तंदुरुस्तीसाठी मांसाहार करावा लागतो या संकल्पनेला छेद देणारे भारतीय क्रिकेटसंघातले ९ शाकाहारी खेळाडू!!
भारतीय क्रिकेट संघ हा जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. खेळाडू वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या सामन्यात खेळत असतात. त्यामुळे क्रिकेटमध्ये टिकून राहण्यासाठी तंदुरुस्तीची फार महत्त्वाची भूमिका असते. फिटनेस राखण्यासाठी हे खेळाडू केवळ जिममध्ये तासनतास घाम गाळत नाहीत, तर त्यांच्या आहाराचीही खूप काळजी घेतात. खूप जणांना वाटत असेल हे खेळाडू मांसाहार करत असल्याने तंदुरूस्त राहतच असतील. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल भारताचे आघाडीचे खेळाडू हे चक्क शाकाहारी आहेत.आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा क्रिकेटर्सबद्दल सांगत आहोत जे शाकाहारी आहेत.
अर्थात, काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. या खेळाडूंतले काही जन्मापासून शाकाहारी आहेत, काही शाकाहारी होते पण काहीकाळ मांसाहार चाखून पुन्हा केवळ शाकाहारी बनले आणि काही अट्टल मांसाहारी होते, त्यांनीही नंतर शाकाहारी बनण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे त्यांचे स्वत:चे निर्णय आहेत. शाकाहार श्रेष्ठ की मांसाहार यावर आम्हांला काही म्हणायचे नाही. पण फक्त मांसाहारानेच आरोग्य चांगले बनते असं वाटत असेल, तर ही यादी वाचून तुमचे मत नक्कीच बदलेल.
१. विराट कोहली
एक काळ असा होता जेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा आवडता पदार्थ बटर चिकन होता. पण जेव्हा त्याने टेनिसमधील नोव्हाक जोकोविचचे फिटनेस पाहिले तेव्हा तो प्रभावित झाला. क्रिकेटमध्ये जास्त दिवस चांगली कामगिरी करायची असेल तर फिटनेसचे महत्व ओळखून २०१८ मध्ये त्याने शाकाहारी व्हायचे ठरवले.मांसाहाराची आवड असूनही कोहलीने मांसाहार पूर्णपणे सोडून दिला. त्यामुळे त्याच्या आरोग्याच्या बऱ्याच समस्या सुटल्या. आणि मैदानावर तो झोकून देऊन कामगिरी करू लागला.
२. चेतेश्वर पुजारा
कसोटीतील सर्वोत्तम फलंदाज चेतेश्वर पुजाराला तासनतास फलंदाजी करताना पाहून कौतुक वाटते. फक्त फलंदाजी नाही, तर क्षेत्ररक्षणातही तो सरस आहे. पुजारा हादेखील शाकाहारी आहे. त्याला सोया लाडू आवडतात. मसालेदार, तेलकट पदार्थापासून तो दूरच राहतो. त्याच्या खेळण्याचा स्टामिना पाहून समोरच्या संघातील खेळाडूंना घाम फुटतो.
३. रोहित शर्मा
रोहित शर्मा हा जगातील महान सलामीवीरांपैकी एक आहे. त्याचे षटकार आणि चौकार पाहिले की प्रश्न पडतो हा खातो काय? क्षेत्ररक्षणाठी तो तासनतास स्लीपमध्ये फिल्डीग करताना दिसतो. भारतीय संघाचा हिटमॅन रोहित हा मोठा खवय्या आहे. नवनवीन पदार्थ खाणे हा त्याचा छंद आहे. पण तो कुठेही गेला तरीही शाकाहार पाळतो. ३ द्विशतके मारणारा हा हिटमॅन शाकाहारी आहे हे वाचून अनेकांना आश्चर्य वाटते.
४. इशांत शर्मा
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने १०० कसोटींचा टप्पा पार केला. शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाच्या १४व्या वर्षापासून आहेत. २००७ मध्ये त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अंडर-19 संघात होईपर्यंत तो मांसाहारी होता. मात्र भारतीय संघात स्थान मिळवल्यानंतर तोही शाकाहारी जेवणाकडे वळला होता. वेगवान गोलंदाजाला तंदुरुस्तीमुळे अनेकदा बाहेर बसावे लागते. पण इशांत शर्मा त्याच्या तंदुरुस्तीमुळे अजूनही चांगली गोलदाजी करतो.
५. रविचंद्रन अश्विन
रविचंद्रन अश्विन हा जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे. त्याच्या नावावर ४०० हून अधिक कसोटी विकेटस् आहेत. तो कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर अंकुश ठेवण्यासाठी दीर्घकाळ गोलंदाजी करत असतो. त्यामुळे हात आणि शरीरावर बराच ताण येतो. त्याच्या फिटनेसचे श्रेय तो शाकाहारी आहाराला देतो. लहानपणासूनच तो शाकाहारी आहे. मध्यंतरी त्याने चिकन खाणे सुरू केले होते, पण तो परत शाकाहाराकडे वळला.
६. भुवनेश्वर कुमार
भुवनेश्वर कुमार हा केवळ भारतातच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्येही स्विंग गोलंदाजीचा उत्कृष्ट खेळाडू आहे. प्रसिद्धीपासून दूर असणारा हा खेळाडू गोलंदाजीतून टीकाकारांना उत्तर देतो. आयपीएलमध्ये दोनदा पर्पल कॅप जिंकणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे. भुवनेश्वर कुमार हा शुद्ध शाकाहारी आहे. लहानपणासूनच तो शाकाहारी आहे. त्याचे कुटुंबही शाकाहारी आहे.
७. शिखर धवन
शिखर धवन हा एक असा क्रिकेटर आहे जो कितीही आव्हाने असली तरी त्याच्या चेहऱ्यावर हास्य असते. सलामीचा फलंदाज म्हणून त्याने आक्रमक फलंदाजी करत स्वतःची ओळख सिद्ध केली आहे. रोहित शर्मा सोबत त्याने सलामीला खेळून अनेक विक्रम केले आहे. २०१८ पासून त्याने आपला आहार पूर्णपणे शाकाहारी आहारात बदलला.
८. युजवेंद्र चहल
भारताचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल हा सुद्धा पूर्वी मांसाहारी होता. त्यालाही विराट कोहली सारखे बटर चिकन खूप आवडायचे. परंतु २०२० पासून तोही शाकाहार जीवनशैली कडे वळला. मोक्याच्या वेळी विकेट घेणे हे चहलची खासियत आहे. म्हणून तो एकदिवसीय आणि टी-२० सामन्यात महत्वाचा गोलंदाज ठरतो.
९.हार्दिक पंड्या
हार्दिक पंड्या त्याच्या अष्टपैलू खेळामुळे ओळखला जातो. त्याने तळाला केलेली आक्रमक फलंदाजीने अनेकदा भारताला सामने जिंकून दिले आहेत. वेगवान गोलंदाज म्हणूनही त्याने अनेक विकेट घेतल्या आहेत. परंतु अनेकदा दुखापतीमुळे त्याला बाहेर बसावे लागले. त्यामुळेच त्याने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला. याचा त्याला फायदा होतोय. लवकरच तो जोशात पुपूनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.
तुम्हाला कोणाची कामगिरी सर्वोत्तम वाटते?
शीतल दरंदळे




