने गेली ५० वर्षं वाट पाहील्यावर यंदा थेट सेमी फायनलमध्ये धडक मारली आणि इतिहास रचला. सेमी फायनल हरले असले तरी कांस्यपदक जिंकत भारतीय हॉकी संघाने या राष्ट्रीय खेळाचा सुवर्णकाळ परत आणला आहे हे स्पष्ट होत आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required