computer

विनाधाव चार ओव्हर टाकणाऱ्या यवतमाळच्या अक्षय कर्णेवारबद्दल वाचलंत की नाही? हा पठ्ठ्या दोन्ही हातांनी बोलिंग करतो?

महाराष्ट्र हे इतर क्षेत्रांबरोबर क्रिकेटमध्येही दिग्गज घडवणारे राज्य आहे. सचिन, गावस्कर तसेच इतरही अनेक दिग्गज महाराष्ट्राने दिले. बॉलिंगमध्ये झहिर खानसारखा तुफान बॉलर महाराष्ट्राने देशाला दिला आहे. सध्या असाच एक मराठी खेळाडू सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालत आहे.

अक्षय कर्णेवार असे या खेळाडूचे नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एका खेडेगावातून आलेला हा सर्वसामान्य घरातला तरुण आहे. सईद मुश्ताक अली ही T-20 सामन्यांची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील स्पर्धा असते. यात तो विदर्भ संघाकडून खेळत आहे. सोमवारी आणि मंगळवारी विदर्भ संघाचे अनुक्रमे मणिपूर आणि सिक्कीमसोबत सामने झाले. मणिपूर विरुद्ध बॉलिंग करण्यासाठी आलेल्या अक्षयने आपल्या स्पिन बॉलिंगवर खेळाडूंना लीलया नाचवले.

T-20 क्रिकेटमध्ये एक खेळाडू चार ओव्हर्स टाकू शकतो. या नियमानुसार अक्षयच्या वाट्याला या सामन्यात चार ओव्हर आल्या होत्या. या चारच्या चार ओव्हर मेडन टाकत या पठ्ठ्याने जागतिक विक्रम केला आहे. विचार करा त्याने टाकलेल्या बॉल्सवर विरोधी खेळाडूला साधी एक धावही घेता आला नाही. वरून भावाने दोन विकेटसुद्धा पटकावल्या आहेत.

हा जागतिक विक्रम आहे. आजवर जगात कुणालाही T-20 क्रिकेटमध्ये चार ओव्हर मेडन टाकता आलेल्या नाहीत. हा विक्रम इतका जबरदस्त आहे की तो भविष्यात मोडला जाईल का याबद्दल पण शंका आहे.

आता या पठ्ठ्याचा फॉर्म काय एका सामन्यापुरता नव्हता. दुसऱ्या दिवशी सिक्कीमविरुद्ध सामना झाला. या सामन्यात त्याने चार ओव्हरमध्ये फक्त ५ रन घेऊ दिले. सोबत तब्बल चार विकेट स्वतःच्या नावावर केल्या. कसोटी सामन्यातसुद्धा जे होत शक्य होत नाही, ते अक्षयने T-20 मध्ये करून दाखवले आहे.

या खेळाडूची विशेषता म्हणजे तो दोन्ही हातांनी बॉलिंग करतो. त्याची ही कामगिरी बघून त्याचा भारतीय संघात येण्याचा प्रवास जास्त काळ लांबू शकत नाही, हेच दिसून येते. अशा खेळाडूंमुळे भारताचे क्रिकेटचे भविष्य उज्वल असल्याचा दिलासा देखील मिळतो.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required