क्रिकेटच्या नियमांमध्ये क्रांती घडवणारा नवा फॉरमॅट! जाणून घ्या 'द सिक्स्टी' बद्दल सर्व काही...

गेल्या काही वर्षांत क्रिकेटमध्ये क्रांती घडून आली आहे. क्रिकेटचा फॉरमॅट असो किंवा क्रिकेटचे नियम, सर्वच काही नवीन. सुरुवातीला कसोटी क्रिकेट, वनडे क्रिकेट त्यानंतर आले टी -२० क्रिकेट. चाहत्यांना अक्षरशः वेढ लावून ठेवणारा फॉरमॅट, ३ तासात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळतो. या फॉरमॅटनंतर काहीतरी नवीन म्हणून टी -१० आणि १०० चेंडूंच्या फॉरमॅटला सुरुवात झाली. प्रत्येक फॉरमॅटमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळत आहे. दरम्यान आता वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणखी एक मोठी क्रांती घडवून आणण्याच्या तयारीत आहे. लवकरच 'द - सिस्क्टी' क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहे. ज्यात पुरुष आणि महिलांचे संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसून येणार आहेत.  (The 6ixty) 

या स्पर्धेचे नियम जरा वेगळे आहेत, त्यामुळेच ही स्पर्धा सध्या चर्चेचा विषय ठरतेय. काय आहेत नियम चला पाहुया.

१) आपण क्रिकेट हा खेळ गेल्या कित्येक वर्षांपासून पाहत आलोय. क्रिकेटचा साधा सोपा नियम म्हणजे एका संघातील १० फलंदाज बाद झाले की, तो संघ ऑल आऊट होतो आणि दुसरा संघ फलंदाजीला उतरतो. हे लहान मुलाला देखील माहीत आहे. मात्र 'द - सिस्क्टी' ही स्पर्धा जरा हटके असणार आहे. यात ६ फलंदाज बाद झाले की संघ ऑल आऊट.

२)फलंदाजी करणाऱ्या संघाला प्रत्येक डावात २ पावरप्ले उपलब्ध असतील. मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाने पहिल्या १२ चेंडूंमध्ये २ षटकार मारले की तिसरा पावरप्ले देखील अनलॉक होईल. हे एका व्हिडिओ गेमपेक्षा कमी नाहीये. अनलॉक झालेल्या पावरप्लेचा वापर फलंदाजी करणारा संघ ३ ते ९ षटकांदरम्यान कधीही करू शकतो.

३) क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आणि क्रिकेट पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला चांगलंच माहित आहे की, एक षटक झाल्यानंतर दुसरं षटक दुसऱ्या बाजूने फेकलं जातं. मात्र सिस्क्टी या स्पर्धेत एका बाजूने कमीत कमी ३० चेंडू फेकले जातील. ३० चेंडू झाल्यानंतर गोलंदाजी करणारा संघ दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करेल. तर एक गोलंदाज केवळ २ षटक गोलंदाजी करू शकतो. 

४) मॉर्डन डे क्रिकेटमध्ये खूप बदल करण्यात आले आहेत. गोलंदाजी करणाऱ्या संघाला ठराविक वेळेत षटक संपवायचे असतात. असे न झाल्यास कर्णधारावर दंड आकारला जातो. मात्र सिस्क्टी या स्पर्धेत ६ षटकं टाकण्यास उशीर झाला तर शेवटचे ६ चेंडू शिल्लक असताना संघातील एक खेळाडूला मैदानाबाहेर केलं जाईल.

५) तसेच या स्पर्धेत 'मिस्ट्री फ्री हिट'चा वापर केला जाणार आहे. ज्यामध्ये सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक फ्री हिटसाठी वोट करतील. यादरम्यान फलंदाजाला बाद घोषित केलं जाणार नाही.

या स्पर्धेचं आयोजन २४ ते २८ ऑगस्ट दरम्यान सेंट किट्स अँड नेविसमध्ये केले जाणार आहे. सेंट किट्स अँड नेविस हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. अमेरिका खंडातील हा सर्वात लहान स्वतंत्र देश आहे. सेंट किट्स व नेव्हिस ही या देशातील दोन प्रमुख बेटे आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required